Next
डॉ. बलदेवानंद सागर यांचे रत्नागिरीत व्याख्यान
६२व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेचे आयोजन
BOI
Monday, February 25, 2019 | 03:58 PM
15 0 0
Share this story

डॉ. बलदेवानंद सागररत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एक व दोन मार्च २०१९ रोजी  कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे हे ६२ वे वर्ष आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पत्रकार, संस्कृतचे जाणकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे संस्कृत अनुवादक आणि प्रसारक डॉ. बलदेवानंद सागर यांचे व्याख्यान ऐकण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेच्या निमित्ताने डॉ. सागर रत्ननगरीत येत असून, एक मार्चला ‘संस्कृत प्रसारमाध्यमे’ आणि दोन मार्चला ‘आधुनिक संस्कृतचे स्वरूप’ या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात ही व्याख्यानमाला होईल.

महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे वर्षभर नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात. यांपैकी कालिदास व्याख्यानमाला ही एक प्रदीर्घ परंपरा असणारी व्याख्यानमाला आहे. आजवर वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे निवृत्त कुलगुरू डॉ. अभिराज राजेंद्र मिश्र, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या निवृत्त कुलगुरू डॉ. उमा वैद्य, डॉ. प्र. के. घाणेकर, डॉ. इंदुमती काटदरे आदी मान्यवरांनी या व्याख्यानमालेचे व्याख्यातेपद भूषविले आहे. या वर्षी डॉ. बलदेवानंद सागर यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ संस्कृत रसिकांना मिळणार आहे.

डॉ. सागर यांनी आजवर आकाशवाणीसाठी ४४ वर्षे, तर दूरदर्शनसाठी २२ वर्षे संस्कृत वार्ता संपादन, प्रसारण आणि व्यवस्थापनाचे कार्य केले आहे. उज्जैनच्या कालिदास संस्कृत अकादमीचे ते संचालक आहेत. राष्ट्रीय नाट्यविद्यालय, एशियन अॅकेडमी ऑफ फिल्म्स अँड टेलीव्हिजन, नवी दिल्लीतील श्री लालबहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे ते अतिथी व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. सागर यांनी ‘दी ग्रेट मास्टर्स’ या दूरदर्शन मालिकेसाठी अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दिल्ली येथे २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनाच्या यशस्वी आयोजनातही त्यांचे मोलाचे योगदान होते. राष्ट्रीय दृष्टीबाधितार्थ संस्थानच्या ‘टॉकिंग बुक लायब्ररी’साठी त्यांनी संस्कृत साहित्याच्या ४०० ध्वनिमुद्रिकांचे, तसेच अन्य अनेक स्तोत्रांचे ध्वनिमुद्रण केले आहे. त्यांना काशीतील अखिल भारतीय विद्वत परिषदेचा ‘वाग्भूषणम् पुरस्कार’, वाङ्मयविमर्श, दिल्लीच्या चरवैति यांचा ‘उद्घोषणा– मर्मज्ञ पुरस्कार’, तर कानपूर येथील भारतीय चिंतक समाजतर्फे ताम्रपत्र व स्मृतिचिन्हाने देऊन सन्मानित केले आहे. संस्कृतशी निगडीत विविध विषयांवर त्यांचे विपुल लेखन आहे.

‘या व्याख्यानमालेचा लाभ विद्यार्थी, संस्कृतप्रेमी आणि जाणकार रसिकांनी अवश्य घ्यावा,’ असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link