Next
चला ‘एफटीआयआय’च्या ‘ओपन डे’ला
आकाश गुळाणकर
Saturday, March 24, 2018 | 05:22 PM
15 0 0
Share this story

नागरिकांना माहिती देताना ‘एफटीआयआय’चे गाइडपुणे : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था अर्थात ‘एफटीआयआय’मध्ये आज आणि उद्या (२४ व २५ मार्च रोजी) ‘ओपन डे’चे आयोजन करण्यात आले आहे. नसिरुद्दीन शहा, संजय लीला भन्साळी, शबाना आझमी, ओम पुरी असे अनेक दिग्गज कलावंत या नामवंत संस्थेने चित्रपटसृष्टीला आजवर दिलेले आहेत; पण गेल्या दोन-तीन वर्षांत संस्थेसंदर्भात निर्माण झालेल्या वादांमुळे काहीसे गालबोट लागले होते. त्या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन वर्षांपासून ‘एफटीआयआय’ने ‘ओपन डे’ हा उपक्रम वर्षभरातून दोनदा राबविण्यास सुरुवात केली. 

या उपक्रमांतर्गत सकाळी साडेनऊपासून संस्थेचा कॅम्पस सर्वांसाठी खुला ठेवण्यात येतो. त्यामध्ये नागरिक संस्थेकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, सेट पाहू शकतात आणि कॅम्पसच्या सर्व भागाची सफर करू शकतात. शनिवारचा दिवस ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसाठी राखीव होता, तर रविवार सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

लॉ कॉलेज रोडने नळ स्टॉपच्या दिशेने जाताना बरिस्ताच्या थोडे पुढे गेले, की उजव्या हाताला ही वास्तू लागते. एरवी केवळ फंकी कपडे, आकर्षक हेअरस्टाइल्स आणि एकंदरीत वेगळे दिसणारे अवतार अशा पद्धतीच्या तरुणांची रेलचेल असलेल्या या ‘एफटीआयआय’च्या कॅम्पसमध्ये शनिवारच्या सकाळी ज्येष्ठांची गर्दी पाहून आश्चर्य वाटले. आत गेल्यावर असे समजले, की आज ‘एफटीआयआय’चा ओपन डे आहे. त्यानिमित्त संस्थेने निवारा व मातोश्री या वृद्धाश्रमांतील सर्व ज्येष्ठ तरुणांना ‘एफटीआयआय’ची सैर करण्यासाठी बोलावले होते. एकंदरीत कॅम्पसला या दोन दिवसांच्या निमित्ताने उत्सवी स्वरूप आले आहे. गेटच्या बाजूलाच टाकलेल्या मांडवामध्ये संस्थेची बरीच मंडळी माहिती देण्यासाठी तत्परतेने उभी आहेत. तिथेच ‘एनएफएआय’ने त्यांचे जुन्या सिनेमांच्या पोस्टरचे प्रदर्शनदेखील लावले आहे.

प्रदर्शनात ठेवण्यात आलेले कॅमेरे‘ओपन डे’च्या उपक्रमाबाबत ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला यांना विचारले असता ते म्हणाले, ‘संस्थेबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संस्था आणि सामान्य लोकांमध्ये एक दुवा निर्माण करण्याचे काम हा उपक्रम करील, असे मला वाटते. इथे अभ्यास कसा चालतो, कोणकोणत्या सुविधा इथे उपलब्ध आहेत, तांत्रिक पातळ्यांवर काय काम चालते या गोष्टी या निमित्ताने लोकांना कळाव्यात, असे आम्हाला वाटते.’ तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेबाबत त्यांनी सांगितले, ‘आमच्याकडे १९१० सालातील कॅमेरापासून ते २०१५ सालातील लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेला ‘Arri Alexa’ हा जवळपास दीड कोटी रुपये किंमत असलेला कॅमेरादेखील आहे.’ 

