Next
‘आजही मी प्रेमगीतांना चाली देतो...’
BOI
Monday, December 25, 2017 | 10:00 AM
15 0 0
Share this article:

प्रभाकर जोगज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनमधून गीतांचे बोल ऐकविणारे जादूगार प्रभाकर जोग आज, २५ डिसेंबर रोजी ८६व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अलीकडेच त्यांना लता मंगेशकर पुरस्कार आणि गदिमा पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या औचित्याने ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे विवेक सबनीस यांनी जोग यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी विविध विषयांवर झालेल्या दिलखुलास गप्पागोष्टी येथे प्रसिद्ध करत आहोत.
................
केवळ मराठीच नव्हे, तर हिंदीतील अभिजात गाण्यांतली मेलडी व्हायोलिनमधून ओथंबलेल्या भावनेत शब्दबद्ध करणारे ज्येष्ठ संवेदनशील संगीतकार प्रभाकर जोग यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांच्या नावाने देण्यात येणाऱ्या गदिमा पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. ‘गदिमां’चा निकटचा सहवास लाभलेल्या जोग यांना हा पुरस्कार म्हणजे त्यांचा आशीर्वाद वाटतो! मराठी व हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात सक्रियपणे सहभागी असलेल्या जोग यांना महाराष्ट्र सरकारने अलीकडेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानेही सन्मानित केले होते. आज, २५ डिसेंबर रोजी ते वयाच्या ८६व्या वर्षात पदार्पण करत आहेत. असे असले तरीही ‘अजून यौवनात मी..’ या उक्तीनुसार त्यांनी या वयातही काही रोमँटिक गीतांना चाली लावल्या आहेत! या अनेक गोष्टींचे औचित्य साधून ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यातील काही भाग येथे देत आहोत...

जोगसाहेब, गदिमा पुरस्काराबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन! तुम्हाला ‘गदिमां’चा सहवास खूप लाभला. ‘गदिमां’बद्दल काय सांगाल? 
- माडगूळकरांसारख्या एका थोर कवीच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार मला खूप आनंद देणारा आहे! विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या संगीत कारकिर्दीतील पहिल्या ध्वनिमुद्रिकेमधील ‘लपविलास तू हिरवा चाफा’ आणि ‘कशी मी सांगू वडिलांपुढे’ ही गीते त्यांचीच होती. ही दोन्ही गाणी मालती पांडे यांनी गायली असून, त्यातले ‘लपविलास तू...’ हे गाणे मी माझी पत्नी कुसुम हिच्यासाठी स्वरबद्ध केले होते. तिने ते प्रथम गायले. माडगूळकरांनी ही दोन्ही गीते जेव्हा ऐकली तेव्हा ते आनंदाने म्हणाले होते, की, ‘अरे जोगा, मी टाकून दिलेल्या गीतांचे तू सोने केलेस की रे!’ त्यांच्या आशीर्वादानेच मी सोन्यासारखे काम करण्याचा निश्चकय केला. ‘जावई माझा भला’ या माझ्या पहिल्या सिनेमाची संहिताही अण्णांचीच (माडगूळकर). त्यांच्या गीतातील अलौकिक प्रतिभा आणि बाबूजी (सुधीर फडके) यांचे संगीत यामुळे हे सारेच एखाद्या दुग्धशर्करा योगासारखे जुळून आले होते!

