पुणे : ‘पाण्याने आपल्याला स्वच्छ ठेवले पाहिजे, असे आपल्याला वाटते; पण पाण्याला स्वच्छ ठेवायची जबाबदारी कोणाकडूनही घेतली जात नाही. म्हणून पाण्यावर प्रेम केले पाहिजे आणि जल स्वच्छता ही लोकचळवळ झाली,’ असे मत किशोर पंप्सचे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई यांनी व्यक्त केले.
‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’ यांच्यातर्फे ‘रोटरी जलोत्सव २०१८’च्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी रावसाहेब पवार, नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे, रश्मी कुलकर्णी, महेश पाठक, संयोजक सतीश खाडे, डॉ. श्रीकांत गबाले, अशोक भंडारी आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
तीन दिवसीय उत्सवाची सांगता घोले रस्त्यावरील नेहरू सभागृहात झाली. पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. तिसऱ्या दिवशी शांतीलाल मुथा यांनी भारतीय जैन संघटनेतर्फे ‘सुजलाम सुफलाम बुलढाणा जिल्हा’ या दुष्काळमुक्ती प्रकल्पाची माहिती दिली. ‘अपूर्व मेघदूत’मधील काही प्रवेश सादर करण्यात आले. महेश पाठक यांनी पाण्याच्या नियंत्रित वापरासाठीच्या सॉफ्टवेअर्सची माहिती दिली. ‘वॉटर ऑलिंपियाड’मधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
देसाई म्हणाले, ‘जगात फक्त तीन टक्के शुद्ध पाणी उपलब्ध आहे. ते कचऱ्यापासून वाचवले पाहिजे. पाण्यात कचरा टाकण्याची सवय बंद केली पाहिजे. पाण्यात धार्मिक विधी करण्याचा दृष्टिकोनही बदलायला हवा. पाण्याने आपल्याला स्वच्छ ठेवले पाहिजे, असे आपल्याला वाटते; पण पाण्याला स्वच्छ ठेवायची जबाबदारी घेतली जात नाही. म्हणून पाण्यावर प्रेम केले पाहिजे आणि जल स्वच्छता ही लोकचळवळ झाली पाहिजे. पाणी अस्वच्छ झाले, तरी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येतो, हे लक्षात घेतले पाहिजे.’
‘इथून पुढे मलनिःसारण प्रक्रियेसाठी लिलाव पुकारले जातील. कारण वाया जाणाऱ्या प्रत्येक जैविक गोष्टीत ऊर्जा दडलेली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.