Next
चल अकेला, चल अकेला...
BOI
Sunday, January 27, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आजही आवर्जून गुणगुणावीशी वाटणारी अनेक गीते संगीतबद्ध केलेले नामवंत संगीतकार म्हणजे ओ. पी. नय्यर. त्यांचा जन्मदिवस आणि स्मृतिदिन जानेवारी महिन्यातच असतो. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘चल अकेला...’ या त्यांच्या गीताचा...
.........
या पृथ्वीवर ‘त्याचे’ आगमन जानेवारी महिन्यात झाले आणि या दुनियेतून ‘त्याचे’ गमनही याच महिन्यात झाले. ‘शास्त्रीय संगीतातील मला काही कळत नाही,’ असे ‘तो’ म्हणायचा; पण तरीही रसिकांना नादावणारी गाणी ‘त्याने’ संगीतबद्ध केली होती. ‘घोडागाडी’ ठेक्याचे संगीत म्हणजे ‘तो’, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत चालत असे; पण अशा संगीताव्यतिरिक्तही त्याने किती छान आणि विविध प्रकारची गाणी दिली होती, त्याची ही एक छोटीशी झलक बघा -

‘आईयें मेहरबाँ...’ (हावडा ब्रिज), ‘सच बता तू मुझपे फिदा...’(सोने की चिडिया) यांसारखी मदमस्त गाणी ‘त्याने’ दिली होती. ‘उधर तुम हसी हो...’(मिस्टर अँड मिसेस ५५) ‘जवानीया ये मस्त मस्त...’ (तुमसा नहीं देखा) यांसारखी सदाबहार गाणीही ‘त्याच्या’ संगीताचा एक भाग होती. ‘क्लासिकल’ बाजाची गाणी म्हणाल, तर ‘कल्पना’ चित्रपटातील ‘तू है मेरा प्रेमदेवता’  किंवा ‘फिर वही दिल लाया हूँ’ चित्रपटातील ‘देखो बिजली डोले बिन बादल की’ यांसारखी गाणी ऐकायला मिळतील!

आना है तो आ...’(नया दौर), ‘गरीब जान के...’ (छू मंतर) यांसारखी गंभीर गाणीही ‘तो’ देऊ शकतो, हे त्याने दाखवले होते. ‘पिया मैं हूँ पतंग तू डोर...’ (रागिणी), ‘झुकी झुकी प्यार की नजर...’ (जॉनी वॉकर) यांसारखी मेलोडियस गाणी ‘त्याचे’ वेगळेपण दाखवण्यास समर्थ आहेत. 

हा ‘तो’ म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार ओ. पी. नय्यर हे आपण जाणलेच असेल. १६ जानेवारी १९२६ ही त्यांची जन्मतारीख आणि २८ जानेवारी २००७ हा त्यांचा मृत्युदिन! ‘ओ. पी. नय्यर म्हणजे घोडागाडीचा ठेका’ असे जे म्हटले जायचे, ते केवढे फोल होते हे दाखविण्यासाठीच ओ. पी. नय्यर यांनी संगीत दिलेल्या अन्य प्रकारच्या गीतांची एक अल्पशी झलक वर नमूद केली आहे. संगीतातील जाणकार हेही जरूर सांगतील, की ‘ओपीं’नी घोडागाडीचा ठेका भरपूर वापरूनही तो कधी कंटाळवाणा होऊ दिला नाही. 

‘बाप रे बाप’ चित्रपटातील ‘पिया पिया मेरा जिया पुकारे...’, ‘तुमसा नहीं देखा’मधील ‘यूँ तो हमने लाख हसीं देखे...’, तसेच हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘ये क्या कर डाला तूने...’ आणि ‘नया दौर’मधील ‘मांग के साथ तुम्हारा...’ या गाण्यांमध्ये घोडागाडी ठेका असूनही, तोच तोपणा जाणवत नाही. 

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून एकही गाणे गाऊन न घेण्याचा अनोखा विक्रम ‘ओपीं’नी केला आणि ‘रागिणी ‘चित्रपटात पडद्यावर किशोरकुमारच्या तोंडी असलेले गाणे मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेण्याचा वेगळा प्रकारही त्यांनीच केला. ‘किशोरला रफीचा आवाज’ हा प्रकार कसा घडला, याची हकीकत सांगताना एका मुलाखतीत ओ. पी. नय्यर म्हणाले होते की, ‘‘रागिणी’ हा चित्रपट अशोक कुमारचीच निर्मिती होता. त्या चित्रपटातील ‘मन मोरा बावरा निसदिन गाए...’ हे गीत मोहम्मद रफी यांच्याच आवाजात योग्य ठरेल असे मला वाटले होते; पण हे जेव्हा किशोरकुमारना कळले, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुरकुर केली; पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. आणि अशोककुमार यांनीही माझीच बाजू घेतली. त्यामुळे किशोरचा नाईलाज झाला व ते गीत मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतले.’