प्रभाकर जोगमाडगूळकर, फडके आणि तुम्ही या तिघांमुळे अवघ्या मराठी मनाला गीत रामायणाची अवीट गोडी मनसोक्त चाखता आली. ती सर्व ५६ गीते तुम्हा तिघांच्या अभूतपूर्व योगदानामुळे अजरामर झाली आहेत. हा अनुभव जरा विस्ताराने सांगाल? 
- गीत रामायण हा माझ्या दृष्टीने तेरा महिने चाललेला आनंदोत्सव होता! त्यातील माडगूळकरांचे काव्य व बाबूजींच्या चाली यांना तोडच नाही! अण्णांनी गीत रामायणातील पहिली पाच-सहा गाणी लिहिली व पुढे दर आठवड्याला एक गीत ते लिहीत असत. हा उपक्रम वर्षभर चालला होता. त्यातले ‘चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला’ या गीताला मी चाल लावू शकलो व ते चंद्रकांत गोखले यांनी गायले. तसेच ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’ या गीताचा मुखडा मी तयार केला. एकदा कोर्टाच्या कामामुळे बाबूजींना पुण्यात येणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी सांगितलेल्या  चालीवरील नोटेशनच्या मदतीने मी ते गायकांकडून गाऊन घेतले. गाण्याचे रेकॉर्डिंग तीन-चार दिवस चाले; पण या प्रत्येक गाण्याच्या तालमी माझ्या घरी म्हणजे सदाशिव पेठेतील लिमये वाडीत असणाऱ्या कडूसकर वाड्यात होत असत. गीत रामायणाच्या निमित्ताने माझ्या घरी गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, रामभाऊ फाटक, वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर, अप्पासाहेब इनामदार, चंद्रकांत गोखले, तसेच माणिक वर्मा, मालती पांडे, योगिनी जोगळेकर ही दिग्गज गायक मंडळी येत असत. अण्णा व बाबूजींचा माझ्यावर असणारा विश्वांस हीच यामागची माझी पुण्याई! अनेक वेळा मी गीत रामायणातील आठवड्याचे गीत घेण्यासाठी अण्णांच्या घरी जात असे, तेव्हा मला पाहताच ते गमतीने म्हणत, की रामाचा दूत आलाय! तोंडपाठ असल्यासारखी एकटाकी आठ-नऊ कडवी लिहून काढताना त्यांना मी पाहिले आहे. इतका हा ग्रेट असा सर्वव्यापी अनुभूती असणारा आधुनिक वाल्मिकी! त्यांच्याबद्दल जितके सांगावे तितके थोडे आहे. 

प्रभाकर जोगबाबूजी व तुमचे ऋणानुबंध तर सर्वश्रुत आहेत! त्यांच्याबद्दल काय सांगाल? 
- १९५०-५१ साली स. प. महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिकत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात मी सोलो व्हायोलिनवादन केले होते. हे वादन बाबूजींनी बाहेरून ऐकले व मित्राकडून निरोप पाठवून मला बोलावून घेतले. मला शाबासकी देऊन त्यांनी आपल्या वाद्यवृंदात मला सहभागी करून घेतले. या स्नेहसंमेलनात मी तेव्हा ‘मनोरथा चल त्या नगरीला, कृष्णा मिळाली कोयनेला’, तसेच ‘आएगा आनेवाला’ अशी मराठी-हिंदी गाणी वाजवली होती. त्यानंतर बाबूजींनी मला त्यांच्या ‘प्रतापगड’ या सिनेमातील गाणे वाजवण्यासाठी बोलावले. पुढे त्यांच्या सर्वच चित्रपटांसाठी मी व्हायोलिनवादन करू लागलो. माझ्या नोटेशन लिहिण्याच्या जलद गतीवर खूष होऊन त्यांनी ‘ऊन पाऊस’ या सिनेमासाठी मला सहायक संगीतकार म्हणून जबाबदारी देऊन संगीत दिग्दर्शक केले! सहायक या नात्याने त्यांच्याकडे शिकताना मला खूप काही शिकता आले. त्यातूनच स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करण्याची स्फूर्तीही मिळाली. यातून मी पुढे २३ मराठी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. 

