Next
टेबल टेनिसमध्ये ठसा उमटविणारी ईशा
BOI
Friday, October 05, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

ईशा जोशी

जिल्हा आणि राज्य अशा दोन्ही पातळ्यांवरील स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवत टेबल टेनिसमध्ये आपला ठसा उमटवणारी पुण्याची ईशा जोशी अभ्यासातही आपली गुणवत्ता टिकवून आहे. आतापर्यंत ज्युनिअर गटात खेळत असलेल्या ईशाला यंदाच्या मोसमापासून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या नवोदित टेबल टेनिसपटू ईशा जोशीद्दल...
.....................
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक, पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित ठरलेल्या ईशा जोशीने नुकताच तिहेरी मुकुटाचा मान मिळवला आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर ईशाच्या आईने तिला तिच्या खेळाच्या महत्त्वाकांक्षेसाठी पूर्ण पाठिंबा दिला. त्याच जोरावर ईशा आज प्रगती करत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत झालेल्या प्रत्येक स्पर्धेत ज्युनिअर गटात तिने विजेतेपद मिळविले आहे. अभ्यासातही ती आपली गुणवत्ता टिकवून आहे. तिला यंदा बारावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळाले आहेत. आता ती ज्युनिअर गटात खेळत असली, तरी यंदाच्या मोसमापासून खुल्या गटात राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची तिला संधी आहे.  

ईशाने खेळ आणि अभ्यास यांच्यात चांगलाच समन्वय साधला आहे. रोज सकाळी सहा वाजल्यापासून तिचा व्यायाम आणि त्यानंतर सराव सुरू होतो. प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू उपेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ती लवकरच राष्ट्रीय स्तरावरही सरस कामगिरी करेल, असा विश्वास वाटतो. तिच्या खेळातील चपळाईमुळे ती संपूर्ण टेबल लीलया कव्हर करते. हाच तिच्या खेळातला महत्त्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर तिची आक्रमकता समोरच्या खेळाडूला बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडते आणि तिथेच ईशाने मानसिकदृष्ट्या सामना जिंकलेला असतो. पुढे ती केवळ विजयाची औपचारिकता पूर्ण करते. 

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत महिला गटाच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित ईशाने सातव्या मानांकित प्रीतिका सेनगुप्तावर ११-९, ११-४, ११-७, ८-११, ११-९ असा विजय मिळवला होता. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत ईशाने चौथ्या मानांकित श्रुती गभणेचा ११-४, ८-११, ११-६, ११-६, ११-३ असा, तर प्रितिका सेनगुप्ताने अकराव्या मानांकित वैभवी खेरचा ११-९, ६-११, ११-५, ११-३, ८-११, ११-६ असा पराभव केला होता. 

२१ वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम लढतीत मॅच पॉइंट वाचवत अव्वल मानांकित ईशाने तिसऱ्या मानांकित पृथा वर्टीकरवर विजय प्राप्त करून जेतेपद पटकावले. या लढतीत ईशाने पहिला गेम जिंकून जोरदार सुरुवात केली; मात्र पृथा वर्टीकरनेही जोरदार खेळी करत लागोपाठ तीन गेम जिंकून ३-१ अशी आघाडी मिळवली. अनुभवी ईशाने संयमपूर्ण खेळ करत पुढील तीनही गेम जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

मिश्र दुहेरीत ईशाने आदर्श गोपालच्या साथीने विजेतपद पटकावले. अंतिम लढतीत ईशा व आदर्श गोपाल या अव्वल मानांकित जोडीने वैभव दहीभाते व पूर्वा सोहनी या द्वितीय मानांकित जोडीचा पराभव केला होता. 

ईशा सध्या स. प. महाविद्यालयात ‘बीए’च्या प्रथम वर्षाला असून ती पीवायसी क्लबमध्ये उपेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत प्रथमच ईशाने तिहेरी मुकुट पटकावला आहे. 

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pratima Vartak About 136 Days ago
अमित डोंगरे वरती ईशा जोशीचे छायाचित्र नाही. खेळाडूशी बोलुन मग लिहिले असते तर अजून चांगली माहिती देता आली असती
0
0

Select Language
Share Link