Next
वंचितांची ‘स्वप्नभूमी’
मानसी मगरे
Tuesday, November 14, 2017 | 04:19 PM
15 0 0
Share this story

'स्वप्नभूमी', केरवाडी संस्थेतील मुले

समाजातील गरीब आणि वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला काहीतरी हातभार लागला पाहिजे या इच्छेने, विशेषतः लहान मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेली संस्था म्हणजे परभणीतील केरवाडी येथील ‘स्वप्नभूमी’ संस्था. आज १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. या निमित्ताने ‘लेणे समाजाचे’ या सदरात पाहू या मुलांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेबद्दल...
....................
समाजातील गरीब, दुर्लक्षित वर्गाच्या विकासासाठी आपला हातभार लागावा या उद्देशाने मराठवाड्यातील परभणी येथील सूर्यकांत कुलकर्णी यांनी १० मे १९८० रोजी केरवाडी या ठिकाणी सामाजिक आर्थिक विकास संस्था – ‘स्वप्नभूमी’ची (एसईडीटी – सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट) स्थापना केली. विशेषतः लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या या संस्थेद्वारे इतर अनेक सामाजिक घटकांवर काम केले जाते. शिक्षण, बालमजुरी, मुलांचे सामाजिक प्रश्न, सामाजिक आरोग्य, विशेष करून एचआयव्ही-एड्सशी संबंधित काम, महिला सक्षमीकरण, शेती करणाऱ्या महिलांना प्रगत शेती तंत्रज्ञानाची माहिती करून देणे, उपेक्षित मुलांचे पुनर्वसन करणे, त्यांना उत्तम दर्जाच्या शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्य आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे, यांसारखे अनेक उपक्रम ‘स्वप्नभूमी’तर्फे चालवले जातात. 
 
संस्थेने सुरू केलेले विज्ञान केंद्रसंस्थेचे मुख्य काम मराठवाडा विभागात असून, प्रामुख्याने परभणी जिल्ह्यात आहे. १९८०मध्ये परभणीतील मुलांचे पहिले अनाथालय सुरू करून संस्थेने आपल्या कामाची सुरुवात केली. विशेष म्हणजे आज संस्थेने केरवाडी येथे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र सुरू केले आहे. अनाथ मुले, मुलांचे शिक्षण व त्यांचे हक्क हा संस्थेच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. 

केरवाडी येथे तीन एकर जागेवर उभारलेली संस्थेची इमारत विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. प्रशिक्षण संस्था, व्यक्तिमत्त्व विकास संस्था आणि किमान ४० ते ६० विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. सध्या संस्थेत ७५ अनाथ मुले असून, ती साधारण पाच ते अठरा वयोगटातील आहेत. पहिली ते सातवी असे वर्ग असलेली संस्थेची स्वतःची शाळा आहे. त्यामुळे ही मुले पहिली ते सातवीपर्यंत याच शाळेत शिकतात आणि नंतर मग बाजूच्या शाळेत पुढचे शिक्षण घेतात. 

या विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे, ते घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यांचा सर्वतोपरी विकास व्हावा आणि सर्वांत मुख्य म्हणजे त्याचे पोरकेपण जावे यासाठी संस्थेचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी व माणिकताई कुलकर्णी त्या मुलांचे जणू आई-वडील होण्याचा प्रयत्न करतात. या मुलांना विशेषतः त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न संस्थेमार्फत केला जातो. 

समाजातील अनेक दानशूर संस्थेतील मुलांच्या भविष्यासाठी मदत करण्यास इच्छुक असतात, असा संस्थेचा अनुभव आहे. संस्था विविध माध्यमांतून देणगी स्वीकारते. त्यामुळे इच्छुकांनी त्यांना सोयीस्कर अशा मार्गाने मदत करावी, असे आवाहनही संस्थेमार्फत करण्यात आले आहे. येथील मुलांचा दिवसभराचा अन्नधान्याचा खर्च साधारण पाच हजार रुपये आहे. यामध्ये मुलांचे जेवण, त्या ठिकाणी काम करणारी कार्यकर्ते मंडळी अशा सर्वांचा खर्च केला जातो. संस्थेच्या माध्यमातून या मुलांना अनेक शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. मुलांचे गणवेश, बूट, वह्या, पेन्सिल, पेन अशा कितीतरी वस्तू वर्षभरात मुलांना लागतात. या वस्तूंच्या स्वरूपातही नागरिक संस्थेला मदत करू शकतात. 

स्वप्नभूमी परिवारसद्यस्थितीत संस्थेत पूर्णवेळ काम करणारे २११ कार्यकर्ते आहेत. यांच्यासाठी संस्थेने निवासाचीही व्यवस्था केलेली आहे. मुलांसाठी, तसेच मोठ्यांसाठीही संस्थेचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. याबरोबरच विविध प्रकारचे वैज्ञानिक साहित्यही मुलांना दाखवण्यासाठी येथे ठेवण्यात आले आहे. मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘स्वप्नभूमी’ असेच कार्य करत राहो, या शुभेच्छा!

संपर्क : स्वप्नभूमी, केरवाडी, ता. पालम, जि. परभणी 
मोबाइल : ९९२२९ १४१२०, ९९२२९ १४१०२ 
ई-मेल : sedtindia@gmail.com
वेबसाइट : www.sedtindia.org

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेचे विष्णू जाधव यांनी संस्थेबद्दल दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link