प्रभाकर जोगतुमची एक स्वतंत्र संगीतकार म्हणून असणारी कारकीर्दही तितकीच मोठी आहे. त्यात तुम्ही लता मंगेशकर, अशा भोसले यांच्यासह अनेक नामवंत गायक गायिकांबरोबर काम केलेत. त्यातले विशेष काय आठवते? 
- ‘जावई माझा भला’ या माझ्या पहिल्या सिनेमानंतर थांब लक्ष्मी कुंकू लावते, सतीचं वाण, दाम करी काम, चुडा तुझा सावित्रीचा, कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि दादा कोंडके यांचा ‘आंधळा मारतोय डोळा’ असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करायला मिळाले. ‘जावई माझा भला’ची गोष्ट महादेवशास्त्री जोशी यांची होती. एक स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यातले ‘काय मागू मी कुणापाशी, अंगणी गंगा घरात काशी’ हे गाणे आठवते व ते आशा भोसले यांनी गायले होते. माझ्या २३ सिनेमांपैकी १२ ते १३ सिनेमे त्यातील संगीतामुळे गाजले. तीन सिनेमांना ‘सूर सिंगार संसद’तर्फे स्वामी हरिदास व सरस्वती अॅैवॉर्डस् मिळाले. लता मंगेशकरांबरोबर माझ्या दोन मुलांनी म्हणजेच मिलिंद व श्रीनिवास यांनी, तसेच योगिनी गोरे यांनी लहान असताना ‘शुभं करोति कल्याणम्’ हे गाणे म्हटले होते. मुंबईतील प्रसिद्ध स्टुडिओमध्ये त्याचे रेकॉर्डिंग झाले होते. लतादीदींनी कोणतेही दडपण आणू न देता हे गाणे मुलांसह गायले. पुढे ते गाणे लोकप्रियही झाले. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याशिवाय सुमन कल्याणपूर, उत्तरा केळकर, शोभा जोशी ते अभिनेत्री गायिका सुलक्षणा पंडित या साऱ्यांनी माझ्या संगीतरचना गायल्या आहेत.  

अनेक नामवंत हिंदी चित्रपट संगीतकारांकडेही तुम्ही साथसंगत केली होती. त्यातली कुणाची आठवण तुम्हाला ठळकपणे सांगावीशी वाटेल? 
- संगीतकार असताना मला हळूहळू छोट्या संगीत दिग्दर्शकाप्रमाणे मोठ्या नामवंत संगीत दिग्दर्शकांकडे व्हायोलिन वादनाची संधी मिळत गेली. मदनमोहन, रोशन, खय्याम, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बाप्पी लाहिरी ते अगदी अलीकडचे नदीम-श्रवण आणि अनू मलिक यांच्यापर्यंत सर्वांना मी साथसंगत केली आहे. मदनमोहन यांचा मी लाडका वादक होतो. एकदा मदनमोहन पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व संगीत महोत्सवात रईसखाँ यांचे सतारवादन ऐकण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या एका गाण्याचे मुंबईत रेकॉर्डिंग होते; पण रात्रीच्या प्रवासाने ते दमून गेले आणि त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्या दिवशीच्या गाण्याची रिहर्सल घेण्याची जबाबदारी विश्वा साने माझ्यावर आली. त्यांच्या सूचनांप्रमाणे मी ते गाणे नोटेशनसह लिहून घेतले. माझी खरी कसोटी पुढे होती. ते गाणे मला लता मंगेशकरांकडून गाऊन घ्यायचे होते. मला ते जमले आणि लताजींचे गाणे रेकॉर्डही झाले! 

सुमन कल्याणपूर यांच्या तिशीतली गाणी नंतर सुमनताईंनी नंतर वयाच्या साठीत पुन्हा रेकॉर्ड केली होती असे समजते. तेव्हा त्यांनी तुमच्यावर संगीत संयोजनाची जबाबदारी सोपवली होती ना? 
- सुमनताईंनी माझ्या ‘कुंकवाचा करंडा’ या सिनेमात ‘संसार मंदिरी या’ हे गीत म्हटले होते; पण त्यांच्या ऐन उमेदीतली गाणी त्यांनी नंतर पुन्हा एकदा रेकॉर्ड केली. त्यांचा व माझा ऋणानुबंध जुना असून, एक संगीतकार व संगीत संयोजक म्हणून त्यांचा माझ्यावर मोठा विश्वा स असल्यामुळे त्यांनी त्यांची सुमारे ४८ गाणी पुन्हा एकदा नव्याने रेकॉर्ड केली. मुंबईत रेडिओ जेम्स या ठिकाणी ही सर्व गाणी ध्वनिमुद्रित झाली. विशेष म्हणजे सुमनताईंना त्यांच्या मनासारखे संगीत मिळाल्याने त्या समाधानी होत्या! 

