Next
‘कथामय नाट्यसंगीत’ कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद
रत्नागिरीत ‘खल्वायन’तर्फे आयोजन
BOI
Monday, November 12, 2018 | 04:03 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
खल्वायन संस्थेने दिवाळी पाडव्यानिमित्त आठ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजित केलेला ‘कथामय नाट्यसंगीत’ हा विशेष कार्यक्रम गुरुकृपा मंगल कार्यालयात रंगला. शब्द-सुरांची सहजसुंदर पेशकश करत कलाकारांनी अप्रतिम गायन केले. हा कार्यक्रम ‘संगीत एकच प्याला’ या शतकमहोत्सवी नाटकावर आधारित होता.

पुण्याचे प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. जयराम पोतदार यांची संकल्पना, दिग्दर्शन असलेला हा कार्यक्रम चिपळूणची युवा गायिका हिमानी भागवत हिच्या मुलायम व आरवली-संगमेश्वरचा गायक अजिंक्य पोंक्षे याच्या तडफदार सुरांनी रंगला. रंगभूमीवरील प्रदीर्घ अनुभव असलेले वामन जोग व आकाशवाणीच्या निवेदिका पौर्णिमा साठे यांच्या सहजसुंदर निवेदनाने रसिकांची दिवाळी पहाट मंगलमय झाली. ही मैफल फिनोलेक्स इंडस्ट्रीजने प्रायोजित केली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं. जयराम पोतदार यांनी नटराजपूजन, दीपप्रज्वलन केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी पोतदार व कलाकारांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर पी. पी. बोरकर यांचाही सन्मान करण्यात आला. प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक केले.

जयराम पोतदार यांनी ‘संगीत एकच प्याला’च्या काही आठवणी कथन केल्या. कार्यक्रमात सुरुवातीला भूप रागातील व झपतालात ‘बद्ध शरण ते करुण तव’ ही नांदी झाली. त्यानंतर ‘लागे हृदयी हुरहुर’ हे पद हिमानीने गोड आवाजात सादर केले. मानस का बधिरावे, प्रणवनाथ रक्षी कांत, द्या छाया घे निवारुनिया, घास घे रे तान्ह्या बाळा, दहति बहु मना नाना कुशंका, दुष्टमति सर्पा सदपी, कशी या त्यजू पदाला, सत्य वदे वचनाला नाथा, मज जन्म देई माता, प्रभू अजि गमला मनी तोषला, बघू नको मजकडे केविलवाणा ही नाट्यपदे हिमानीने ताकदीने व तन्मयतेने सादर केली.

परम गहन ईश काम, सरिता जनि या प्रबला भारी, माता वियोगी मज, वेध तुझा लागे सतत मनी, सचतुर धैर्यसदा सुरू धाम, वसुधा तलरमणीय सुधाकर, झणी दे कर या दीनां, गमसी खरी हतभागिनी, त्यज दैवी हत दैवा ही पदे अजिंक्य पोंक्षे याने वेगवेगळ्या ढंगात व तितक्याच सफाईदारपणे सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

वामन जोग व पौर्णिमा साठे यांनी ‘एकच प्यालाचे’ कथाभाग सादरीकरण सुयोग्य रीतीने करून कार्यक्रमात बहार आणली. ऑर्गनसाथ पं. जयराम पोतदार, तबलासाथ प्रथमेश शहाणे आणि हार्मोनियमसाथ मधुसूदन लेले यांनी केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search