Next
‘एशियाटिक सोसायटी’चे वैशिष्ट्यपूर्ण श्वेत रूप
BOI
Saturday, November 24, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:प्रत्येक रंगाचा स्वभाव वेगळा असतो. रंगाच्या स्वभाववैशिष्ट्यातून इमारती नकळतपणे संवाद साधत असतात. ब्रिटिश काळात बांधलेली मुंबईतील एशियाटिक सोसायटी ही एकमेवाद्वितीय इमारत आहे. पांढरा रंग तिचे सौंदर्य खुलवतो. हा रंग वरकरणी शांत, सौम्य वा सदैव प्रसन्न दिसतो. परंतु या रंगात एक प्रकारचा दरारा दडलेला असतो, हे या इमारतीकडे पाहून जाणवते. या संस्थेच्या कार्याचा दरारा आहेच; तो रूपातूनही प्रकट होतो. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी संस्थेचा २१५वा स्थापना दिन आहे. त्या निमित्ताने, या इमारतीचे स्थापत्य, शैली व रंग-सौंदर्याची वैशिष्ट्ये सांगणारा, मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला हा लेख...
............
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगप्रसिद्ध शैलीत मुंबईत दोन इमारती बांधल्या गेल्या. पहिली सरकारी टाकसाळ व दुसरी एशियाटिक सोसायटी, जी टाउन हॉल म्हणूनही ओळखली जाते. २६ जानेवारी १८०४ रोजी आशिया खंडातील देशांचा अभ्यास करण्यासाठी ‘लिटररी, मुंबई’ या संस्थेची स्थापना सर जेम्स मॅकिन्टोश यांनी केली होती. मुंबईत सार्वजनिक सभागृहाची गरज ओळखून मेजर हॉकिन्स याने तत्कालीन गव्हर्नर डंकनच्या मदतीने जागेची निवड केली. त्यानुसार सन १८११मध्ये कर्नल थॉम कौपरने ग्रीक-रोमन शैलीत इमारतीचा आराखडा बनवला. या शैलीला पुनरुज्जीवित निओ क्लासिकल शैली म्हणूनही ओळखले जाते. इमारतीचे बांधकाम सन १८२०मध्ये सुरू झाले आणि सन १८३३मध्ये पूर्ण झाले. सर्वप्रथम एशियाटिक सोसायटीने या इमारतीत जागा मिळवली.

याच शतकाच्या उत्तरार्धात सारासेनिक (मिश्र - हिंदू व मुघल वास्तू-स्थापत्य घटकांचा मिलाफ) शैलीला कला-सौंदर्याची जोड देऊन बांधलेल्या पुरातन इमारतींची रेलचेल दक्षिण मुंबईत आढळते. तत्कालीन दक्षिण मुंबईत केवळ गरजेसाठी बांधलेल्या इमारतींची संख्या कला-सौंदर्याने नटलेल्या पुरातन इमारतींच्या तुलनेत अधिक आहे. आजही त्यात बदल झालेला नाही. असे असूनही पुरातन इमारतीच खऱ्या अर्थाने मुंबईची शान राखून आहेत.एशियाटिक सोसायटीच्या इमारतीच्या दर्शनी भागातील ऐसपैस व्हरांड्यातील डोरीक शैलीतील उंच, ठसठशीत भारवाहक स्तंभ, अनेक पायऱ्यांचा भव्य दगडी सोपान व मानवी दृष्टिक्षेपात मावणारा, पण अभ्यागतास खुजेपणाची अव्यक्त जाणीव करून देणारा दर्शनी देखावा, भव्य दरवाजे व खिडक्या ही इमारतीची वरकरणी दिसणारी वैशिष्ट्ये आहेत. या शैलीतील इमारती भव्यता, प्रमाणबद्धता व शांततेचे प्रतीक समजल्या जातात. त्या काळात, ब्रिटिश साम्राज्याचे महत्त्व प्रस्थापित करण्याचे आणि समाजावर दरारा व प्रभाव निर्माण करण्याचे कामही याच इमारतीने केले होते. वास्तुविशारदाचे कौशल्य व गुणवत्ता इमारतीच्या दृश्य रूपातून समाजावर प्रभाव टाकण्याचे कार्य करू शकतात व तो प्रभाव अनंतकाळ टिकून राहू शकतो, हे या इमारतीच्या अंतर्बाह्य रूपातून दिसून येते. 

