Next
स्वातंत्र्यदिनाचा इंद्रधनुषी योग...!
BOI
Monday, August 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

दिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोशाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पुण्यात राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी झाले. स्वतःच्या मातृभाषेव्यतिरिक्त भारताच्या कुठल्याही भागातील महत्त्वाची भाषा जुजबी का होईना यायला हवी असेल, तर भारतीय व्यवहार कोशाला पर्याय नाही. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने त्यांचे हे कार्य जगासमोर पुन्हा येण्यास सज्ज व्हावे, हा मोठा शुभशकुन मानायला हवा.
.........
यंदाचा स्वातंत्र्यदिन एक मोठा योगायोग घेऊन आला. याचे कारण म्हणजे एका विशेष महत्त्वाच्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा साक्षीदार होण्याची संधी या दिवशी लाभली. हा ग्रंथ म्हणजे ‘भारतीय व्यवहार कोश’! हा कार्यक्रम झाला राज्यपालांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या राजभवनात. पुण्याचे असलेले दिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोशाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. ‘भारतीय विचार साधना, पुणे’ या संस्थेने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. नरवणे यांच्या पत्नी कविता नरवणे या वेळी उपस्थित होत्या.

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. एका प्रांतातील माणसाला दुसऱ्या प्रांतातील माणसाची भाषा येतेच असे नाही. मराठी माणसे जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी या भाषा आवर्जून शिकतात; पण कुणी गुजराथी, कन्नड किंवा तमिळ भाषा शिकणे आमच्या जिवावर येते. तीच गोष्ट अन्य भाषकांची. एवढा मोठा आणि विपुलतेने भरलेला देश. भूगोलात शिकलेल्या जवळपास प्रत्येक प्रकारचा प्रदेश एकट्या भारतात सापडतो. परंतु एकमेकांच्या अंतरात काय आहे, हे पाहायला आम्हाला सवड नाही. एकमेकांची भाषा येत नसल्याने साहजिक दुरावा निर्माण होतो. शिवाय ‘मराठीने केला कानडी भ्रतार’ अशा म्हणींद्वारे या उदासीनतेला तात्त्विक जोड देण्यातही आपण हुशार!

वास्तविक साहित्य अकादमीसारख्या संस्थांची स्थापना याच उद्देशाने झाली आहे. परंतु त्याही कामाला मर्यादा येतात. म्हणूनच आपलाच देश आपल्याला परका राहतो. इंग्रजीवर पूर्णपणे विसंबून राहिले आणि अन्य प्रांतीय (परप्रांतीय नव्हे) भाषा न आल्याने कसा विचका होतो, हे पाहायचे असेल तर गंगाधर गाडगीळ यांचे ‘गोपुरांच्या प्रदेशात’ हे प्रवासवर्णन वाचले तरी कळून येते. 

या नकारात्मकतेला धाडसी आव्हान देण्याचे कार्य करणारा ग्रंथ म्हणजे ‘भारतीय व्यवहार कोश.’  या ग्रंथात असे काय आहे? तर या कोशात वेगवेगळ्या शब्दांची जंत्री असून, त्यासाठी सोळा भाषांमध्ये प्रतिशब्द दिले आहेत. फळे, धान्य, फुले, घरगुती वस्तू, अवयव अशा अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू त्यात समाविष्ट आहेत. नावातच व्यवहार कोश असल्यामुळे व्यवहारावर त्यात भर दिलेला आहे, हे साहजिकच आहे. नुसते शब्द देऊन भागत नाही, तर वाक्यरचनाही यायला हवी. त्यामुळे घरात, बाजारात, कार्यालयात, रेल्वे स्टेशनवर बोलल्या जाणाऱ्या वाक्यांचे सर्व भारतीय भाषांत अनुवाद दिलेले आहेत. रोजच्या जगण्यातील सुमारे शंभर प्रकारची वाक्ये सोळा भाषांमध्ये यात दिलेली आहेत- अन् ती सर्व देवनागरी लिपीत. स्वतःच्या मातृभाषेव्यतिरिक्त भारताच्या कुठल्याही भागातील महत्त्वाची भाषा जुजबी का होईना यायला हवी असेल, तर भारतीय व्यवहार कोशाला पर्याय नाही. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. तत्कालीन १३ राज्यांच्या राज्यपालांनी या प्रयत्नाला दाद दिली होती. आता राज्यपाल राव यांनी या कोशाला नदीजोड प्रकल्पाची उपमा दिली. ‘हा कोश म्हणजे नदीजोड प्रकल्पासारखाच भाषाजोड प्रकल्प आहे. कोणत्याही भारतीय भाषेतील व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी हा कोश उपयोगी पडणार आहे. या कोशाची तिसरी आवृत्ती प्रकाशित करणे म्हणजेच संपादक दिवंगत विश्वनाथ नरवणे यांचे समर्पण आणि निष्ठेला अभिवादन करण्यासारखे आहे. केवळ एखादी ध्येयवादी व्यक्तीच असे कार्य करू शकते,’ असे ते म्हणाले. 

