Next
थिबा राजवाड्याची सर्व दालने सजणार प्रदर्शनांनी
आर्ट सर्कलच्या कला संगीत महोत्सवात कला जत्रेचे आयोजन
BOI
Wednesday, January 16, 2019 | 04:23 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलतर्फे थिबा राजवाड्यात २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत होणाऱ्या संगीत महोत्सवादरम्यान कलाजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनामार्फत हाती घेण्यात आलेले राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर पूर्ण केले जात असल्याने संपूर्ण राजवाडा कलाजत्रेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा राजवाड्याची सर्व दालने विविध प्रदर्शनांनी सजणार आहेत.
 
मोबाइल फोटोग्राफीमध्ये हातखंडा असणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार इंद्रजीत खांबे आणि ‘स्टोन अँड पेबल आर्ट’ अर्थात दगड आणि गोटे यांच्या साहाय्याने अप्रतिम कलाकृती साकारणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रितिका पालकर हे या वर्षी पहिल्यांदाच महोत्सवात सहभागी होत आहेत. बेळगाव येथील सुप्रसिद्ध कलाकार अशोक ओऊळकर यांची ‘पेंटिंग विदाउट पेंट’ या संकल्पनेला धरून केलेली अप्रतिम कोलाज चित्रे, शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या कलाकार मुलांच्या ‘रंगभ्रमंती’ ग्रुपमधील बालकलाकारांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन काढलेली चित्रे या प्रदर्शनात पहायला मिळतील. याच ‘रंगभ्रमंती’मधून पुढे आलेला आणि सध्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकणारा ऋषिकेश मुळ्ये याच्या चित्रांचाही यात समावेश आहे.

पुरातत्व खात्यातर्फे घेण्यात आलेल्या पुरातत्व वस्तू चित्रकला स्पर्धेच्या सर्व कलाकारांची चित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित केली जाणार असून, शहरातील फाटक प्रशालेतील मुलांचेही चित्रप्रदर्शन या वेळी पाहता येणार आहे. धामणसे गावातील ओंकार पांचाळ हा तरुण पोस्टकार्डवरील चित्रे आणि लाकडातील कोरीव काम केलेल्या कलाकृतींसह, तर गणपतीपुळे येथील पूजा काळोखे सावंतवाडी येथे निर्माण होणाऱ्या मातीच्या नाजुक कलाकृतींसह सहभागी होत आहेत. नारळाच्या करवंट्यांपासून लक्षवेधक अशा कलाकृती बनवणारे दिलीप विरनोडकर हे या वर्षीच्या कलाजत्रेच्या आकर्षणाचा विषय आहेत.

ओरिगामीमध्ये हातखंडा असणारे रत्नागिरीचे कलाकार नरेंद्र घाणेकर यंदाही अशाच नाविन्यपूर्ण कलाकृती प्रदर्शनात मांडणार आहेत. खास लोकाग्रहास्तव टॅटू, मेंदी कलाकारांना या जत्रेत सहभागी करून घेण्यात आले आहे. पुण्यातील पेपर क्विलिंगचे कलाकार आणि चित्रकार प्रवीण पांडकर, संतोष महाडिक, आनंद उशिरे हे आणि रूपा गरुड त्यांच्या कलाकृतींसह यंदा महोत्सवात सहभागी होणार असून, श्वेता केळकर आणि ऋग्वेद जाधव या नव्या पिढीतील आश्वासक चित्रकारांची कला रसिकांना पाहायला मिळणार आहे. या वेळी ऋग्वेद हा प्रदर्शानाच्या ठिकाणी प्रात्यक्षिकेदेखील सादर करणार आहे.

लेन्स आर्ट या रत्नागिरीतील हौशी छायाचित्रकारांचा ग्रुपतर्फे यंदाही नव्या विषयाला अनुसरून छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. देवरुखच्या कला महाविद्यालयात (डी कॅड) असणाऱ्या अनेक कलांची मांडणी महोत्सवात केली जाईल. यात रसिकांना स्वतःचे पेन्सिल स्केच काढून घेता येईल; तसेच चाकावर मातीची भांडी बनवण्याचा अनुभव घेता येईल आणि याच्याच जोडीला विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती पाहता येतील. दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कलेमधून उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी रत्नागिरीत अवेकनिंग ट्रस्ट गेली काही वर्ष काम करत आहे. हा ट्रस्टदेखील या मुलांनी केलेल्या सर्जनशील निर्मितीसह सहभागी होणार आहे.

या कला जत्रेसाठी मोठ्यांना १० रुपये आणि लहान मुलांना पाच रुपये असे नाममात्र शुल्क आकारले जाईल. वार्षिक सभासदांना कार्ड दाखवून मोफत प्रवेश मिळेल. २६ आणि २७ जानेवारीला इंद्रजीत खांबे यांचे मोबाइल फोटोग्राफी आणि डॉ. स्वप्नजा मोहिते यांची पेंटिंगची दोन तासांची कार्यशाळा होणार आहे.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी संपर्क :
दीप्ती कानविंदे :
७७७५८, ७७६०६
सिद्धेश वैद्य : ९९७०२ ४५९६२
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search