Next
कोकीळ कुहुकुहु बोले...
BOI
Tuesday, March 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गुढीपाडव्याचा सण साजरा झाला आणि ऋतुराज वसंताचं आगमन झालं. मोहरलेला आम्रवृक्ष, कोकिळेची साद आणि तांबूस कोवळ्या नवपल्लवांनी बहरलेली झाडं अशा वसंतवैभवानं आपलं तनमन मोहरून जातं. या औचित्याने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या ‘कोकीळ कुहुकुहु बोले...’ या गाण्याचा...
..........
गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. नववर्षाच्या नव्हाळीला नवचैतन्याचा साज चढवणाऱ्या ऋतुराज वसंताचं रसिक मनाला अप्रूप वाटत राहतं. पुन्हा पुन्हा विस्मयचकित होत वसंतवैभव आपण डोळे भरून पाहत राहतो. रेशीमवस्त्र, कलश, साखरेच्या गाठी आणि टवटवीत फुलांचा हार, त्याबरोबरच कडुनिंबाची हिरवीगार डहाळी, या सर्व अलंकारांनी नटलेली, दिमाखात उभी असलेली गुढी मनातून अजूनही उतरलेली नाही. त्याबरोबरच कडुनिंबाची पानं, धणे, गूळ, हिंग, खोबरं एकत्र कुटून केलेल्या चूर्णाचा स्वाद अजूनही जिभेवर रेंगाळतोय... बालपणी तो कडवट प्रसाद आई खायला द्यायची, तेव्हा तोंड वेडंवाकडं करत आम्ही बळेबळेच खायचो. खरं लक्ष असायचं हार-गाठ्यांकडे. उन्हं उतरल्यानंतर गुढी उतरवली, की हार-गाठ्यांचा प्रसाद मिळायचा; मात्र ते कडुनिंबाच्या पानांचं चूर्ण, आई त्याला ‘प्रसाद’ म्हणूनच आम्हाला खायला द्यायची. खाल्लंच पाहिजे म्हणून आग्रह धरायची. याचं कारण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा कडवट प्रसाद खाल्यानं पुढं वर्षभर पोटाचे विकार फिरकत नाहीत. निरामय आरोग्यासाठी कडवट चव लक्षात न घेता तो प्रसाद खाल्लाच पाहिजे, असं ती सांगायची. 

बालपणीच्या चैत्रातल्या आठवणी निराळ्या, निरागसता जपणाऱ्या. कळत्या वयात मात्र वसंतवैभवाच्या खुणा पाहण्याचा छंदच जडला. मोहरलेला आम्रवृक्ष, कोकिळेची साद आणि तांबूस कोवळ्या नवपल्लवांनी बहरलेली झाडं, सुगंधी सोनचाफा आणि मोगरा मनात आजही दरवळतोय. निसर्गातलं नवचैतन्य आणखीच बहारदार वाटत गेलं याचं श्रेय स्वरांनी मोहरलेल्या कविता, गाणी ऐकण्याचं वेड! निसर्गातलं वसंतवैभव आणि मराठी भावविश्वातलं, भावसंगीतातलं वसंतवैभव डोळे आणि मन तृप्त करणारं! वसंत ऋतू आला रे आला, की ज्या ज्या गाण्यांमध्ये ‘वसंत’ आहे ती ती गाणी प्रसारित करायची आणि रसिकांसह ती ऐकण्याची मजा आकाशवाणीमुळे भरभरून लुटता आली. खरं सांगते, आत्ता या क्षणी कितीतरी गाणी आठवताहेत; पण एक गाणं मात्र मनामध्ये सतत रुंजी घालतंय. खरं म्हणजे साद घालतंय, असं मला म्हणायचंय. कोकीळ साद घालतो ना, अगदी तस्संच... गंमत म्हणजे या गाण्याशी ऋतुराज वसंताचा संबंध आहेच, त्याबरोबरच संगीतविश्वातील ‘वसंताचा’ही संबंध आहे, तो म्हणजे संगीतकार वसंत प्रभूंचा! आमराईत घुमणाऱ्या कोकीळ स्वरांबरोबर मानवी दुनियेतील एक अलौकिक कोकीळस्वर लतादीदींच्या रूपानं अनुभवण्याचं भाग्य आपल्याला मिळतं.

कोकीळ कुहुकुहु बोले
तू माझा, तुझी मी झाले... 

बघा, तुम्हीही नकळत गायला लागलात ना? ही जादू या चिरतरुण स्वरांची! अहाहा! दीदींच्या गळ्यातून साक्षात वसंतवैभव चांदण्यासारखं, निखळ, निर्मळ झऱ्यासारखं पाझरतं. अन् आपण अक्षरश: स्वरचांदण्यात न्हाऊन निघतो. पी. सावळारामांचे शब्द आणि वसंत प्रभू यांचं संगीत. छे! काही बोलण्यापेक्षा ऐकतच राहू या असं वाटतं.

ऋतुराजा तुझी वासंती
तरूतळीं इथे एकांती
करकोमल देता हातीं
चांदण्यांत दिवसा न्हाले... 
कोकीळ कुहुकुहु बोले... 

गाणं ऐकता ऐकता साठच्या दशकातला ‘कन्यादान’ हा नितांतसुंदर मराठी चित्रपट आठवला. ज्यांचा नुकताच, म्हणजे नऊ मार्चला स्मृतिदिन होता त्या सोज्वळ चेहऱ्याच्या उषा किरण आठवल्या. पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘जगावेगळं सासर’ या मूळ कथेवर बेतलेला ‘कन्यादान’ हा चित्रपट. उषा किरण, सूर्यकांत, राजा गोसावी यांच्या सहजसुंदर अभिनयानं नटलेला हा चित्रपट. याबरोबरच पी. सावळाराम यांची गीतं आणि वसंत प्रभू यांचं संगीत. यामुळं ‘कन्यादान’ हा चित्रपट केवळ अविस्मरणीय! 

