Next
दारा बांधता तोरण...
BOI
Tuesday, January 02 | 06:45 AM
15 0 0
Share this story

इंदिरा संतनिसर्ग अन् प्रीतीची अभिव्यक्ती हे ज्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य, त्या कवयित्री इंदिरा संत (अक्का) यांचा चार जानेवारीला जन्मदिन आहे. त्या दिवसाचं, तसंच नुकत्याच सुरू झालेल्या नववर्षाचं औचित्य साधून ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या ‘दारा बांधता तोरण’ या अक्कांच्या कवितेचा...
........
उमलती पहाट, पूर्व क्षितिजावरची लाली, पहाटवाऱ्यावर फुलांचा दरवळ आणि सोनेरी किरणांचा पिसारा ल्यालेला तेजोनिधी सूर्य हळूहळू वर येतो. नकळत हात जोडले जातात... सूर्यनारायण आपल्यासाठी एक नवा कोरा दिवस घेऊन येतो. या नव्या कोऱ्या दिवसाचं दान देणाऱ्या उगवत्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी, सिमेंटच्या जंगलाबाहेर दूऽऽरवर जावं लागतं. रोज कसं जमणार हे... म्हणून ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ची वाट बघावी लागते... वर्षातून एकदा तरी डोळे दिपवणारं पूर्व क्षतिजावरचं सोनेरी वैभव पाहायला हवं ही जाणीव होणं, हेही नसे थोडके! पूर्वेची ही लयलूट अर्थात ‘सनराइज’ अनुभवण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी, ट्रॅफिक जॅम आणि आणि बरंच काही... अशा बातम्या वाचताना, ऐकताना माझ्या मनात मात्र इंदिरा संतांच्या ‘सोनचाफ्याची पावले’ या कवितेवरचं गाणं ऐकत ऐकत नववर्ष साजरं होत असतं. सूर्यनारायणाचं आगमन, नव्या स्वप्नांचं, नव्या आशा-आकांक्षाचं आणि नव्या उमेदीनं, उत्साहानं, प्रसन्नतेनं अनुभवता येणाऱ्या नव्या क्षणांचं स्वागत करण्यासाठी मन सज्ज होतं. सोबतीला असतात आवडत्या कवयित्री इंदिरा संत यांचे शब्द.

आज येणार अंगणी, सोनचाफ्याची पाऊले

घरात एखादं शुभकार्य, मंगलकार्य असेल, दसरा-दिवाळीचा सण असेल, तर आपण दाराला तोरण बांधतो. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्वागताच्या तयारीसाठीही तोरण बांधतो. अहो, दारी तोरण म्हणजे स्वागतासाठी सज्ज असलेलं घर, त्या घरात येणार असतात सौख्याचे क्षण. हे सौख्याचे क्षण घेऊन येणारी सोनपावलांची सौभाग्यलक्ष्मी किंवा बाळराजाची सोनपावलं आणि या इंदिरा संतांच्या या कवितेतलं सोनचाफ्याचं इवलंसं रोप.... नववर्ष साजरं करताना तर साक्षात सूर्यनारायणाच्या सहस्रकिरणांनी सजलेलं, सोनेरी क्षणांचं स्वागत करणारं, आनंदी मनाच्या दाराला बांधलं जातं असं कवितेचं तोरण... थर्टी फर्स्टच्या धांगडधिंग्यापेक्षा नववर्षाचं स्वागत सूर्योदयालाच करायला हवं असं वाटतं. कारण नवा दिवस सुरू होतो सूर्यकिरणांच्या नव्हाळीतच. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्नस... आनंद साजरा करण्याची ज्याची त्याची रीत! आपण मात्र घेत राहावा अनुभव सुमधुर अर्थवाही गीतांचा, कवितांचा! संवेदनशील मनाला साद घालणाऱ्या कविता आणि गाणी ऐकत ऐकत वर्षामागून वर्षं कधी उलटली ते समजलंच नाही... गेल्या क्षणांचा हिशेब ठेवण्यापेक्षा पुढे उभ्या ठाकलेल्या क्षणांचं स्वागत... मनाच्या अंगणात रांगोळी घातली आणि हृदयाच्या दारावर स्नेहफुलांचं तोरण बांधलं की सुखाचं दान घेऊन येईल प्रत्येक क्षण! 

जानेवारी महिना म्हटलं, की नववर्ष या संदर्भाबरोबर मराठी काव्यसृष्टीला आपल्या आत्ममग्न आणि तितक्याच तरल कवितांनी समृद्ध करणाऱ्या अक्कांचा म्हणजे इंदिरा संत यांचा जन्मदिन साजरा करण्याची कृतज्ञ आठवण येते. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यातील चार जानेवारी हा दिवस म्हणजे इंदिरा संतांचा जन्मदिन. तो साजरा करण्याच्या निमित्तानं त्यांच्या कवितांचा ‘गर्भरेशमी’ ‘शेला’, ‘मेंदी’भरल्या हातांनी हळुवार उलगडला आणि ‘रंगबावऱ्या क्षणांच्या ‘बाहुल्या’ मनात फेर धरून नाचू लागल्या. म्हणू लागल्या, अक्कांचा वाढदिवस. छे! वाढदिवस कसं म्हणायचं? आता तर त्या आपल्यात नाहीत. फक्त जन्मदिवस म्हणू या... चार जानेवारीला साजरा करू या त्यांचा जन्मदिन! नाचू या फेर धरून आणि वाचू या त्यांच्या कविता मन भरून!! पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी फार मोलाचं काम करून ठेवलंय. ‘बाळ उतरे अंगणी,’ ‘केव्हा कसा येतो वारा’ किंवा ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ आणि आत्ताची ही ‘सोनचाफ्याची पाउले’ अशा अक्कांच्या सर्व कविता गाऊन पद्मजाताईंनी त्यांना घराघरात पोहोचवलंय. अक्कांच्या कवितांची सोनपावलं घरात येतात, तेव्हा आपल्याही मनाची स्थिती अशीच तर होते...

