Next
पुन्हा महासंगणक, पुन्हा संस्कृत....!
BOI
Monday, June 25, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

‘महासंगणकाच्या (सुपर कॉम्प्युटर) कोडिंगसाठी संस्कृतचा उपयोग करण्याबाबत सरकार विचार करत आहे,’ असे सांगून केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी परत एका वादाला तोंड फोडले आहे. अर्थात हा वाद अन्य राजकीय वादाएवढा जोरदार नसेल, तेवढा तीव्रही नसेल, परंतु तो असेल. या पार्श्वभूमीवर विशेष लेख...
...........
‘महासंगणकाच्या (सुपर कॉम्प्युटर) कोडिंगसाठी संस्कृतचा उपयोग करण्याबाबत सरकार विचार करत आहे,’ असे सांगून केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी परत एका वादाला तोंड फोडले आहे. अर्थात हा वाद अन्य राजकीय वादाएवढा जोरदार नसेल, तेवढा तीव्रही नसेल, परंतु तो असेल. या वादाच्या निमित्ताने थोडाफार का होईना, धुरळा उडणार आहे आणि संस्कृतबाबत आस्था असणाऱ्यांना म्हणूनच त्यासाठी सरसावून बसावे लागणार आहे. 

‘महासंगणकासाठी संस्कृत श्रेष्ठ आहे. महासंगणकाच्या कोडिंगसाठी संस्कृतचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण भविष्यातील सामान्य तंत्रज्ञानाशी अनुकूल होऊ शकेल, अशी ती एकमेव भाषा आहे,’ असे हेगडे म्हणाले. महासंगणकाच्या संदर्भात गेल्या आठवड्यात मंत्रिगटाची बैठक झाली. त्या वेळी अनंत कुमार यांनी सांगितले, की भविष्यातील महासंगणकाच्या आज्ञावलीसाठी जी भाषा असते, त्याचे अल्गोरिदम संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे महासंगणकासाठी इंग्रजी भाषा नव्हे, तर संस्कृतचाच उपयोग करावा लागेल. ‘संस्कृत भाषेवरील प्रभुत्व वाढेल, अशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत. पुढील पिढी तंत्रज्ञानस्नेही व्हायची असेल, तर संस्कृत भाषा माहीत असणे आणि समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले. 

संस्कृत हा भारताचा सर्वांत मोठा वारसा आहे. परंतु दुर्दैवाने तो सर्वांच्या हातात नाही, आवाक्यात नाही. त्यामुळे संस्कृतबाबत आहे-नाही तो अभिनिवेश गोळा करून धाडसी विधाने करणे अनेकांच्या अंगवळणी पडले नाही. हेगडे हे केंद्रीय मंत्री असले तरी या माळेतील ते पहिले नाहीत. त्यांच्यापूर्वी अनेकांनी अशा प्रकारची विधाने केली आहेत. यात सुदैव एवढेच, की संस्कृतसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्या लोकांमध्ये असा अभिनिवेश नाही, त्यांचे पाय अद्याप जमिनीवरच आहेत. ते पाहण्यापूर्वी प्रत्यक्षात संस्कृत आणि संगणक या संबंधांकडे पाहू. संस्कृतच्या नावासरशी छाती भरून येणाऱ्या आणि संस्कृत म्हणताच नाक मुरडणाऱ्या अशा दोन्ही गटांना वाटते तेवढा हा संबंध सरळ नाही. त्यात मोठी गुंतागुंत आहे. 

सर्वांत आधी आपण एक विरजण टाकू या. ते म्हणजे संस्कृत ही आज्ञावलीची (प्रोग्रामिंग) भाषा होऊ शकत नाही, हे स्पष्ट करू या. कोणत्याही संगणकाच्या दृष्टीने भाषा एकच असते आणि ती म्हणजे बायनरी (० आणि १ आकड्यांची). मग तुमच्या पडद्यावर कोणत्या भाषेत किंवा लिपीत अक्षरे उमटतात याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नसते. मग संस्कृत आणि संगणकाची ही जोड आली कुठून? त्याचे मूळ आहे ‘नासा’चा एक शास्त्रज्ञ रिक ब्रिग्स याने १९८५ साली लिहिलेल्या एका लेखात. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या लेखात संस्कृत ही आज्ञावलीसाठी सर्वोत्कृष्ट भाषा असल्याचे कुठेही म्हटलेले नाही; मात्र ‘संस्कृत व्याकरण ग्रंथांमध्ये अत्यंत तांत्रिक भाषा वापरली जाते. संगणक शास्त्रज्ञांना त्यातून काही कल्पना मिळू शकतात,’ असे ब्रिग्स याने म्हटले होते. आता ही नकारघंटा वाजविल्यावर अधिक खोलात जाऊ. आजचे आपले संगणकाश्रित जीवन संस्कृतच्या छायेखाली कसे चालू आहे, हेही आपल्याला एकदा कळायला पाहिजे.