‘गाणारं व्हायोलिन’ हे शब्द ऐकल्यावर प्रभाकर जोग यांच्याशिवाय दुसरे नाव डोळ्यांपुढे येऊच शकत नाही! हे सारे कसे घडले? लहानपणापासूनच तुमचे वादन सुरू झाले होते, हे खरे आहे ना?
- मी वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच व्हायोलिन शिकण्याचा प्रयत्न करत होतो. याचे मुख्य कारण म्हणजे माझे थोरले बंधू वामनराव यांचा व्हायोलिन शिकवण्याचा स्वत:चा क्लास होता. त्याच वेळी मी पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडेही शास्त्रीय गायनाचे धडे घेत होतो. मला झेपेल अशा आकाराचे बेबी व्हायोलिन माझ्या आजीने माझ्यासाठी खास आणून देण्याची व्यवस्था केली. बंधूकडे रियाजातून मला व्हायोलिन वादनात मला पुढे अधिक गती प्राप्त होत गेली. त्या वेळच्या भावगीत गायनाच्या काळात मग मी बबनराव नावडीकर यांना व्हायोलिनवर साथसंगत करू लागलो. ‘गाणारं व्हायोलिन’ हे बिरुद मिळण्याचे यश माझ्या संगीतविषयक विचारांमधून, तसेच त्यासाठी घेतलेल्या कष्टांमुळेच साध्य झाले. प्रत्येक गाण्यातील बारकावे, हरकती व मुरक्या यांचा योग्य तिथे वापर केला तर त्याचा श्रोत्यांनाही अधिक आनंद होतो. 

जोगसाहेब, तुम्ही एखादे गाणे वाजवत असताना त्यातले शब्दही श्रोत्यांना ऐकू येतात. ही जादू कशी साधलीत? 
- व्हायोलिनला ‘किंग ऑफ ऑर्केस्ट्रा’ असे म्हणतात. या वाद्यातून सर्व प्रकारचे भाव निर्माण करता येतात. मधुर, रौद्र, भय इत्यादी नवरस वाजवता येतात. शाळेत एसएससी होईपर्यंत मी भावगीतांच्या अनेक मैफलींना व्हायोलिन वाजवून साथसंगत केली. नावडीकरांबरोबरच मालती पांडे, कालिंदी केसकर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांचे संस्कार माझ्या वादनावर झाले. यासाठी आपण वाजवतो ते गाणं केवळ सुरात वाजवून भागत नाही. ते गाणं अधिक प्रभावी होण्यासाठी त्यातले शब्द व गाण्यातले भाव या दोन्हींचा त्यात मिलाफ असायला हवा. यासाठी त्या गाण्याची नोटेशन व्यवस्थित करताना ती पाठही असली, तर ही किमया साध्य होऊ शकते. पु. ल. देशपांडे यांनी माझे ‘पराधीन आहे जगती’ हे गीत रामायणातील गाणे ऐकून त्यावर भाष्य केले, तेव्हा याची प्रचिती आली. पुलं तेव्हा म्हणाले होते, की ‘माणूस एखादे वेळी पराधीन होऊ जातो, पण त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन, की तो नुसताच पराधीन नसतो, तर स्वराधीनही असतो!’ 