ऋतुराज वसंताच्या आगमनानंतर कोकीळ आणि कावळा यांच्यातला फरक ओळखणं सोपं होतं, हे सांगणारा संस्कृतात एक श्लोक आहे, त्याचीही हमखास आठवण येते. 

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेदः पिककाकयो:।
वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक:।

कावळाही काळा, पिक म्हणजे कोकीळही काळा; पण वसंत ऋतू आल्यावर कोकीळ आणि कावळा यातला फरक समजणं अगदी सोपं होतं. या श्लोकाची आठवण येण्याला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे गायक कलाकार बरेच असतात, संगीतकारही असतात; पण जाणकारांच्या कानावर जेव्हा ते स्वर पडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की ‘सुस्वर, सुमधुर’ कोण आणि ‘बेसूर’ कोण? थोडक्यात काय वसंत प्रभूंसारखे संगीतकार एखाद्या कवितेचं गाणं करतात, तेव्हा त्या कवितेचं सोनं होतं. चांगल्या गीताची माती करणारे संगीतकार अवतीभवती असतात, तेव्हा ‘कोकीळ कुहुकुहु बोले’ यासारख्या गाण्याची आवर्जून आठवण येते. त्या स्वरांचं बोट धरून त्या अजरामर ठरलेल्या अवघ्या चित्रपटाची सफर आपण करून येतो. सूर्यकांत आणि उषा किरण यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं म्हणजे मराठी चित्रपटाच्या संगीत विश्वातला सदासतेज बहरलेला ऋतुराज वसंत! हळुवार, उत्कट प्रीतभावना संयमित रूपात कशी व्यक्त करता येते, याचं उत्तम उदाहरण पी. सावळाराम यांची ही कविता, उषा किरण आणि सूर्यकांत यांचा अभिनय आणि वसंत प्रभू यांचं आनंदविभोर करणारं संगीत म्हणजे कन्यादान या चित्रपटातलं हे गीत. वसंत प्रभू हे डान्समास्टर होते याची प्रचिती देणारं हे द्रुत लयीतलं तन-मन डोलवणारं गीत ऐकणं आणि पाहणं अशा दोन्ही गोष्टी अतिशय सुखद, आनंददायी. तीन कडव्यांचं हे गाणं कधी संपतं ते कळतही नाही. कुठेही उच्छृंखलतेला थारा नाही, विषयवासनेचा वारा नाही. आहे फक्त सूचक, संयमाधिष्ठित नाजूक, मुग्ध प्रीतभावना! 

मोहरून डहाळीवरती
आपुली हिंदोळत प्रीती
निर्झरात टिपण्या मोती
पाखरू जिवाचे झाले... कोकीळ कुहुकुहु बोले... 

हल्लीची काही गाणी विषयवासना चाळवणारी. त्याउलट ‘कन्यादान’ या चित्रपटातली दृश्यं प्रेमभावनेतली मुग्धता, कोमलता व्यक्त करणारी, संयत अभिनयानं आणि दृष्य परिमाणांनी नटलेली ‘कोकीळ कुहुकुहु बोले’सारखी गाणी यांच्यात नकळत तुलना होतेच. मानवी भावनांचं दर्शन सूचकतेनं जितकं प्रभावी होऊ शकतं, तितकं वास्तवदर्शीपणाच्या नादात अती उघड दृश्यांनी, शब्दांनी होत नाही, हे सत्य हल्ली काही लोक लक्षातच घेत नाहीत याचा खेद वाटतो. नवं ते सगळंच टाकाऊ, वाईट, क्लेशकारक आहे असं नाही; पण अशांची संख्या अत्यल्प आहे, हेही नाकारता येत नाही. ‘कन्यादान’ या चित्रपटाचा काळ लक्षात घेता त्या चित्रपटात मांडलेला विचार, पुरोगामित्वाला घातलेली साद खरोखर अंतर्मुख करणारी. असे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. त्यातली आनंददायी गाणी मनाला प्रफुल्लित करतात. धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात अशी गाणी तनामनाला श्रांत करतात. थकवा कुठल्या कुठे दूर पळून जातो. मनावरची मरगळ दूर होते. वसंतवैभवाचा, नवचैतन्याचा अनुभव येतो. नववर्षानिमित्त नवनवे संकल्प करणं आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडणं यासाठी मन आनंदी असणं फार गरजेचं आहे. ही गरज भागवतात सुमधुर स्वरांनी मोहरलेली गाणी, कविता! जी वर्षानुवर्षे आपल्या मनातला ‘आम्रवृक्ष’ बहरत ठेवतात. कोकिळस्वरांची साद आणि रसिकांचा प्रतिसाद म्हणजे लतादीदींच्या स्वरातलं पी. सावळाराम यांचं वसंत प्रभूंनी स्वरसाज दिलेलं हे गीत... किती प्रासादिकता, किती भावमधुरता आणि प्रीतभावनेची किती कोवळीकता! 

तू येता सखया जवळी
फुलवेल तरुला कवळी
मधुमरंद भरतो कमळी
अंतरात मिटता डोळे... 
कोकीळ कुहुकुहु बोले... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dinesh Dagadkar About
खूपच सुंदर
0
0
हरीश कुलकर्णी About
जितके सुंदर शब्द तितकेच अलवार विवेचन, अप्रतिम
0
0
DR MAHAVIR SHAH About
ऋतुराज वसंत बद्दल उकृष्ट लिखाण व माहिती
0
0
मोहन About
खूपच छान !
1
0

Select Language
Share Link
 
Search