Next
स्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य
बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील उत्तम
BOI
Sunday, July 21, 2019 | 03:45 PM
15 1 0
Share this article:


‘शेअर बाजार म्हणजे जुगार’ असा एक समज रूढ आहे; मात्र अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास तो जुगार नसून फायद्याचा ठरतो. त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ‘समृद्धीची वाट’ हे शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर सुरू असलेले सदर काही काळासाठी थांबवण्यात आले होते. ते आता पुन्हा सुरू करत आहोत. कोणते शेअर्स घ्यावेत, कधी घ्यावेत, कधी विकावेत यांबद्दलचे नेमके मार्गदर्शन या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्याकडून या सदराद्वारे मिळणार आहे.
......

अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात थोडीशी मरगळच आहे. भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांवरील कर कायम ठेवण्याच्या अर्थमंत्र्यांच्या निर्णयावर शेअर बाजाराने या सप्ताहाखेर शुक्रवारी (१९ जुलै) तीव्र नाराजी नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच सेन्सेक्सने तब्बल ५६०.४५ अंकांची आपटी खाऊन वर्षातील दुसरी मोठी घसरण नोंदवली. यापूर्वी आठ जुलै रोजी सेन्सेक्सने ७९२ अंकांची सर्वांत मोठी घसरण नोंदवली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १७७.६० अंकांनी कोसळला.

गुरुवारी वित्तविधेयक या तरतुदीसह मंजूर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ३१८ अंकांची आपटी खाल्ली होती. शुक्रवारी हाच कल कायम राहिला. शुक्रवारी सेन्सेक्स ३८ हजार ३३७वर, तर निफ्टी ११ हजार ४१९वर बंद झाला. शेअर बाजाराच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना दोन दिवसांत तीन लाख ७९ हजार कोटींचा फटका बसला असून, ५०० कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षातील सर्वांत खालचा भाव गाठला आहे.

या स्थितीत काही शेअर्स घेण्याजोगे आहेत. त्यापैकी एक आहे येस बँक. येस बँकेने जून २०१९ तिमाहीचे आपले आकडे जाहीर केले ते निराशाजनक होते. सध्या हा शेअर ८५ रुपयांच्या आसपास असला, तरी तो ६५ ते ७० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. जोखीम घेऊ शकणाऱ्या धाडसी गुंतवणूकदारांनी ६० रुपयांपर्यंत तो घेतल्यास वर्षभरात त्यांना ४० टक्के नफा आरामात मिळू शकेल. नफ्याची सध्याची घसरण मोठ्या प्रमाणावर तरतुदी केल्या जात असल्यामुळे होत आहे.

हळूहळू, पण निश्चित वाढ होऊ शकणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि जेएसडब्ल्यू स्टील या शेअर्सचा समावेश होऊ शकेल. या कंपन्या स्वबळावरच उभ्या राहत असल्यामुळे त्याच्यात धोका संभवत नाही. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्समधील गुंतवणूक हळूहळू, पण निश्चित वाढेल.

‘बजाज फायनान्स’चा शेअर सध्या ३४५० ते ३५०० रुपयांच्या आसपास मिळत आहे. वर्षभरात तो ४४०० रुपयांपर्यंत जाऊ शकेल; मात्र गेल्या काही महिन्यांत टीव्ही, महागड्या मोटारगाड्या, वातानुकूलन यंत्रे कमी प्रमाणात विकली गेल्यामुळे जून २०१९ तिमाहीचा नफा पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर असेल, असे गुंतवणूकदारांनी गृहीत धरू नये, अशी थोडीशी समज कंपनीच्या अध्यक्षांनी दिली आहे.

अमेरिकेमध्ये टीनप्लेट आणि लोखंड, पोलाद अशा धातूंच्या किमती वाढत आहेत. त्याचा फायदा जेएसडब्ल्यू स्टीलला होणार आहे. पुढील तीन-चार महिन्यांत तो २० टक्क्यांनी वाढावा.

‘लार्सन अँड टुब्रो’ने माइंड ट्रीचे आग्रहण केल्यानंतर माइंड ट्रीच्या नफ्यात घसरणच झाली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना यापुढे सतत चांगले दिवस असणार नाहीत. त्यामुळे इथे गुंतवणूक टाळावी.

अर्थसंकल्प होऊन गेला असल्यामुळे आता शेअर बाजार सर्वसाधारणपणे असाच राहील. सार्वजनिक कंपन्यांतील आपली गुंतवणूक केंद्र सरकारने कमी करावी,व ते प्रमाण ५२ टक्के इतके कमी आणावे, असे ‘सेबी’ने सुचवले असले, तरी सरकारचे निर्गुंतवणुकीबाबतचे धोरण अजूनही स्पष्ट नाही. निर्गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली, तर सरकारची वित्तीय तूट आपोआपच कमी होईल. गुंतवणूक करताना पेनी स्टॉक्सकडे दुर्लक्ष करावे.


- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search