‘गाणारं व्हायोलिन’चे जाहीर कार्यक्रम व कॅसेट आणि सीडीजही बऱ्याच गाजल्या. गायकाबरोबरच केवळ वादनाला मिळालेली ही नक्कीच मोठी दाद आहे! तुम्हाला काय वाटते? 
- आतापर्यंत ‘गाणारं व्हायोलिन’चे ८० जाहीर कार्यक्रम झाले आहेत व त्या साऱ्यांना भरपूर दाद मिळाली आहे. तसेच फाउंटन म्युझिक कंपनीचे कांतिभाई ओसवाल यांनी ‘गाणारं व्हायोलिन’चे मराठी व हिंदी गीतांचे मिळून एकंदर १२ संच काढले असून, त्यास देशात व परदेशातही मोठी मागणी आहे! त्याच्या सोबत थोडं नाट्यसंगीत, गीत रामायणातील काही गीतेही आहेत. विशेष म्हणजे रंगमंचावर ती प्रत्यक्ष ऐकताना त्याचा आनंद रसिकांना अधिक घेता येतो. माझ्या जाहीर कार्यक्रमांना ‘स्वरानंद’चे प्रकाश भोंडे यांच्यासारखे चांगले आयोजक मिळाले. मंगश वाघमारे आणि शैला मुकुंद यांच्यासारखे चांगले निवेदक मिळाले, तर तबल्याला प्रसाद जोशी, राजेंद्र दूरकर, बासरीवादनाला अमर ओक, नीलेश देशपांडे, सतारीला प्रसाद गोंदकर, गायत्री गोरे, माझी नातसून दर्शना जोग व सिंथेसायझरला केदार परांजपे यांच्यासारखे चांगले वादक मिळाले. त्यामुळेच हे शक्य झाले. 


‘गाणारं व्हायोलिन’ ही तुमची परंपरा पुढे कोणी चालू ठेवणार आहे? 
- त्यासाठी गाणे व संगीतातील खूप चांगली समज, तसेच भरपूर मेहनत करण्याची तयारी आणि पेशन्स लागतो. अशा शिष्याच्या मी आजही प्रतिक्षेत आहे! आजच्या धावपळीच्या काळात केवळ वादनासाठी इतके कष्ट कोण घेईल, असेही वाटते. संगीत आमच्या पुढच्या पिढीतही उतरले आहे. माझी मुले, श्रीनिवास व मिलिंद चांगले गातात. श्रीनिवास गाण्यांना चालीही लावतो. मिलिंद गिटारही वाजवतो. माझी मुलगी दर्शना जोग-दातार हीदेखील छान गाते. अमेय या नातवातही संगीत रुजले आहे. तो उत्तम की बोर्ड प्लेअर व संगीत संयोजक आहे. 

तुम्ही आजही काही गाण्यांना संगीत देता असे समजले. ते खरे आहे का? 
- होय. मला आजही नव्या चाली सुचतात व त्यातली बहुतेक गीते रोमँटिक प्रेमगीते आहेत! मी अलीकडे १३ गाण्यांना चालीही दिल्या असून, ती गीते संगीता बर्वे यांची आहेत. विठ्ठला रे आता येशील का, नको दुरावा नकोच अंतर, माझिया प्रियाला माझी आठवण नाही, तुझियासाठी वेडी झाले, आल्या आल्या गं पावसाच्या धारा, तुज काय सांगू वेगळे, त्या तुझ्या भेटीत पहिल्या, सांगू कसे तुला मी... अशी ही काही गीते आहेत. झुले झुला झुले झुला हे गीत नुकतेच दीपिका जोग आणि प्रियांका जोग यांनी गाऊन सादरही केले! शक्य झाले, तर या साऱ्या गाण्यांचे पुढे रेकॉर्डिंगही करायची इच्छा आहे. बघू कितपत जमते ते! 

जोगसाहेब, तुमची उमेद व सर्जनशीलता अजूनही तरुण आहे! आपल्यला शुभेच्छा!!
- धन्यवाद!

(प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याच्या सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीताबद्दलचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या मुलाखतीच्या काही भागाचा व्हिडिओही सोबत देत आहोत.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search