ओ. पी. नय्यर आणि आशा भोसले या दोन कलाकारांनी एकत्र येऊन जी संगीताची मेजवानी रसिकांना दिली आहे, ती अवर्णनीयच आहे. ‘यही वो जगह है’ (यह रात फिर न आयेगी), ‘जाईये आप कहाँ जाएंगे’ (मेरे सनम), ‘जरा होले होले चलो मोरे साजना ‘(सावन की घटा), ‘हाथ आया है जबसे’ (दिल और मोहब्बत) अशी अनेक रत्ने आणि माणकांनी ‘ओपी – आशा’ हा खजिना भरलेला आहे. 

मोहम्मद रफी, किशोरकुमार, मुकेश, तलत, महेंद्र कपूर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायक-गायिकांकडून उत्तम गीते गाऊन घेणारे ‘ओपी’ आपल्या कारकिर्दीत या गायक-गायिकांचा जेवढ्या आदराने उल्लेख करायचे, तसेच वादकांनाही ते विसरले नव्हते. सीआयडी चित्रपटातील ‘कहीं पे निगाहें...’ या गाण्यातील सारंगी वाजणारे ‘रामनारायण’ यांचा उल्लेख ते आवर्जून करीत असत. 

पांचोली आर्टस् चित्रसंस्थेने ‘आसमान’ चित्रपटाद्वारे ‘ओपीं’ना ब्रेक दिला. लहानपणी ‘किस्मत ‘चित्रपटाची गाणी ते स्टेजवरून गात असत! मास्टर गुलाम हैदर आणि श्यामसुंदर हे संगीतकार त्यांना गुरुस्थानी होते. त्या दोघांनी पंजाबी ढंगाने हिंदी चित्रपटगीते समृद्ध केली आणि ‘ओपीं’नी काही काळ हा वारसा पुढे चालवला. 

अर्थात ‘ओपीं’नी संगीत दिलेली गाणी पडद्यावर साकार झाली, ती पडद्यावर गाण्यासाठी नामांकित नायक, मोठ्या चित्रसंस्था त्यांच्या वाट्याला फारशा आल्याच नाहीत. देव आनंद दोन चित्रपटांत आणि दिलीपकुमार व राज कपूर एकेका चित्रपटापुरते वाट्याला आले. जॉय मुखर्जी, शेख मुख्तार, विश्वजित, जॉनी वॉकर, भारतभूषण, देव मुखर्जी अशाच नायकांनी त्यांची गीते पडद्यावर साकार केली. तरीही त्या नायकांचे चित्रपट ओ. पी. नय्यर यांच्या संगीतामुळे चालले व लक्षात राहिले.
 
ओ. पी. नय्यर यांचा एक काळ होता. तो संपल्यावर आशा भोसले यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. तेव्हा त्यांनी वाणी जयराम, दिलराज कौर, पुष्पा पागधरे या गायिकांकडून काही गाणी गाऊन घेतली; पण ‘बात कुछ जमीं नहीं!’ त्यापूर्वीचे ‘ओपी’ त्या गीतांतून तितके दिसून आले नाहीत. उतारवयात त्यांनी मुंबई सोडली आणि ते मुंबईच्या उपनगरात राहू लागले. 

त्या काळात पुन्हा एका प्रकाराने ओ. पी. नय्यर हे नाव चर्चेत आले होते, ते मध्य प्रदेश सरकारने त्यांना देऊ केलेला लता मंगेशकर पुरस्कार त्यांनी नाकारला तेव्हा. त्याबाबत ते म्हणाले होते, ‘मला पैशांची निकड असताना, फक्त तत्त्वासाठीच मी हा पुरस्कार नाकारला.’ 

आपल्या विचारांनी, आपल्या तत्त्वांनी एकटाच चालत राहणारा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील वेगळा कलावंत सुंदर गीतांच्या रूपाने आपल्या स्मृती मागे ठेवून २००७मध्ये निघून गेला. 

जीवनाची वाटचाल अशा काही तत्त्वांनी चालताना त्या त्या व्यक्तीला एकटेच चालावे लागते. अशा लोकांसाठीच कवी प्रदीप यांनी एक सुंदर व अर्थपूर्ण गीत लिहिले होते. ते संगीतबद्ध करण्याचे काम ओ. पी. नय्यर यांच्याकडे आले होते. त्या गीताला ‘ओपीं’नी एकदम वेगळे संगीत दिले. ‘ठराविक बाजाचे संगीत देणारे ‘ओपी’ ते हेच का’ असा प्रश्न त्या गीताची चाल, संगीत ऐकल्यावर पडावा, एवढे ते संगीत वेगळे होते. महत्त्वाचे म्हणजे ते गीत चित्रपटप्रेमींना आवडलेही होते व आजही आवर्जून ऐकावेसे वाटते. 

