Next
आनंद बक्षी, रॉबिन विल्यम्स
BOI
Saturday, July 21, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

साडेतीन हजारांहून अधिक गीतं लिहिणारे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक बहुप्रसवा गीतकार आनंद बक्षी आणि श्रेष्ठ स्टँड-अप कॉमेडियन व चतुरस्र अभिनेते रॉबिन विल्यम्स यांचा २१ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
आनंद बक्षी 

२१ जुलै १९३० रोजी रावळपिंडीमध्ये जन्मलेले आनंद बक्षी हे साडेतीन हजारहून अधिक गीतं लिहिणारे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक बहुप्रसवा गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आल्यावर त्यांनी भारतीय लष्करात नोकरी केली; पण फिल्म इंडस्ट्रीच्या वेडाने त्यांना मुंबईत खेचून आणलं. शशी कपूरच्या १९६२ सालच्या ‘मेहंदी लगी मेरे हाथ’पासून त्यांना ओळख मिळायला सुरुवात झाली आणि शशीच्याच १९६५ सालच्या ‘जब जब फूल खिले’तल्या सर्वच गाण्यांमुळे त्यांचं नाव भारतभर पोहोचलं. पुढच्याच ‘मिलन’ सिनेमातल्या गीतांनी त्यांचं मुंबईच्या फिल्म जगतातलं गीतकार म्हणून आदराचं स्थान पक्कं झालं. त्यांनी मुख्यत्वेकरून लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन आणि कल्याणजी आनंदजी या तिघांबरोबर प्रचंड काम केलं. ‘तुम जो आओ तो प्यार आ जाये’, ‘मेरे मेहबूब कयामत होगी’, ‘खूबसूरत हसीना जाने जा जानेमन’, ‘ये दर्दभरा अफसाना सुन ले अनजान जमाना’, ‘सुनो सजना जहाँ तक घटा चाले’, ‘बहारों ने मेरा चमन लूटकर’, ‘गुजरा जमाना बचपन का’, ‘कभी रातदिन हम दूर थे’, ‘मेरे बेचैन दिल को चैन तूने दिया’ - अशी गाणी सुरुवातीच्या दहा वर्षांत लिहिणाऱ्या आनंद बक्षींनी नंतरच्या काळातल्या राजेश खन्ना, जितेंद्र आणि पुढे अमिताभच्या अनेक सिनेमांसाठी हिट गाणी लिहिली. ‘मोम की गुडिया’ सिनेमात त्यांनी लतादीदींबरोबर ‘बागों मे बहार आयी, होठों पे पुकार आयी’ हे द्वंद्वगीत गायलंही होतं. त्यांना ४० वेळा फिल्मफेअरचं नामांकन आणि चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ३० मार्च २००२ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. 
....... 

रॉबिन विल्यम्स  

२१ जुलै १९५१ रोजी इलिनॉयमध्ये जन्मलेला रॉबिन विल्यम्स हा एक श्रेष्ठ स्टँड-अप कॉमेडियन आणि चतुरस्र अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता. एक ऑस्कर, सात गोल्डन ग्लोब, चार ग्रॅमी अशी पुरस्कारांची भरघोस कमाई त्याने केली होती. सत्तरच्या दशकात त्याने कॅलिफोर्नियामधून कॉमेडी-क्लब्समधून आपली कला सादर करायला सुरुवात केली. त्यातूनच त्याला अमेरिकन टीव्हीवर ‘मॉर्क अँड मिंडी’ हा स्वतःचा शो सुरू करायची संधी मिळाली. तो कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला आणि त्याला हॉलिवूडची दारं खुली झाली. ‘गुड मॉर्निंग, व्हिएतनाम’ हा त्याचा पहिला गाजलेला सिनेमा. त्यातल्या भूमिकेबद्दल त्याला ऑस्कर नामांकन मिळालं होतं. डेड पोएट्स सोसायटी, मिसेस डाउटफायर, मॉस्को ऑन दी हडसन, दी फिशर किंग यांमधल्या भूमिकांबद्दल त्याचं कौतुक होत गेलं आणि पुढे ‘गुडविल हंटिंग’मधल्या भूमिकेबद्दल त्याला ऑस्कर मिळालं. पॅच अॅडम्स, वन अवर फोटो, नाइट अॅट दी म्युझियम सीरिज, दी बिग वेडिंग, हुक, अल्लादिन, जुमांजी - असे त्याचे सिनेमे गाजले आहेत. ११ ऑगस्ट २०१४ रोजी त्याचा मृत्यू झाला.
..........
यांचाही आज जन्मदिन :
लोकसाहित्याचे महान संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे (जन्म : २१ जुलै १९३०, मृत्यू : एक जुलै २०१६)
पुलित्झर आणि नोबेलविजेते अर्नेस्ट हेमिंग्वे (जन्म : २१ जुलै १८९९, मृत्यू : सात फेब्रुवारी १९६१) 
स्त्री-स्वातंत्र्याच्या खंद्या समर्थक लेखिका माधवी देसाई (जन्म : २१ जुलै १९३३, मृत्यू : १५ जुलै २०१३) 
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link