Next
दुःखात गाणं असतं, दुःख सुंदर नसतं : डॉ. वीरा राठोड
‘मसाप’मध्ये ‘एक कवी एक कवयित्री’ कार्यक्रम
BOI
Friday, April 26, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘बोली भाषेवर जन्मापासून प्रेम आहे. सगळ्या बोलीभाषा श्रेष्ठ आहेत. त्यात एक सुगंध आहे. सुगंधाचा अनुवाद करता येत नाही. लोकगीते जगण्याच्या अनुभवातून जन्मलेली असतात. या लोकगीतांच्या चोऱ्या खूप होतात. अनेक नामवंत कवींनी लोकगीतांच्या चोऱ्या करून ती कविता म्हणून स्वतःच्या नावावर छापल्या आहेत. मला काही मिळावे म्हणून मी कविता लिहीत नाही. दुःखात गाणं असतं, दुःख सुंदर नसतं’, असे मत डॉ. वीरा राठोड यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी एक कवयित्री’ या कार्यक्रमात डॉ. वीरा राठोड आणि कल्पना दुधाळ यांची मुलाखत उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी घेतली. या वेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते.

कल्पना दुधाळ म्हणाल्या, ‘माझे अनुभव शब्दांतून आले आणि ते घुसमट मांडत गेले. कुदळ, खोरे, खुरपं हेच साहित्य माहित होते. मातीने वास्तवाचे भान दिले. उन्हा-तान्हात राबून कष्टाने शिक्षण घेतले. राबणाऱ्या स्त्रीया आजही बंदीशाळेत आहेत. घर-दार, गुरे-ढोरे, बाजार या चौकटीत स्त्री आहे. ही बंदिशाळा शिक्षणामुळे तोडता येईल. खेड्यातल्या स्त्रीया शिकल्या पाहिजेत. मातीत उगवणारे पीक नैसर्गिक उगवले पाहिजे. मातीचे सीझर करून पीक घेतले जात आहे. माझ्या जगण्यातून, अनुभवातून कविता उगवली. बहिणाबाई चौधरी मातीतून उगवलेल्या कवयित्री आहे. कविता आहे तोवर जगण्यातला उत्सव आहे. कविता निघून गेली तर उत्सव उरणार नाही. आसपासची धग समजून घेता आली पाहिजे. मळ्याचा सातबारा विकता येतो पण मातीचा लळा विकला जात नाही. हा लळा जपला पाहिजे.’

डॉ. वीरा राठोड म्हणाले, ‘व्यवस्थेशी लढाई म्हणजेच विद्रोह असतो. न्यायासाठी भांडावच लागते. विद्रोह हा समतेसाठी असतो. ही समतेची लढाई हिंसक नाही. समतेचे सत्त्व आणि तत्त्व हरवत चालले आहे. अन्याय झालेल्यांना ममत्व हवे असते. कुणाला समजविण्यासाठी नाही, तर एकतेसाठी आणि सन्मानासाठी लढाई असते. विद्रोह म्हणजे वैर नाही; पण साहित्य वर्तुळात माफियांच्या टोळ्या निर्माण झाल्यामुळे विद्रोह समजला नाही.’ राठोड यांनी ‘तांडा’, ‘काळजातली सल’, ‘याडी’, ‘नभमुक्त’, तर कल्पना दुधाळ यांनी ‘घालमेल’, ‘तळपत्या सूर्या’, ‘मातीचा लळा’, ‘हे दिवस’, या कविता सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search