तेच आजचे ‘सुनहरे गीत’ आहे. ते गीत ज्या चित्रपटातून पुढे आले तो चित्रपट होता १९६९चा ‘संबंध!’ मुकेश यांचा फारसा वापर ओ. पी. नय्यर यांनी केलेला नाही; मात्र या गीताकरिता त्यांनी मुकेश यांच्या अनोख्या स्वराचा छान उपयोग करून घेतला आहे. मुकेश यांनी गायलेले हे गीत दर्दभरे नाही, प्रेमगीत नाही, तर धीर देणारे, मार्गदर्शक असे छान गीत आहे. 

बघा, या गीतातून कवी प्रदीप काय सांगतात ते -

तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला

(अरे) तुला साथ देऊ म्हणणारे, सहाय्य करू म्हणणारे सारे मार्गामध्ये मध्येच तुला सोडून गेले (म्हणून काय झाले? अरे) हे चालत राहणाऱ्या मुसाफिरा, तू एकटाच चल, एकटाच चालत राहा (निराश न होता) एकटाच पुढे जात राहा! 

हजारो मील लंबे रास्ते तुझ को बुलाते 
यहाँ दुखडे सहने के वास्ते तुझ को बुलाते 
है कौनसा वो इन्सान यहाँ पर जिसने दुख ना झेला 
चल अकेला, चल अकेला, चल अकेला 

(अरे तुला कोणी साथ देणारे बरोबर नसले, म्हणून काय झाले. अरे हे बघ, उच्च ध्येयाचे) हजारो मैल लांबीचे हे रस्ते, मार्ग तुला बोलवत आहेत. (कष्ट करणे, सहन करणे, विपत्तीशी सामना करणे असेच सारे या मार्गावर असल्यामुळे) कष्ट सहन करण्यासाठीच हे रस्ते तुला बोलवत आहेत. (आणि मलाच दु:ख का, हा विचार जर तुझ्या मनात आला, तर मला सांग की) येथे असा कोण माणूस आहे, की ज्याने कधीच दु:ख सहन केले नाही? (म्हणूनच दु:खाचा जास्त विचार न करता) तू एकटा चालत राहा, कार्य करत राहा. 

दु:खी व एकट्याने चालणाऱ्यांना धीर देण्यासाठी कवी प्रदीप पुढे लिहितात - 

तेरा कोई साथ ना दे तो तू खुदसे प्रीत जोड ले 
बिछौना धरती को कर के, अरे आकाश ओढ ले
यहाँ पूरा खेल अभी जीवन का तूने कहाँ है खेला 
चल अकेला, चल अकेला, चल अकेला...

कोणी तुला साथ करत नाही (ना? नको करू दे) तू स्वतःवरच प्रेम करायला शीक! (स्वतःच्या विचारांवर प्रेम करायला, निष्ठा ठेवायला शीक, तू स्वतःच्या विचारांशी ठाम राहा) (प्रसंग आला, तर या) धरणीचा बिछाना करून आकाश पांघरून घे (म्हणजेच आलेले दु:ख स्वीकार) कारण जीवनाचा हा सारा खेळ अजून तू कुठे खेळला आहेस? (अजून खूप जगायचे आहे आणि भोगायचेही आहे.)

दोनच कडव्यांचे, साध्या-सोप्या शब्दांतील हे गीत मुकेश यांच्या स्वराने आणि ओ. पी. नय्यर यांच्या संगीतामुळे अत्यंत प्रभावी व परिणामकारक बनले आहे. सहज गुणगुणावी अशी ही चाल, कोरसचा उत्तम वापर, व्हायोलीन, बासरी, पियानो या वाद्यांचा सुरेल वापर!... सारेच ‘सुनहरे!’ अशा चाली बांधणारे ओ. पी. नय्यर यांना विनम्र अभिवादन! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ithape Dnyaneshwar About 266 Days ago
आजचं निवडलेले गाणं सुंदर आहे. आपण त्याचा सांगितलेला अर्थ खरंच चांगलं होता. आपल्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
0
0
Rajiv Lawanghare, satara, Maharashtra. About 266 Days ago
It is 😍💕song, great one. O. P., meaningful wording, melodious music, sweat voice, nice chorus 🌹🌹🌹🌹🌹
0
0

Select Language
Share Link
 
Search