Next
देवीदास तुळजापूरकर यांचा पी. साईनाथ यांच्या हस्ते गौरव
BOI
Wednesday, September 12 | 06:27 PM
15 0 0
Share this story

देवीदास तुळजापूरकरपुणे : ‘बँकांमध्ये संघटना शाबूत असल्यामुळे बँक कर्मचारी समाजामध्ये चांगले काम करून दाखवतात. संघटनांच्या व्यवस्थापनाबरोबर होणाऱ्या सेवाशर्तीच्या करारामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये स्थैर्य मिळते आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते’, असे मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रातील सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित ऋणनिर्देश कार्यक्रमात ते बोलत होते. 

चलन-विमुद्रीकरणाच्या काळात बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून, पी. साईनाथ म्हणाले, ‘वॉल स्ट्रीट क्रायसेस’ दरम्यान आपल्या देशाची अर्थव्यवस्था केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमुळेच स्थिर राहिली. राष्ट्रीयीकरणाचा आढावा घेताना शहरी आणि ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकरण-पूर्व आणि पश्चात बँकांच्या शाखा-विस्ताराची आकडेवारी देत आपल्या शेतीप्रधान देशाची अर्थव्यवस्था बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे आणि बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्यामुळेच झाली आहे. तुळजापूरकरांचा विशेष गौरवाने उल्लेख करत ते पुढे म्हणाले, ‘काही माणसे ही निवृत्त होण्यासाठी नसतात आणि तुळजापूरकर हे स्वस्थ बसणारे व्यक्तिमत्व नाही.’

बँक कर्मचाऱ्यांची मोट बांधणारे आणि सर्वात मोठ्या ‘एआयबीईए’ संघटनेचे अध्यक्ष सुरेश धोपेश्वरकरांनी महाबँक कशी मोठी होत गेली हे सांगत, अर्थविकासाचा प्राधान्यक्रम ठरवत सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत ठेवून केल्या गेलेल्या राष्ट्रीयीकरणाबाबतची भूमिका सांगितली. 

सत्काराला उत्तर देताना तुळजापूरकर यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासात बरोबर काम करणाऱ्या सर्वांचा ऋणनिर्देश व्यक्त केला. बँकेमुळे समाजात ओळख, स्थिर आयुष्य आणि मान्यता मिळाल्याचे सांगितले. ‘समाजात बदल घडवून आणणे आणि समाजाला नेतृत्व देण्याची क्षमता ट्रेड युनियन्समध्ये आहे. कारण मानवता, बंधुता आणि शांतता हे ट्रेड युनियन्सचे उद्दीष्ट आहे आणि इतरांसाठी काम केल्यामुळेच जग बदलता येऊ शकते.’ ‘सामाजिक अभिसरणासाठी काम करणाऱ्या चळवळींमध्ये मी आता पूर्ण वेळ कार्य करेन’, असे त्यांनी सांगितले. 

‘एआयबीईए’च्या ललिता जोशी आणि बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी राजीव ताम्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंप्रकाश तिवारी यांनी, तर आभार प्रदर्शन शैलेश टिळेकर यांनी केले. अखिल भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर कुडूपले यांनी साईनाथ यांच्या उपक्रमासाठी फेडरेशनतर्फे दोन लाखाची देणगी जाहीर केली; तसेच तुळजापूरकर यांच्या भविष्यातील सामाजिक उपक्रमासाठी संघटनेतर्फे भरीव आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली. 

राज्यातून आणि राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने बँक कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.        
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link