भिंती रंगल्या, स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच, नाही मिटायाची बोली

इंदिरा संत यांची कविता आणि निसर्ग वेगळा काढताच येत नाही. निसर्गातल्या प्रतिमा कवितेत अवतरतात आणि अवघी कविता निसर्गरूपात आपल्यापुढं उभी ठाकते. ती समजण्यासाठी सूर्यकिरण रांगोळी घालू या असं म्हणतात, तर पागोळ्या दवाचं शिंपण करू या म्हणतात... बाग म्हणते फुलांनी ओंजळ भरू या, आशीर्वाद देण्यासाठी केळ पुढं येते... सोनचाफ्याचं इवलंसं रोप कवयित्रीनं बागेत लावण्यासाठी आणलंय, तर त्याच्या स्वागतासाठी सारे कसे उत्सुक आहेत बघा...

सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी
शिंपू पायावरी दंव, म्हणे वरून पागोळी
भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून
देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हसून... 

अक्कांचं हे कल्पनावैभव पाहून आपण स्तिमित होतो. निसर्गातली प्रत्येक गोष्ट नव्हे, तर साक्षात निसर्ग, स्वागतासाठी सज्ज झालाय... अर्थ, रंग, स्वाद, नाद ल्यालेली पंचेंद्रियांच्या संवेदनांचा अनुभव देणारी इंदिरा संतांची ही कविता नववर्षाचंच नव्हे, तर त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधणाऱ्या क्षणांचंही, आगळंवेगळं स्वागत करणारी आहे. नवे शब्द, नवा घाट, अभिव्यक्तीतलं नवेपण म्हणजे इंदिरा संतांची कविता. आता हीच ओळ बघा ना...

येरझारा घाली वारा गंध मोतिया घेऊनि
सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी... 

जेव्हा प्रिय व्यक्तीचं आगमन होणार असतं, तेव्हा दारात आपण उपस्थित हवंच. स्वागतासाठी सज्ज असतो ना आपण, अगदी तसंच काहीसं वाऱ्याचंही...  हा वारा कसा, तर मोतिया गंध लाभलेला... वारा जो कधी दृष्टीस पडत नाही, पण कवयित्रीला तो येरझारा घालताना दिसतो आणि गंध तरी दिसतो का कधी आपल्याला? पण हा वारा मोतिया रंग नाही, तर मोतिया गंध लाभलेला आहे. रस, रंग, गंध, स्पर्शानं रोमांचित होणारी इंदिरा संतांची कविता संगीतकार गिरीश जोशी यांनी स्वरबद्ध केली आणि पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या आस्वादक गळ्यातून अवतरली. कवितेला स्वरांचं तोरण बांधलं जातं, तेव्हा रसिक मनाचं घर आनंदानं नाचू लागतं. असाच अनुभव म्हणजे इंदिरा संतांची कविता. नववर्षाचं स्वागत करताना पुन्हा पुन्हा ऐकली आणि आता चार जानेवारीला त्यांचा जन्मदिन साजरा करताना पुन्हा ऐकणार. मनात एक कल्पना आली, की चार जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यातील इंडी या गावी जन्म झाला, तेव्हा त्यांच्या आईच्या मनाची हीच अवस्था झाली असेल... ‘माझ्या घरी आज सोनचाफ्याची पावलं येणार आहेत.’ इंदिराअक्कांच्या रूपानं सरस्वतीच्या दरबारातही त्यांच्या कवितांच्या सोनचाफ्याची पाऊलं उमटली. त्या सोनचाफ्याचा दरवळ प्रत्येक नववर्ष साजरा करताना अनुभवायलाच हवा... स्वागतासाठी कवितेचं तोरण बांधायलाच हवं... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

(इंदिरा संत यांच्या ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची ‘गवतफुला रे गवतफुला’ ही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Meghana ( shubhada ) Limaye , About 345 Days ago
खूपच छान
0
0
डॉ हरीश कुलकर्णी About 346 Days ago
सुरेख, जुन्या जाणकार आणि सिद्धहस्त कवयित्रीची आठवण जागी झाली, धन्यवाद
0
0
सुचेता खेर About 347 Days ago
फारच सुंदर उपक्रम ! इंदिरा संत यांच्या कविता सुंदरच आहेत ..
0
0

Select Language
Share Link