Next
कोकणी, मालवणी आणि गोमंतकीय भाषेची ‘अमृतवाणी’
प्राची गावस्कर
Wednesday, January 31 | 10:05 AM
15 0 0
Share this story

म्हणींचे भाषेमधील स्थान, त्यांची उत्पत्ती विशेषतः मालवणी, कोकणी आणि गोमंतकीय भाषेतील म्हणी, त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक अंगाने विश्लेषण डॉ. विद्या प्रभुदेसाई यांनी ‘अमृतवाणी’ या आपल्या पुस्तकात केले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
.......
रोजच्या जीवनात बोलताना अनेकदा आपण अगदी सहजपणे अनेक म्हणी वापरत असतो. कोणत्याही भाषेत म्हणी नाहीत, असे नाही. एकाच अर्थाची म्हण विविध भाषांमध्ये आढळते. एकच म्हण सार्वत्रिक अनुभवाचे प्रतिनिधfत्व करते. या म्हणींचे भाषेमध्ये एक वेगळेच महत्त्व आहे भाषेला सामर्थ्य बहाल करण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. मानवी जीवनातील अनुभवांचे सार म्हणीमध्ये भरलेले असते. फार काही स्पष्टीकरण न देता या म्हणी अगदी थोडक्यात आपल्याला काय म्हणायचे आहे ते नेमकेपणाने सांगतात. अशा ‘म्हणीं’चे भाषेमधील स्थान, त्यांची उत्पत्ती विशेषतः मालवणी, कोकणी आणि गोमंतकीय भाषेतील म्हणी, त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक अंगाने विश्लेषण डॉ. विद्या प्रभुदेसाई यांनी ‘अमृतवाणी’ या आपल्या पुस्तकात केले आहे. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांमध्ये एमए केलेल्या आणि मराठीत एम. फिल., पीएचडी करून फोंडा येथील रवी सीताराम नाईक महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी ३० वर्षे काम केले आहे. कोकणी, मराठी भाषांचा मालवणी बोलीवरील प्रभाव, अ. का. प्रियोळकरांचे ललित गद्य हे प्रकल्प, अप्रकाशित बाकीबाब, चंद्रफुलांची छत्रे ही पुस्तके विद्या प्रभुदेसाई यांनी संपादित केली आहेत. कोकणी, मालवणी आणि गोमंतकीय भाषांचा त्यांचा अभ्यास, प्रभुत्व या पुस्तकातून स्पष्टपणे जाणवते. 

या भाषा त्या बोलणाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना त्या सारख्याच वाटतात; पण या तिन्ही भाषांमध्ये खूप फरक आहे. कोकणी, मालवणी आणि गोमंतकीय भाषांमधील सूक्ष्म फरक या म्हणींच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे स्पष्ट केला आहे. या भाषांमधील गोडवा, चुरचुरीतपणा वेगवेगळ्या म्हणींमुळे अगदी अचूकपणे दिसून येतो. विस्मृतीत गेलेल्या अनेक म्हणी या पुस्तकात दिल्या आहेत. त्या वाचताना मजा वाटते. मानवी विकासाशी संबधित तीन घटक म्हणजे संस्कृती, समाज आणि भाषा. माणसाने भाषा बनविली आणि भाषेने माणूस घडवला. भाषा ही पाण्याप्रमाणेच वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळी रूपे घेते. भाषेचा इतिहास पाहिल्यास भाषेने कितीतरी वळणे घेत आपली रूपे बदलली दिसतात. भाषेतील या बदलांचे दर्शन घडते ते लोकसाहित्यातून.

एखाद्या समाजातील संस्कृती, प्रचलित समजुती हे लोकसाहित्यातून लोकगीते, लोककथांबरोबरच म्हणी, वाक्प्रचार, लोकोक्ती या माध्यमांतून समाजाला मिळत असते. म्हणींच्या उत्पत्तीबाबत विचार केला, तर म्हणीमधील अनुभव हा खरा एकाचा अनुभव असतो; मात्र त्यातील अनुमान सार्वत्रिक असते. एकाच सांस्कृतिक पातळीवरील लोकांना ते अनुमानाने पटते आणि लोक तिचा वापर करतात, म्हणजे म्हणतात म्हणून ती ‘म्हण’ होते. अशा या म्हणी कोकणी, मालवणी आणि गोमंतकीय भाषेत कशा असतात, त्यांचा वापर कसा केला जातो. याचे अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात दिसते. म्हणींचे सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या विश्लेषण, संशोधन केले, तर लोप पावलेला स्थानिक इतिहास आणि संस्कृती यांचे दर्शन त्यांच्या आधारे घडू शकते आणि त्याचबरोबर त्या भाषेवर झालेल्या अन्य भाषांच्या परिणामाचे स्वरूप जाणून घेता येते. त्यामुळे संपादन करताना भाषेवरील प्रभुत्व, त्या भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, लोकोक्ती यांचा अभ्यास अनिवार्य ठरतो, तरच ती भाषा आपलीशी होते. सहज आत्मसात करता येते. अशा भाषा अभ्यासात हे पुस्तक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे भाषाप्रेमींसह भाषा अभ्यासकांसाठीदेखील हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

पुस्तक : अमृतवाणी
लेखिका : डॉ. विद्या प्रभुदेसाई
प्रकाशन : मित्र समाज प्रकाशन
पृष्ठे : २२२
किंमत : २१० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link