Next
नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण
BOI
Thursday, November 29, 2018 | 02:57 PM
15 0 0
Share this story

मुंबई : राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीचे विधेयक २९ नोव्हेंबर २०१८ रोजी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये आवाजी मतदानाने चर्चेविना बहुमताने मंजूर झाले. लवकरच त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे.

गेल्या काही काळापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता. त्यासाठी राज्यभर क्रांती मोर्चेही काढण्यात आले होते. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात २९ नोव्हेंबरला मांडण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडले.

हे विधेयक सादर करण्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या अहवालावरील कृती अहवाल विधिमंडळात मांडण्यात आला होता. त्या अहवालाऐवजी मूळ अहवालच सादर करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र ती फेटाळून लावण्यात आली. दुपारनंतर कामकाज सुरू होताच आरक्षण विधेयक आधी विधानसभेत आणि मग विधान परिषदेत मांडण्यात आले आणि ते आवाजी मतदानाने मंजूरही झाले. सर्वपक्षीय सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यावर हे आरक्षण लागू होणार आहे.

तत्पूर्वी, धनगर आरक्षणासंदर्भातही उपसमिती नेमून, त्याचाही कृती अहवाल मांडून धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी विधानसभेत उपस्थित झालेल्या मुद्द्यावरील चर्चेत स्पष्ट केले. 

तरतुदी 
- मागास वर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (सोशली अँड एज्यपकेशनली बॅकवर्ड क्लास) म्हणून घोषित करण्यात आला.
- संविधानातील अनुच्छेद १५ (४) आणि १६ (४) यांमध्ये आरक्षणाचे जे लाभ दिलेले आहेत, ते लाभ मिळण्यास हा समाज पात्र.
- राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद
- शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण. अल्पसंख्याक शैक्षणिक सुविधांमध्ये ही तरतूद नाही. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link