मोहनवीणा या अनोख्या वाद्याची मोहिनी अवघ्या जगाला घालणारे पंडित विश्वमोहन भट आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख व छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय.. ........
पंडित विश्वमोहन भट
२७ जुलै १९५० रोजी जयपूरमध्ये जन्मलेले पंडित विश्वमोहन भट हे भारतीय शास्त्रीय संगीतामधलं एक जगप्रसिद्ध नाव! त्यांनी ‘मोहनवीणा’ या सहा तारांच्या हवाईयन गिटारमध्ये तांत्रिक बदल घडवून बनवलेल्या वाद्याद्वारे अद्भुत संगीत निर्माण करून जगभरच्या रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. ते पंडित रविशंकर यांचे शिष्य आहेत. राय कुडरबरोबर त्यांनी बनवलेल्या ‘ए मीटिंग बाय द रिव्हर’ या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना मोहनवीणा वादनासाठी आणि फ्युजन कॉन्सर्टसाठी जगभरातून मानाची बोलावणी येत असतात. सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.
.....
उद्धव ठाकरे
२७ जुलै १९६० रोजी मुंबईत जन्मलेले उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा आली ती २००३-०४ मध्ये. त्याआधी ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. २००२मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेने विजय मिळवला आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर २००३मध्ये त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. ‘जे. जे. कॉलेज ऑफ अॅप्लाइड आर्टस्’मधून ‘फाइन आर्टस्’मध्ये पदवी घेतलेले उद्धव ठाकरे उत्तम छायाचित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची हेलिकॉप्टरमधून विहंगम छायाचित्रे टिपली आहेत. रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून शत्रूला धडकी भरवत ताठ मानेने उभ्या असलेल्या गडकिल्ल्यांचे राकट सौंदर्य त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात अलगद टिपले आहे. महाराष्ट्राचे निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या यांचे सौंदर्य अतिशय विलोभनीय पद्धतीने त्यांनी रसिकांसमोर आणले आहे. हे फोटो ‘
महाराष्ट्र देशा’ या पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी टिपलेल्या आषाढी वारीच्या छायाचित्रांचा संग्रह ‘
पहावा विठ्ठल’ या नावाने प्रसिद्ध आहे.
.......
यांचाही आज जन्मदिन :
ज्येष्ठ लेखिका आशा बगे (जन्म : २७ जुलै १९३९)
नवकाव्याचे प्रसिद्ध समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे (जन्म : २७ जुलै १९५३)
कथाकार, समीक्षक चंद्रकांत वर्तक
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)