Next
बॅडमिंटनमध्ये आर्यची भरारी
पुण्याच्या बॅडमिंटन क्षेत्रातील उगवता तारा
BOI
Friday, September 21, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आर्य भिवपाठकीपुण्याच्या बॅडमिंटन क्षेत्रात केवळ स्थानिक पातळीवरील नव्हे, तर देशपातळीवरील खेळाडू तयार होतात हे येथील खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे. असे नवनवीन खेळाडू आपल्या खेळाने देशाचे नाव मोठे करतात. आर्य भिवपाठकी हा असाच  पुण्यात नावारूपाला आलेला खेळाडू आता राज्याचेच नव्हे तर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या नवोदित बॅडमिंटनपटू ‘आर्य भिवपाठकी’बद्दल...
......................................
आर्य भिवपाठकी याने २००५मध्ये वयाच्या सहाव्या वर्षी महाराष्ट्र मंडळात अनिरुद्ध जोशी यांच्याकडे बॅडमिंटन शिकण्यास सुरुवात केली. दहा वर्षांखालील गटात नांदेड येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत त्याने सर्वप्रथम आपल्या खेळाची चुणूक दाखवली. या स्पर्धेत अत्यंत नवखा असतानाही त्याने अनेक मानांकित खेळाडूंचा पराभव करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर मात्र आर्यने मागे वळून पाहिलेच नाही. 

पुढे हेमंत हर्डीकर यांच्याकडे तो अॅडव्हान्स ट्रेनिंगसाठी दाखल झाला. त्याने जिल्हास्तरीय स्पर्धेत २५ वेळेस, तर राज्यस्तरीय स्पर्धेत ३० वेळेस विजेतेपद मिळवले. आज तो राष्ट्रीय स्तरावरील मानांकन यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवली. त्यातील एक वैयक्तिक आहे, तर एक सांघिक आहे. राष्ट्रीय विजेतपद स्पर्धेत त्याने पाच वेळा कांस्य पदक मिळवले आहे, तर पश्चिम विभागीय स्पर्धेत दोन वेळेस सुवर्ण मिळवले आहे. २०१३ हे वर्ष आर्यसाठी अत्यंत यशस्वी ठरले. या वर्षभरात त्याने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीनही स्तरांवर अत्यंत यशस्वी कामगिरी केली. यासाठी त्याची इंडोनिशियात होणाऱ्या अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. अशी निवड होणारा आर्य हा पुण्याचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

राज्य विजेतेपद स्पर्धेत बॉईज गटात त्याने विजेतेपद पटकावले, त्याचबरोबर यंदा पुणे जिल्हा स्पर्धेत पुरुष एकेरीतही आर्यने विजेतपद मिळवत विजेतेपदाची हॅट्रिक साधली. ‘सुशांत चिपलकट्टी’ या पुण्यातील अत्यंत मानाच्या स्पर्धेतदेखील त्याने यश मिळवले. आर्यला ‘व्हिक्टर स्पोर्ट्स’चे प्रायोजकत्व मिळाले आहे. अर्थात व्हिक्टर स्पोर्ट्स त्याला साहित्य सामुग्रीसाठी हे प्रायोजकत्व देत आहे. आर्य सध्या ‘व्हीआयटी’मध्ये बी. टेक. करत आहे. यंदाच्या मोसमापासून तो पुरुष खुल्या गटातही खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. पुणे महानगरपालिकेनेदेखील ३० हजार रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती देऊ केली आहे. ‘एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने त्याला एक लाख ८० हजार रुपयांचे प्रायोजकत्व बहाल केले आहे.  

केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आर्यला आणखी आर्थिक पाठबळ दिले, तर तो परदेशातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवू शकेल. २०२४चे ऑलिंपिक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) या योजनेत आर्यचा समावेश केला गेला पाहिजे. यातून त्याला नोकरीची संधीदेखील मिळेल आणि या योजनेतून आर्थिक पाठबळदेखील प्राप्त होईल. प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी आधी पदरमोड करावी लागते, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. १५वर्षांखालील वयोगटापर्यंत कोणत्याही खेळातील खेळाडूला सरकारी मदत व अनुदान मिळत नाही. या परिस्थितीत बदल झाला, तर आर्यसारखे अनेक गुणवान खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावताना दिसतील. योग्य वयात आणि योग्य वेळी मिळालेली मदत आणि प्रोत्साहन खेळाडूला यशस्वी कामगिरीसाठी प्रोत्साहित करत असते. आर्यचे प्रशिक्षण, त्याची गुणवत्ता आणि त्याचा सराव बघता तो निश्चितच इंडिया मटेरियल आहे यात वाद नाही. 

नांदेड येथील स्पर्धेपासून सुरू झालेला आर्यचा प्रवास राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला, तोदेखील यशाचा आलेख उंचावत. आता पुरुष एकेरीच्या तसेच दुहेरीच्या आणि मिश्र दुहेरीच्या खुल्या गटात यश मिळवण्यासाठी त्याला प्रत्येक मोसमात जास्तीत जास्त स्पर्धा खेळायची संधी मिळणे गरजेचे आहे. यातून मिळणारा अनुभव त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोलाचा ठरणार आहे. मात्र त्यासाठी त्याला टीओपी, तसेच प्रायोजकांच्या मदतीची गरज आहे. त्याचे कुटुंबीय हा आर्थिक भार सहज पेलू शकत असले, तरीही जर आर्थिक पाठबळ मिळाले, तर तो अधिक जोमाने प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. असेच आर्यचेदेखील आहे, शिवाय अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धे’चे विजेतेपद हे त्याचे प्रमुख स्वप्न आहे. यात तो यशस्वी झाला, तर खऱ्या अर्थाने त्याची कारकीर्द यशस्वी झाली असे म्हणता येईल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Avinash Gorakhnath Thorat About 276 Days ago
We are proud of Arya as we are our waiting to see him in Olympic best of luck for your dynamic future in badminton
0
0
Prashant Kawade About 278 Days ago
He is Wonderful PLAYER. GOD BLESS YOU We like to watch you playing for INDIA
1
0
नितिन भिवपाठकी About 278 Days ago
Thank sincerely you very much for wonderful coverage of ARYA Bhivpathaki, We will try and put in our level best to support ARYA for his loving sport Badminton..!
1
0

Select Language
Share Link
 
Search