Next
‘पुलं’च्या साहित्याची मोडतोड रोखावी
कुटुंबीयांनी पत्राद्वारे व्यक्त केली अपेक्षा
BOI
Monday, September 10 | 05:30 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे साहित्य विपरीत स्वरूपात समाजापुढे आणणाऱ्यांना रोखण्यासाठी ‘आयुका’ आणि ‘लोकमान्य सेवा संघ’ यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा ‘पुलं’च्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. ‘पुलं’चे पुतणे जयंत देशपांडे, भाची डॉ. सुचेता लोकरे आणि भाचे दिनेश ठाकूर यांनी एका पत्राद्वारे ही इच्छा व्यक्त केली आहे. 

‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष आठ नोव्हेंबर २०१८पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने आणि सध्या काही वाहिन्यांद्वारे ‘पुलं’च्या साहित्याची भेसळ करून कार्यक्रम सादर होत असल्याने हे स्पष्टीकरण करीत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. 

‘‘आयुका’ आणि ‘लोकमान्य सेवा संघ’ यांनी हवे तर स्वामित्व हक्काची (रॉयल्टी) रक्कमही काही प्रमाणात विभागून घ्यावी. त्यामुळे ‘पुलं’च्या नावावर चाललेली अंदाधुंदी, त्यांच्या साहित्याची चालवलेली बेजबाबदार भेसळ थांबेल, हीच ‘पुलं’ना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उत्तम भेट ठरेल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘पुलं’च्या पश्चात सुनीताबाईंनी आपल्या मृत्युपत्राद्वारे ‘पुलं’च्या नाटकांच्या संहिता, त्यातील शब्द न बदलता सादर करण्याचे (फक्त प्रयोग) हक्क खुले केले. फक्त नाटकांचे प्रयोग करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही अथवा कोणालाही रॉयल्टी देण्याची गरज नाही; मात्र ‘पुलं’ची नाटके व इतरही पुस्तकांचे सुनीताबाईंकडचे हक्क त्यांनी पुण्याच्या ‘आयुका’ या विज्ञान संस्थेकडे हस्तांतरित केले.

समाजोपयोगी उपक्रमांना मदत करता यावी, यासाठी स्थापन केलेल्या पु. ल. देशपांडे फाउंडेशनचे, ‘पुलं’च्या पार्ल्यातील ‘लोकमान्य सेवा संघ’ या संस्थेत विलीनीकरण झाल्यावर ‘पुलं’च्या काही पुस्तकांची रॉयल्टी लोकमान्य सेवा संघाकडे येऊ लागली. त्यामुळे ‘पुलं’च्या काही साहित्याचे कॉपीराइट आपल्याकडे आले आहेत, असा काही लोकांचा आणि खुद्द लोकमान्य सेवा संघाचा समज झाला; मात्र असे कोणतेही अधिकार लोकमान्य सेवा संघाकडे आहेत, असे दाखवणारी कोणतीही कागदपत्रे न्यायालयातही दाखल झालेली नाहीत. उलटपक्षी ‘पुलं’च्या पश्चात सुनीताबाईंच्या निधनापर्यंत ‘पुलं’च्या साहित्यावरील आधारित कार्यक्रम, चित्रपट, व्हिडिओ इत्यादी परवानग्या सुनीताबाईंनी स्वत:च दिलेल्या आढळतात.

आपल्या पश्चात आपल्या संपूर्ण साहित्याचे सर्वाधिकार ‘आयुका’ या विज्ञान संस्थेला देण्यामागे सुनीताबाईंचा उद्देश उघड आहे. आपल्या साहित्याचा समाजासाठी उपयोग व्हावा, ही त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, त्याचबरोबर ‘पुलं’चे साहित्य दर्जेदार स्वरूपातच समाजासमोर यावे आणि त्यात होणारी भेसळ वा मोडतोड टळावी, अशी कुटुंबीयांची इच्छा असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link