Next
शं. ना. नवरे, राजन गवस, चारुता सागर
BOI
Tuesday, November 21 | 04:00 AM
15 0 0
Share this story

लग्न होण्याआधी आपल्या प्रेयसीला ती घरी एकटी असताना रात्री भेटायला येण्यासाठी होकार देऊनही प्रत्यक्षात मात्र तिला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला आलेला प्रियकर तिला म्हणतो, ‘रात्र वेडी असते, पण शहाणी असते ती सकाळ’ आणि हे प्रेमातलं शहाणपण आणि सुसंस्कार आपल्या नाटिकेतून अत्यंत सुंदररीत्या प्रेक्षकांना समजवणारे शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजन गवस आणि ‘चारुता सागर’ या नावाने लेखन करणारे दिनकर भोसले यांचा २१ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांचा थोडक्यात परिचय...
..........
शंकर नारायण नवरे

२१ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले शंकर नारायण नवरे ऊर्फ ‘शन्ना’ म्हणजे कथा, कादंबऱ्या आणि नाट्य क्षेत्रातले एक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे लेखक. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखनही केलं होतं.

प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आणि भावविश्वावर त्यांनी लेखन केलं. ‘आनंदाचं झाड’ हे त्यांच्या एका पुस्तकाचं नाव  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असंच होतं. शन्ना म्हणजे आनंदी वृत्ती, शन्ना म्हणजे प्रसन्नता, शन्ना म्हणजे उत्साह असंच एकूण त्यांचं चालणंबोलणं असे. त्यांचं लिखाण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच आनंददायी, सकारात्मक आणि तजेलदार होतं.

अस्सल डोंबिवलीकर असलेल्या शन्नांनी ठाणे, मुंबई आणि तिथल्या मध्यमवर्गीय आणि पांढरपेशा माणसांच्या दैनंदिन समस्या जवळून पाहिल्या, अनुभवल्या होत्या आणि त्याचं यथार्थ चित्रण त्यांच्या लेखनातून झालेलं दिसून येतं. त्यांना लेखनाची मनस्वी आवड होती आणि ती त्यांनी कसोशीनं जपली. त्यामुळे त्यांचं लेखन अखेपर्यंत टवटवीत राहिलं. 

तिळा उघड, जत्रा, कोवळी वर्षं, इंद्रायणी, सखी, खलिफा, भांडण, बेला, झोपाळा, वारा, निवडुंग, परिमिता, मनातले कंस, शहाणी सकाळ, बिलोरी, मार्जिनाच्या फुल्या, अनावर, एकमेक, मेणाचे पुतळे, सर्वोत्कृष्ट शन्ना, तिन्हीसांजा, शांताकुकडी, कस्तुरी, पर्वणी, झब्बू, पाऊस, निवडक, पैठणी, असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

एक असतो राजा, मन पाखरू पाखरू, धुक्यात हरवली वाट, नवरा म्हणू नये आपला, ग्रँड रिडक्शन सेल, सुरुंग, धुम्मस, सूर राहू दे, गुंतता हृदय हे, हवा अंधारा कवडसा, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, रंगसावल्या, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो, ही त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. 

घरकुल, बाजीरावचा बेटा, बिरबल माय ब्रदर (इंग्रजी), कैवारी, हेच माझं माहेर, असंभव (हिंदी), कळत नकळत, जन्मदाता, निवडुंग, सवत माझी लाडकी, तू तिथं मी, झंझावात, मी तुझी तुझीच रे, एक उनाड दिवस, आनंदाचं झाड यांसारख्या चित्रपटांच्या कथा त्यांच्याच होत्या. 

पु. भा. भावे पुरस्कार, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, नाट्यभूषण पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा गडकरी पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार, तेजस पुरस्कार, वि. वा. शिरवाडकर पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, प्रज्ञा गौरव पुरस्कार, गदिमा पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार असे कितीतरी प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘शन्ना’ना मिळाले होते.

२६ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचं डोंबिवलीमध्ये निधन झालं. 

(शं. ना. नवरे यांची सर्व पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.) 
..................

राजन गवस 

२१ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेले राजन गवस हे सामाजिक प्रश्नांवर लेखन करणारे प्रसिद्ध लेखक. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य अशा ज्वलंत सामाजिक प्रश्नांकडे आपल्या लेखनाद्वारे त्यांनी कायमच वाचकांचं लक्ष वेधलं आहे. 

त्यांच्या काही गाजलेल्या पुस्तकांचे असमिया, कानडी, गुजराथी, हिंदी, इंग्लिश भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘तणकट’ कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. भाऊ पाध्ये यांच्या लेखनावर त्यांनी पीएचडी केली आहे. 

ब बळीचा, भाऊ पाध्ये यांची कथा, चौंडकं, कैफियत, कळप, रोकडे पाझर, आपण माणसात जमा नाही, भंडारभोग रिवणावायली मुंगी, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(राजन गवस यांची सर्व पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......................

दिनकर दत्तात्रय भोसले

२१ नोव्हेंबर १९३० रोजी जन्मलेले दिनकर दत्तात्रय भोसले हे ‘चारुता सागर’ या नावाने लेखन करत असतात.   
नागीण, नदीपार, मामाचा वाडा असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘दर्शन’ या कथेवर आधारित ‘जोगवा’ या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

२९ मे २०११ रोजी त्यांचा मृत्यू झाला.     

(चारुता सागर यांची सर्व पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link