एशियाटिक सोसायटीचा जुना फोटो (स्रोत : विकिपीडिया)स्थापत्य-वास्तू आरेखनात रेषांना खूप महत्त्व असते. सरळ, साध्या व मोजक्या रेषेतील आरेखन, भव्य पण मानवी दृष्टिकक्षेत मावणारा आकार व शुभ्र पांढऱ्या रंगामुळे मूळ वास्तूचे सौंदर्य उजळून निघण्यास मदत होते. त्यामुळेच इमारत प्रसन्न दिसते. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने या वास्तूला ‘ग्रेड-१’ असा दर्जा दिला आहे. या वैशिष्ट्यांना जोडणारा आणखी एक लक्षवेधी घटक महत्त्वपूर्ण ठरतो, तो म्हणजे इमारतीचा एकवर्णी रंग. वास्तविक पाहता पांढरा रंगच या इमारतीचे सौंदर्य खुलवतो. इतर कोणत्याही रंगाचे मूळ सौंदर्य खुलवण्याची ताकद केवळ या रंगात आहे, हे वरील छायाचित्रातून दिसून येते. पांढरा रंग वरकरणी शांत, सौम्य वा सदैव प्रसन्न दिसतो. परंतु या रंगात एक प्रकारचा दरारा दडलेला असतो, हे या इमारतीकडे पाहून जाणवते. एशियाटिक सोसायटीची इमारत ही वास्तुशैली, आकार, रंग व अवकाश याचे एकत्रित दर्शन घडवणारी एकमेवाद्वितीय इमारत आहे.

भायखळा चर्च (पुनरुज्जीवनानंतर आणि पुनरुज्जीवनाआधी)

पांढऱ्या रंगाचा एकूण प्रभाव दर्शवणारे दक्षिण मुंबईतील दुसरे समकालीन उदाहरण म्हणजे १८३३मध्ये बांधलेले भायखळा चर्च. २०१६मध्ये पुनरुज्जीवन करताना चर्चचा मातकट गुलाबी रंग काढून प्रथमच पांढऱ्या रंगात रंगलेपन केल्यामुळे इमारतीला उजाळा मिळाला आहे. (या चर्चचे वास्तुसौंदर्य उलगडणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जिंदाल मॅन्शन

दक्षिण मुंबईतील, पेडर रोडवरील पांढऱ्या रंगातील मिश्र-आधुनिक शैलीतील ‘जिंदाल मॅन्शन’ ही इमारत आपले लक्ष वेधून घेते. या इमारतीच्या दर्शनी भागाच्या अवलोकनातून, इमारतीच्या दर्शनी खिडक्यांच्या तावदानामुळे प्राप्त झालेल्या काळसर रंगाला पांढरा रंग सामावून घेतो असे दिसते; पण पांढरा रंग स्वत:चा दरारा राखून ठेवतो, हेही त्यातून दिसते. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाप्रमाणे कोणत्याही रंगास कवेत घेण्याचा गुण कृष्णवर्णातच सामावलेला आहे, हे जिंदाल मॅन्शनच्या शेवटच्या मजल्यावरील बाल्कनीतील रंगछटेकडे लक्षपूर्वक पाहिल्यास समजून येते.  

वास्तुसिद्धांतानुसार एशियाटिक सोसायटीच्या इमारतीचे अंतर्बाह्य सौंदर्य इमारतीच्या साधेपणात दडलेले आहे. इमारतीच्या दृश्य भागात कोठेही व्यापारी ऐश्वर्याचा भपका जाणवत नाही, जाणवते ती भव्यता. ब्रिटिशांचे सामर्थ्य, शांतता व सुव्यवस्थेचा सरकारी संदेश देण्याचे काम या इमारतीने चोखपणे बजावले होते. जवळपास १८५ वर्षांपासून या इमारतीचे रंगलेपन पूर्णत: शुभ्र पांढऱ्या रंगातच केले जाते. पांढरा रंग स्वत:चे अस्तित्व कायम ठेवून इतर रंगांना उठाव देतो. इतर कोणत्याही रंगछटेला सामावून घेण्याचे सामर्थ्य फक्त एकट्या पांढऱ्या रंगातच आहे. कोणताही एक रंग इतर रंगाच्या सहकार्याशिवाय आपले खरे रूप ठसवू शकत नाही, ही रंगकिमया एशियाटिक सोसायटीच्या या पुरातन इमारतीने खरी करून दाखविली आहे. मूलतः सुंदर असलेल्या इमारतीला उजाळा देण्याचे काम करणे म्हणजे कल्पनांची पूर्तता (idea realization) करण्यासारखे आहे. एशियाटिक सोसायटीला २१५व्या स्थापना दिनाच्या अनंत शुभेच्छा...!

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
premen bothara About 294 Days ago
sir...chan lekh...mahiti ani abhyaspurna...salam aplya prayatnana
0
0
MAHENDRA BHAPKAR CHITRAKAR About 297 Days ago
Very nice
0
0
J s lakade About 297 Days ago
Thanks ,came to know architectural aspects of important buildings.
0
0
Manoj Kulkarni About 298 Days ago
Thanks for making us aware and known to great Caltural Heritage of Bombay with correct information of Architectural highlights of important buildings having average historical age not less than 100 years. All the Best . Manoj Kulkarni
0
0
Balkrishna Kulkarni About 298 Days ago
श्री.बुरांडे साहेब-- एक अप्रतिम वास्तू व तितकाच अप्रतिम लेख...! धन्यवाद..!
0
0

Select Language
Share Link
 
Search