Next
‘सूर माझे सोबती’ नाटकाबद्दल आणखी काही...
BOI
Tuesday, July 02, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


सव्वाशे वर्षांची संगीत नाटकांची परंपरा जपण्याचे प्रयत्न वेळोवेळी होत असतात. यामधील माझा खारीचा वाटा म्हणून ‘सूर माझे सोबती’ या नव्या संगीत नाटकाची मी निर्मिती केली. या नाटकाला सुप्रसिद्ध गायिका फैयाज आणि ज्येष्ठ ऑर्गनवादक पं. तुळशीदास बोरकर यांचा आशीर्वाद लाभला.....‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत त्यांनी लिहिलेल्या ‘सूर माझे सोबती’ या २१व्या शतकातील संगीत नाटकाबद्दल अधिक काही...     
...................
‘सूर माझे सोबती’ या नाटकाचं लेखन पूर्ण झाल्यावर माझ्या या नव्या नाटकाला पहिला आशीर्वाद मिळाला, तो सुप्रसिद्ध नाट्यअभिनेत्री व गायिका फैयाज यांचा. एप्रिल २००७मध्ये माझ्या सुमधुरा संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात फैयाज यांच्या हस्ते नाटकाच्या संहितेचं प्रकाशन झालं. त्याच कार्यक्रमात रसिकांसमोर नाटकाच्या संक्षिप्त भागाचं नाट्यवाचनही झालं. नाटकाचा विषय सर्वांना आवडला आणि रसिकांच्या मनात नाटकाविषयी उत्सुकता निर्माण झाली.

एक नायक, दोन कलाकार :
या नाटकाच्या मुहूर्तापासूनच नायकाच्या भूमिकेसाठी दोन कलाकार तयार होत होते. हे एक आगळंवेगळं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. त्याचं झालं असं.., नाटकातील सर्व भूमिकांसाठी कलाकारांची निवड झाली. तालमी सुरू झाल्या. पहिल्या प्रयोगाची तारीख ठरली. नाट्यगृहाचं बुकिंग झालं आणि नायकाची भूमिका करणाऱ्या राहुलचा अमेरिकेचा व्हिसा आला. आता कंपनी म्हणेल, तेव्हा त्याला अमेरिकेला निघावं लागणार होतं. आता या मुख्य भूमिकेसाठी काहीतरी विचार करणं भाग होतं. इतके दिवस तालमीला हजर असणारा राहुलचा मित्र संचित वर्तक हा नायकाच्या भूमिकेसाठी ‘बॅकअप आर्टिस्ट’ म्हणून तयार झाला. संचित हा रंगभूमीचा अनुभव असलेला गुणी कलाकार. राहुलच्या आधीपासूनच तोही एकांकिका करत होता. राहुलचा मित्र म्हणून तो आणि त्याची पत्नी श्रद्धा दोघेही आम्हांला या नाटकासाठी हर प्रकारे मदत करतच होते. त्याला नाटकाविषयी, नायकाच्या भूमिकेविषयी सगळंच माहीत होतं. त्यामुळे राहुल अमेरिकेला गेल्यावर शेवटच्या काही प्रयोगांमध्ये आणि नाट्यवाचनाच्या प्रयोगामध्ये, संचितने नायकाची भूमिका छानच केली.

नाटकाचे कथानक :
नाटकाची नायिका ही संगीत क्षेत्रातील नवोदित गायिका. लहानपणापासून आवडीनं जोपासलेली कला. त्यांत तिने मिळवलेलं प्रावीण्य. स्वत:चे कार्यक्रम करून लोकप्रियता मिळवत असताना आणि संगीत क्षेत्रात स्वत:चं करिअर करत असताना झालेलं लग्न. सासरच्या मंडळींकडून करिअरला पाठिंबा मिळावा अशी असलेली तिची अपेक्षा. नाटकाचा नायक हा ‘आयटी’ क्षेत्रातील तरुण. सध्याच्या युगात, या तरुणांना आपल्या कामाच्या ठिकाणी सतत स्वत:ला सिद्ध करावं लागतं. निरनिराळी आव्हानं पेलावी लागतात. दिलेल्या वेळात दिलेली उद्दिष्टे पूर्ण करावी लागतात. या ओढाताणीत त्यांना स्वत:च्या कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. ती घरच्यांनाही समजून घ्यावी लागते. 