या कोशाच्या निर्मितीसाठी स्व. नरवणे यांनी घेतलेले कष्ट पाहिले असता थक्क व्हायला होते. या वेळी या कोशाची माहिती देताना डेक्कन अभिमत विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रसाद जोशी म्हणाले, ‘भारतीय व्यवहार कोशाचे पहिल्यांदा प्रकाशन १९६१मध्ये झाले. यामध्ये १६ भारतीय भाषांमधील ४० हजार शब्दांची माहिती आहे. विश्वनाथ नरवणे सहा वर्षे देशातील विविध भागांत प्रवास करत होते. त्यांनी अनेक भाषातज्ज्ञांची भेट घेऊन कोश परिपूर्ण बनवला. कोशशास्त्राच्या सिद्धांतांनुसार त्यांनी या कोशाची निर्मिती केली. इंग्रजी व संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ दिल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे. देशभर फिरून त्यांनी एक एक शब्द गोळा करून हा ग्रंथ सिद्ध केला.’

विश्वनाथ नरवणेबाजारात ‘फ्रेजबुक’ नावाचा एक प्रकार उपलब्ध असतो. एखाद्या प्रांतात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी काही प्राथमिक वाक्ये त्यात दिलेली असतात. भारताच्या सर्व महत्त्वाच्या भाषांना समाविष्ट करणाऱ्या भारतीय व्यवहार कोशासारखे फ्रेजबुक आज तरी उपलब्ध नाही. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या ग्रंथाचे प्रकाशन होणे, हाही मोठा योगायोग आहे. या कोशाचे प्रकाशन १९६१ साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. मूळ हिंदीत असलेल्या या ग्रंथाच्या प्रस्तावनेत विश्वनाथ नरवणे म्हणतात, ‘शब्दांचा शोध घेत आपण जात असतो, तेव्हा आपल्या भाषेतील शब्द दूर कुठेतरी पोहोचलेले पाहून खूप आनंद होतो. वेगवेगळ्या भाषांतील शब्द आणि म्हणी एक-दुसऱ्या भाषेमध्ये सहजतेने पोहोचून जणू त्याच भाषेचे अंग झालेले पाहून असा साक्षात्कार होतो, की  भाषा-भाषांमध्ये भिंती नाहीत, तर इंद्रधनुष्याप्रमाणे त्या एकमेकांशी अशा जोडलेल्या आहेत, की त्यांच्या एकत्र येण्याची स्थानेही कळत नाहीत - त्या अभेद्य आहेत...अशा प्रकारच्या भाषा ज्ञानातूनच भारताच्या एकात्मतेचे दर्शन आपण करू शकू.’ 

आणखी एक मुद्दा राज्यपालांनी या निमित्ताने मांडला. तो महत्त्वाचा होता. ‘भारत हे विविध संस्कृतींचे एक गाठोडे आहे. भाषा ही नदीप्रमाणे असते. भारतीय भाषा या आपल्या प्राचीन ज्ञानाच्या साठ्याचे भंडार आहेत. परंतु तरुण पिढी आपल्या मातृभाषांपासून दूर जात आहे, यामुळे मी चिंतित होतो. एखादी भाषा मरते तेव्हा ते नुकसान भरून काढता येत नाही,’ असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यदिन दर वर्षी येतो, दर वर्षी देशभक्तीचे आणि मातृभूमीचे गोडवे गायले जातात. ही देशभक्ती, देशबांधवांबद्दलचा हा उमाळा किती खरा, किती दिखाऊ हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु खरोखर हा देश काय आहे आणि या देशाचा समृद्ध वारसा काय आहे, याचा शोध घेणारे फार थोडे. दिवंगत विश्वनाथ नरवणे हे अशा थोड्यांपैकी एक. त्यांनी निर्माण केलेली ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’ (तीन खंड) ही ग्रंथसंपदा म्हणजे कोशवाङ्मयातील गौरीशंकरच होत. स्वातंत्र्यानंतर संपूर्ण भारताला कवेत घेणारे अशा प्रकारचे अन्य साहित्यिक कार्य क्वचितच असेल. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने त्यांचे हे कार्य जगासमोर पुन्हा येण्यास सज्ज व्हावे, हा मोठा शुभशकुन मानायला हवा. आता तिसऱ्या आवृत्तीनंतर हा कोश अॅपच्या माध्यमातूनही लवकरच येणार आहे. त्याचेही स्वागत व्हायला हवे. स्वातंत्र्यदिनाचे असे इंद्रधनुषी योग वारंवार यायला हवेत...! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search