मुंबई : एक अत्यंत सामान्य कथा, परंतु पुरेपूर विनोदाने भरलेली अशी ९०च्या दशकातील लोकप्रिय टिव्ही मालिका ‘हम पांच’ माहित नसलेला प्रेक्षक निराळाच. ही मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात आणि नवीन कलाकारांसोबत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेचे हे तिसरे पर्व असेल.

अत्यंत सरळ-साधी कथा, आपल्या आजूबाजूला दिसणारी पात्रे घेऊन रंगवलेले अफलातून विनोदी किस्से यांमुळे ९०च्या दशकातील ‘हम पांच’ ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरली. दोन पर्वांनंतर आता तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना हसवण्यास ‘हम पांच फिर से’ या नावाने ही मालिका येत आहे. मात्र सुरुवातीच्या दोन पर्वांची निर्माती असलेली एकता कपूर या पर्वाची निर्माती नसेल. ‘एसेल व्हिजन प्रोडक्शन’तर्फे या तिसऱ्या पर्वाची निर्मिती करण्यात आली आहे.
या मालिकेशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीचा ढाचा तसाच ठेवून बदलत्या काळानुसार नवीन मालिकेत काही बदल करण्यात आले आहेत. शिवाय मालिकेतील संपूर्ण पात्रे तीच असली तरी ती साकारणारे कलाकार नवीन असतील. ‘हम पांच’ मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेते अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, शोमा आनंद, विद्या बालन, राखी टंडन, भैरवी रायचुरा, वंदना पाठक आणि प्रियंका मेहरा हे कलाकार दिसले होते. यानुसार आता नवीन मालिकेत आनंद माथूरच्या भूमिकेत सूरज थापर, वैष्णवी मॅकडोनाल्ड प्रिया तेंडुलकरच्या भूमिकेत दिसेल. सीमा पांडेय बीना च्या भूमिकेत दिसेल. जयश्री वेंकटरमण काजोल भाईच्या भूमिकेत दिसेल.
आनंद माथूर नावाची व्यक्ती आपल्या पाच मुली आणि दोन (एक हयात असलेल्या आणि एक नसलेल्या) बायकांमुळे सतत वेगवेगळ्या समस्यांमध्ये कसा फसत जातो, यावर हा विनोदी खेळ होता, तो तसाच पुन्हा असेल का, ही उत्सुकता आहेच.

१९९५मध्ये सुरू झालेले ‘हम पांच’ मालिकेचे पहिले पर्व १९९९मध्ये संपले होते. त्यानंतर २००५मध्ये ‘देख भाई देख’ नावाने विनोदी मालिकेच्या स्वरूपात दुसरे पर्व दाखवले गेले होते, ज्यात आनंद माथूर नावाच्या व्यक्तीची कथा दाखवली गेली होती आणि आता ‘हम पांच फिर से’ नावाने या मालिकेचे तिसरे पर्व दाखवण्यात येणार आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे सांगण्यात येत आहे.