Next
‘मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुढाकार घ्या’
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मुलांमध्ये साहित्याची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने शाळांना आणि पालकांना केले आहे.

परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘मुलांच्या गतिमान जीवनशैलीत खेळाला आणि अवांतर वाचनाला अजिबात स्थान नाही. या मुलांमध्ये वाचनाविषयीची आणि साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेतर्फे सर्वतोपरी मदत यासाठी केली जाईल.’
 
त्यासाठी शाळांनी शाळा सुरू होण्यापूर्वीची राष्ट्रगीतानंतरची दहा मिनिटे या उपक्रमासाठी द्यावी. या दहा मिनिटांत दररोज शिक्षकांनी मुलांना एक कविता, एक कथा, पुस्तकातील काही भाग किंवा मान्यवर लेखकाचे जीवनचरित्र वाचून दाखवावे. शाळेतील एखादे शिक्षक रजेवर असतील, तर त्यांच्या तासाला जाणाऱ्या शिक्षकांनी वर्गात पुस्तकांची पेटी घेऊन जावी. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचे पुस्तक वाचनासाठी द्यावे. मुलांनी काय वाचले हे लिहिण्यासाठी त्यांना स्वतंत्र वही करायला सांगून त्यात त्या पुस्तकाविषयी लिहायला सांगावे. उत्तम नोंदी ठेवणाऱ्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. दर तीन किंवा सहा महिन्यांनी या बालवाचकांचे वाचक संमेलन घ्यावे. दर वर्षी शाळेत स्नेसंमेलनाला जोडून विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घ्यावे. मुलांना शाळेतर्फे जी पारितोषिके दिली जातात ती ग्रंथरूपात द्यावीत.

शाळेबरोबरच पालकांचाही यात सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी सोसायटीत मुलांसाठी वाचक पेट्या असाव्यात, असा आग्रह सोसायट्यांकडे धरावा. वर्षात मुलांच्या आवडीची २० पुस्तके खरेदी करावीत. आठवड्यातून किमान एक तास पालकांनी मुलांबरोबर सहवाचन करावे. समवयस्क मित्राच्या वाढदिवसाला ग्रंथ भेटच देण्याचा आग्रह धरावा. सोसायटीतल्या मुलांची वाचकभिशी करून त्यात त्यांना वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलायला सांगा. जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या मुलांना वैयक्तिक आणि सोसायटीतर्फे पारितोषिक द्यावीत.

या बालवाचकांसाठी मराठी साहित्य परिषदेतर्फे मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत याची यादी उपलब्ध करून दिली जाईल. शाळांमध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा उपक्रम राबविण्यासाठी मदत करेल. बाल वाचक संमेलन आणि स्नेहसंमेलनांना जोडून मुलांसाठी साहित्य संमेलन घेण्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करेल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांसाठी बालवाचक पालकत्व योजना राबविण्यासाठी मदत करेल. प्रत्येक शाळेतील शाळेने नोंद ठेऊन शिफारस केलेल्या विद्यार्थी वाचकांना ‘उत्तम वाचक’ म्हणून प्रमाणपत्र देईल. मुलांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांचा आणि सोसायट्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. अशा शाळांना ग्रंथाच्या रूपाने मदत करण्यात येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link