Next
लोकमान्य टिळक, लक्ष्मण गायकवाड
BOI
Sunday, July 23, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेले लेखक लोकमान्य टिळक, तसंच ‘उचल्या’ समाजाविषयी समाजाला नव्यानं विचार करायला भाग पाडणारे लेखक लक्ष्मण गायकवाड यांचा २३ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याबद्दल...
...........
लोकमान्य टिळक

२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीत जन्मलेले केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील असामान्य बुद्धिमत्ता असलेले, लोकप्रिय आणि झुंजार नेते!

‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रं सुरू करून, त्यातल्या अग्रलेखांद्वारे त्यांनी ब्रिटिशांवर टीकेचा भडिमार केला होता. अत्यंत जहाल विचारसरणीचे, उघड उघड स्वराज्याची मागणी करणारे टिळक, ब्रिटिशांसाठी मोठेच शत्रू ठरले आणि म्हणूनच त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून दोन वेळा कारावास ठोठावण्यात आला. तिथं त्यांना सामान्य कैद्यासारखी वागणूक देण्यात आली होती, ज्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ते खऱ्या अर्थाने अध्वर्यू होते.

टिळकांना हे जाणवलं होतं, की राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपला धर्म, संस्कृती, इतिहास यांच्याबद्दल लोकांच्या मनात जाज्ज्वल्य अभिमान हवा आणि एकीची भावना हवी आणि त्याचसाठी १८९३मध्ये त्यांनी, घराघरांत चालणाऱ्या पारंपारिक गणेशोत्सवाला सार्वजनिक महोत्सवाचं स्वरूप दिलं, जेणेकरून हिंदूंमध्ये एकी होईल आणि त्याचबरोबर ब्रिटिशांविरुद्ध प्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांनी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली, ज्यामुळे हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ लागला.

गणित, प्राच्यविद्या, तत्त्वज्ञान व ज्योतिर्विज्ञान हे टिळकांचे आवडते विषय होते आणि त्यांनी या विषयांवर भरपूर लेखन केलं आहे. ‘आर्य लोक उत्तर ध्रुवीय प्रदेशात राहात होते आणि ख्रिस्तपूर्व पाच हजार वर्षांच्या हिमयुगाच्या काळात, त्यांना आपली भूमी सोडून दक्षिणेकडच्या (उत्तर युरोप आणि उत्तर आशिया) मधल्या देशांत वस्तीला यावं लागलं,’ हे वेदांमधले श्लोक आणि झेंद अवेस्ताच्या संदर्भातून मांडणारं ‘दी आर्क्टिक होम इन दी वेदाज’ यासारखं पुस्तक, भगवद्गीतेवर आधारित ‘श्रीमद्भगवद्‌गीतारहस्य’ आणि वेदकाल निश्चिती, यज्ञ, संवत्सर यांसारख्या विषयांवरच्या चिंतनपर लेखांचं ‘मृगशीर्ष’ (दी ओरायन) ही टिळकांनी लिहिलेली आणि आजही अभ्यासावीत अशी तीन प्रमुख पुस्तकं आहेत.

पुण्यामध्ये टिळकांनी आपल्या सहकाऱ्यांसह न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था उभारल्या.
एक ऑगस्ट १९२० रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं, तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेसाठी ‘न भूतो’ असा जनसागर उसळला होता.
............

लक्ष्मण गायकवाड
 
भारताला जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचा मोठा शाप आहे. अशाच गाव, घर, जात, शेत, जन्मदिवस आदींचा धड पत्ता नसलेल्या एका कुटुंबात लक्ष्मण गायकवाड यांचा जन्म २३ जुलै १९५६ रोजी झाला.

त्यांच्या जातीतल्या लोकांना हजारो वर्षांपासून जबरदस्तीने, उपजीविकेच्या सर्व कायदेशीर साधनांपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे केवळ चोरी करून जगणंच हातात उरलं आणि जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसवला गेला. चोरीमारी करणारे ‘उचले’ म्हणून ओळखले जाण्याची मानहानी स्वीकारावी लागली. म्हणून आपल्या जातीच्या व्यथा आणि दुदैवी कथा, प्रस्थापित समाजासमोर आणण्यासाठी आणि त्यातून त्यांना अंतर्मुख करून उचल्या समाजाविषयी नव्याने विचार करण्यास भाग पडण्यासाठी त्यांनी ‘उचल्या’ हे आत्मचरित्र लिहिलं, ज्याने समाजात खळबळ माजवली. पुस्तक प्रचंड गाजलं. हिंदी, इंग्लिश, कानडी, बंगाली, तेलुगू, उर्दू आणि फ्रेंच भाषेत त्याचं भाषांतर झालं.

गायकवाड यांनी भटक्या, विमुक्त, पीडित, शोषित समाजघटकांसाठी पूर्ण वेळ काम करणं चालू केलं. त्या काळी त्यांनी राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, नरसिंहराव या तीन पंतप्रधानांशी चर्चाही केली होती.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना साहित्य अकादमी, महाराष्ट्र गौरव, पानघंटी पुणे समता, संजीवनी अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. ‘दुभंग’, ‘चिनी मातीतील दिवस’, ‘वडार वेदना’ ही त्यांची अन्य गाजलेली पुस्तके आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
jadhav chandrakant kerba About
Thanks sir Mr. Lakshman ji gaikwad tumhi (wadar)samaja sathi khup sundar karya kele aahe.
0
0
Santosh Bhagwan Devkar About
Nice very nice
0
0

Select Language
Share Link
 
Search