हे सर्व नायकाला समजत असूनही येणारी अगतिकता. त्यामुळे नायिकेच्या गाण्यावर खूश होऊन तिला मागणी घालणारा नायक. नंतर मात्र स्वत:च्या कामाच्या व्यापात आणि ताणात गुरफटलेला. तशातच मित्रांनी केलेल्या बायकोच्या स्तुतीनं त्याचा जागा होणारा पुरुषी अहंकार आणि एका वादविवादाच्या क्षणी तो तिला बाहेर कार्यक्रम करण्यास मनाई करतो. नायिका कोलमडते. अशा वेळी तिच्या पाठीशी उभी राहते तिची सासू. एके काळी गाणं शिकूनही तिला सांसारिक अडचणींमुळे गायनात प्रगती करायला जमलेलं नसतं, पण सुनेच्या बाबतीत असं होऊ देणार नाही, अशी भूमिका ती घेते. नायिकेचे गानरसिक मित्र व मैत्रीण आणि नायकाचा मित्र हेदेखील नायिकेला वेळोवेळी धीर देतात.


एखाद्या चुकीच्या वागण्यामुळे कोणी एकदम खलनायक होत नाही, तर त्यासाठी परिस्थिती कधी कारणीभूत असते. त्यामुळे परिस्थिती बदलली, की पुन्हा चूक सुधारता येते. अशा वेळी संयमाने परिस्थिती हाताळावी लागते, असा विचार मी त्या नाटकातून मांडला. नवरा-बायको, आई-मुलगा, सासू-सून, मित्र-मैत्रिणी अशा विविध नात्यांची घट्ट वीणही त्या कथानकात दिसून येते. कठीण प्रसंगातही कोणतंच नातं तुटेपर्यंत ताणायचं नसतं, हे दाखविण्याचा प्रयत्न यातून केला आहे. याशिवाय कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी सासू सुनेला घरच्या घरी क्लास सुरू करण्याबद्दल सुचवते, यातून, फक्त कार्यक्रम न करता शिकवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, असा विचार नाटकातून मांडला आहे. यथावकाश सून क्लास सुरू करते. तिचे विद्यार्थी यश मिळवू लागतात. नायकही त्याच्या करिअरमध्ये प्रगती करतो. स्वत: तणावातून बाहेर पडल्यावर त्याला त्याची चूक उमगते आणि पत्नीचे कार्यक्रम ठरवण्यात तोच पुढाकार घेऊ लागतो. योग्य वेळी दाखवलेला संयम, सासूचं मिळालेलं समर्थन यांतून नायिका संसारातही यशस्वी होते, पण ती त्याला मनोमन सांगते, ‘जीवनाच्या या प्रवासी सूर माझे सोबती’. 

नाटकाच्या निर्मितीनंतर खरा कस लागला, तो नाटक रसिकांपर्यंत पोचवण्याच्या प्रयत्नात. पहिला प्रयोग रंगला, अर्थातच होम ग्राउंडवर, म्हणजे बोरीवलीच्या प्रबोधनकार नाट्यगृहात. कौतुकानं रसास्वाद घेणाऱ्या बोरिवलीकर रसिकांनी पहिल्या प्रयोगाला उत्तुंग प्रतिसाद दिला. आमचा उत्साह द्विगुणित झाला. नाट्यव्यवसायातील एका हितचिंतकानं कानमंत्र दिला, ‘नाटकाच्या निर्मितीत कोणतीही कसूर ठेवायची नाही, पण प्रत्येक प्रयोगाच्या खर्चावर मात्र काटेकोरपणे नियंत्रण ठेवायचं. फ्री पासेस वाटायचे नाहीत. आपली किंमत आपणच राखायची.’ परंतु नाट्यगृहाची शनिवार-रविवारची तारीख मिळणं, वर्तमानपत्रातून जाहिराती देणं, जाहिरातींसाठी डिझाइन करणं, नाट्यगृहावर तिकिट विक्रीची व्यवस्था करणं या सर्व गोष्टी स्वत: करणं आणि यासाठी माणूस नेमून करवून घेणं, या दोन्ही प्रकारे काम करताना, नाट्यव्यवसायातील प्रस्थापितांकडून आलेले अनुभव फार काही चांगले नव्हते. प्रस्थापित वर्तमानपत्रातील रिपोर्टर्सनी प्रतिसाद दिला नाही, पण असे असले तरी आमच्या कलाकार टीममधील सर्वांचा उत्साह दांडगा होता. त्यामुळे सर्व अडचणींवर मात करत, मुंबईतील सर्व नाट्यगृहांत आम्ही दोन दोन प्रयोग केले. पुढे काही संस्थांकडून कॉन्ट्रॅक्ट शोजही मिळाले. चार महिन्यांत आम्ही पंधरा प्रयोग केले. नाटकाचा विषय आणि संगीत अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सेट, प्रॉपर्टी, मेकअप, वेशभूषा बदल अशा गोष्टींना काट देऊन, फक्त नाट्यवाचन आणि गायनातून नाटक सादर करत राहावं असाही विचार या निमित्ताने केला गेला. 