संस्कृत भाषा ही अत्यंत सुरचित आणि सुनियोजित आहे, याबाबत कोणालाही शंका नाही. त्यात असे अनेक उपयुक्त सिद्धांत आहेत जे आधुनिक विषयावर लागू होऊ शकतात. फ्रान्समधील ‘इन्रिया’सारख्या संस्था त्यावर आजही कार्य करत आहेत. ब्रिग्स याच्या या लेखानंतर अनेक संशोधकांचे लक्ष त्याकडे गेले. प्रा. विनीत चैतन्य, प्रा. राजीव संघल, प्रा. व्ही. एन. झा, प्रा. के. व्ही. रामकृष्णमचार्यलु, डॉ. ऑलिव्हर हेलिव्हिग, प्रा. पीटर शार्फ, प्रा. प्रल्हाद चार आणि अन्य अनेक संगणक शास्त्रज्ञांनी, तसेच पारंपरिक विद्वानांनी त्यात लक्ष घातले. आजही हे संशोधन सुरूच आहे. यातून संस्कृत कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स (संस्कृत संगणक भाषाविज्ञान) नावाची एक शाखा तयार झाली. संस्कृतमधील काही प्राचीन सिद्धांत आधुनिक शिक्षणात कसे लागू करता येतील ते या लोकांनी दाखवून दिले आहे. हे झाले भाषाविज्ञानाच्या बाबतीत; मात्र संस्कृत आणि संगणकाचा हा सहप्रवास इथेच थांबत नाही. 

‘आयबीएम’मधील एक प्रोग्रामर जॉहन बॅकस (John Backus) याने पहिल्यांदा बॅकस-नॉर्म-फॉर्म (Backus-Norm Form) नावाची नोटेशन्स (संकेतचिन्हे) विकसित केली होती. ही नोटेशन्स संपूर्ण संस्कृत व्याकरण प्रणालीवर आधारित होती. त्यालाच नंतर १९६३मध्ये पीटर नौर याने सोपे रूप देऊन ALGOL 60 ही संगणक भाषा बनविली. त्याही वेळी या नोटेशनला ‘पाणिनी बाकस फॉर्म’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. ही सूचना पी. झेड. इंगरमन यांनी केली होती. ‘एसीएम’च्या (असोसिएशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी) पत्रव्यवहारात इंगरमन म्हणतात, ‘ज्याचे श्रेय त्याला द्यायचे ही परंपरा व्यावसायिक वर्तुळात असल्यामुळे आणि पाणिनी हा नोटेशनचा सर्वांत पहिला स्वतंत्र शोधकर्ता असल्याचे स्पष्ट असल्यामुळे ‘पाणिनी-बॅकस फॉर्म’ हे नाव अधिक योग्य असल्याचे मी सुचवू का?’ इतकेच काय, उच्चस्तरीय प्रोग्रामिंग भाषांच्या क्षेत्रातील फॉरट्रान आणि तिच्या सर्व शाखांचे मूळ संस्कृत व्याकरणकर्त्याला (पाणिनीला) देता येईल, हा दावा करणे अतिशयोक्ती होणार नाही, असे द्मित्री पावलूकसारखा तंत्रज्ञ म्हणतो. ‘आपण २१ व्या शतकासाठी संस्कृतला धन्यवाद द्यायला हवेत,’ असे त्याच्या लेखाचे नाव आहे. 

ज्यांना संगणकासाठी संस्कृत हीच उपयुक्त असल्याचे वाटते, त्यांच्यापैकी अनेकांना संस्कृत येत नाही. संस्कृत शिकविणाऱ्या अनेक शिक्षकांनाही संस्कृत बोलता येत नाही. संस्कृत ही ग्रंथांची किंवा संशोधन ग्रंथांची भाषा न राहता ती सर्वसामान्य लोकांनी बोलावी यासाठी ‘संस्कृत भारती’ ही संघटना कार्य करते आहे. या संघटनेचे याबाबत काय मत आहे? दोन वर्षांपूर्वी या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन उडुपी येथे झाले होते. त्याला मी उपस्थित होतो. तिथे राष्ट्रीय संघटनमंत्री दिनेश कामत आपल्या भाषणात म्हणाले होते, ‘कोणी तरी कधी तरी ‘संगणकासाठी संस्कृत सर्वांत उपयुक्त आहे,’ असे म्हटल्याने आपण फुशारून जाता कामा नये. तसे खरोखरच असेल तर त्याबाबत संशोधन व्हावे. परंतु केवळ त्याचा जप करून काम होणार नाही. आपल्या दृष्टीने ती जनसामान्यांची भाषा होणे अधिक महत्त्वाचे आहे.’ 

आपल्याला दृष्टिकोन हवा असेल तर हाच. काम आपल्याला करायचे आहे. अन्यथा समर्थ म्हणतात तसे ‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख!’ 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr Hemant Anant Belsare About 60 Days ago
Enlightening article. Thank you so much. Dr Hemant Belsare MD. Ph 9820537474
0
0
Balkrishna Gramopadhye About 183 Days ago
Is it any use , today?
0
0

Select Language
Share Link
 
Search