या उपक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते म्हणाले, ‘आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. केवळ पुण्यातीलच नाही, तर बारामती, लातूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावतीसारख्या ठिकाणांहूनही लोक ‘ओपन डे’करिता आलेले आहेत. पहिल्या वर्षीपासूनच आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय, प्रत्येकानेच इंजिनीअर, डॉक्टर होण्यापेक्षा काहींनी फिल्म्सकडेही वळायला हवे, तेच करण्यासाठी हा प्रयत्न आहे. लोकही येत आहेत.’ हा चौथा ‘ओपन डे’ असून, याआधी २०१६मध्ये एकदा आणि २०१७मध्ये दोनदा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती देणारा काउंटर गेटजवळील मांडवात उभा करण्यात आला आहे. यामध्ये नावनोंदणी केल्यास कोर्सेस सुरू होण्याआधी नोंदणी केलेल्या लोकांना संस्थेकडून संपर्क साधला जातो. तेथील कोर्सेस विभागाचे अश्विन सोनावणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, ‘आम्हाला या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक संभाव्य विद्यार्थ्यांबाबत माहिती मिळते. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांशी आम्ही संपर्क साधतो. यातून आम्हाल शॉर्ट कोर्सेसकरता अनेक विद्यार्थी मिळाले आहेत.’.

अरुणा आणि भरत सावंत‘ओपन डे’च्या निमित्ताने ‘एफटीआयआय’ला भेट द्यायला पत्नी अरुणा यांच्यासह आलेले रिटायर्ड नोकरदार भरत सावंत यांनी उत्साहाने या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आणि ही भेट भेट अविस्मरणीय असल्याचे आवर्जून सांगितले. ‘माझी बहीण या संस्थेशी संलग्न होती. त्यामुळे माझा तसा संपर्क असला, तरी अशा पद्धतीने आत येऊन कॅम्पस पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती. त्यामुळे मजा आली,’ असे त्यांनी सांगितले. ‘मला आणखी बरेच काही पाहायला मिळेल असे वाटले होते; पण तांत्रिक बाजूंवर जास्त भर देण्यात आल्याचे इथे दिसते आहे,’ अशा शब्दांत त्यांनी थोडीशी नारीजीही व्यक्त केली. शेवटी जाताना, हा उपक्रम तरुणांसाठी नक्कीच फलदायक ठरेल, हे सांगायला ते विसरले नाहीत. अरुणा सावंत ५० वर्षांनी कॅम्पसमध्ये आल्या होत्या.

शांताराम पाँड परिसरकॅम्पसमध्ये असलेल्या तांत्रिक गोष्टींसोबतच स्टुडिओ व शाताराम पाँड या दोन जागा आवर्जून पाहण्यासारख्या जागा आहेत. कॅम्पसमधील स्टुडिओचे बांधकाम १९३०च्या दशकात प्रभात फिल्म कंपनीने केले होते. या वास्तूला आता पुण्यातील हेरिटेज वास्तूचा दर्जादेखील मिळाला आहे. त्यामुळे तेव्हापासून जसा होता, तसाच स्टुडिओ आजही पाहायला मिळतो. ‘एफटीआयआय’मधील आर्ट डायरेक्शन विभागाचे विद्यार्थी येथे काम करत असतात. शिवाय, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त रिकाम्या वेळात हा स्टुडिओ व्यावसायिक सिनेमांकरिता भाड्याने दिला जातो. या स्टुडिओत व्ही. शांताराम यांच्या अनेक सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे. 

शांताराम पाँडचीही गोष्ट अशीच आहे. १९३६ साली संत तुकाराम हा सिनेमा बनवत असताना इंद्रायणीचा काठ व तुकाराम गाथेचा प्रसंग दाखविण्याकरिता बनविण्यात आलेली ही जागा (तलाव) आता शांताराम यांच्याच नावाने ओळखली जाते. त्यानंतरही तिथे अनेक सिनेमांचे चित्रीकरण झाले. सर्वांत ताजे उदाहरण सांगायचे, तर नाना पाटेकरांच्या ‘नटसम्राट’ चित्रपटातील पत्नी मरते तो प्रसंग जिथे चित्रित झाला, तेच हे ठिकाण होय. जवळपास ४५ एकरांवर पसरलेला हा भव्य कॅम्पस झाडेझुडुपे, वेली यांनी अक्षरशः नटलेला आहे. त्याचबरोबर आयोजकांनी आजच्या पिढीची आवड आणि गरज दोन्ही ओळखून सेल्फी पॉइंटही उभा केला आहे. तेव्हा उद्याच्या रविवारी ‘एफटीआयआय’मधील सेल्फी पुणेकरांच्या सोशल मीडिया अकांउटवर ट्रेंड होताना दिसले, तर नवल वाटायचे कारण नाही! 

(‘एफटीआयआय’मधील शांताराम पाँड आणि स्टुडिओची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
p.khakurdikar About 361 Days ago
Nice information
0
0

Select Language
Share Link