या नाटकाच्या बोरीवलीच्या प्रथम प्रयोगास आवर्जून उपस्थित राहून, पं. तुळशीदास बोरकरांनी दिलेला हा लेखी अभिप्राय.. 
‘आपण सादर केलेला ‘सूर माझे सोबती’ या संगीत नाटकाचा प्रयोग मनापासून आवडला. नाट्यसंहिता, दिग्दर्शन, सर्वांचा अभिनय, संगीत, अनुरुप नेपथ्य अशा विविध अंगांतून प्रयोगाचं यश साधलं गेलं. सध्याच्या दोन अंकी नाटकांच्या प्रथेनुसार, आपण एक चांगलं व आटोपशीर संगीत नाटक सादर करण्याचं धाडस केलंत, याचंच मला मोठं कौतुक वाटतं. संगीत नाटकात संगीताइतकंच नाट्यवस्तूलाही समसमान महत्त्व असायला हवं. आपण लिहिलेल्या संहितेत हा तोल साधला गेला आहे. अतिशय साधी, सरळ कौटुंबिक कथा आपण नाटकात मांडली आहे. नाटकातील संघर्ष आजच्या जगण्याच्या पद्धतीतूनच आलेला असल्यानं, तो स्वाभाविक आहे. आजच्या स्थितीला अनुरुप असाच आहे. निरनिराळ्या नात्यांमधली वीण हा या नाटकाचा दुसरा प्लस पॉइंट आहे. पती-पत्नी, आई-मुलगा, सासू-सून यांच्या नात्याबरोबरच अमर-समीर, श्रुती-नेहा यांच्यातील मैत्रीचं नातंही छान फुलवलं आहे. सर्वांच्या अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं, तर तो ही सहजसुंदर होता. किंबहुना तो अभिनय वाटू नये इतका स्वाभाविक होता. या गोष्टीचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक संजीव पंडित यांनाही द्यायला हवं. नायक राहुलला उत्तम व्यक्तिमत्त्व आहे. त्याचबरोबर त्याचं अभिनयाचं अंगही वाखणण्याजोगं आहे. नायिका रागेश्रीची, अभिनयाबरोबरच गायनाची समज आणि तयारी उत्तम आहे. नाटकाचं शीर्षक ‘सूर माझे सोबती’ हे अर्थपूर्ण आणि समर्पक आहे. शीर्षक गीताला दिलेली दोन निरनिराळ्या मूडची चाल, त्या त्या प्रसंगांना चपखलपणे वापरली गेली आहे. स्त्री-पुरुष समानतेचा नाट्यविषय सूचित करणारी नांदी ‘जय हे शिवशक्ती स्वरूपा..’ उत्कृष्ट नांदीचा नमुना आहे. नाटक आणि संगीत असा दुहेरी आनंद देणारं हे नाटक सर्वांनाच भावेल अशी आशा आहे.’

याव्यतिरिक्त ‘मुंबई थिएटर फेस्टिव्हल २००८’साठीही या नाटकाची निवड झाली होती. ही निवड जाहीर करताना शशी भालेकर यांनीही नाटकाचे कौतुक केले. चेंबूर महिला समाजाच्या पदाधिकाऱ्यांनीही नाट्यमहोत्सवासाठी निवडलं गेलेलं हे नाटक उत्कृष्ट असल्याचे म्हटले. 

नाटकातील पात्रं, कलाकार आणि अधिक माहिती ‘सूररंगी रंगले’मधील यापूर्वीच्या भागात देण्यात आली आहे. ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search