Next
जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात भारताचे महत्त्व वाढतेय
BOI
Thursday, February 21, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:


बेंगळुरू : ‘संरक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारा देश म्हणून भारत उदयाला येत आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. ‘मेक इन इंडिया’द्वारे वाढत असलेली या क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि धोरणे ही त्यामागची कारणे आहेत. बदलत्या जागतिक परिस्थितीत हे सुचिन्ह आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन
२० फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे पाच दिवसांच्या ‘एरो इंडिया’ शोचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘धोरणात्मक पुढाकार आणि प्रक्रियांमधील सुधारणा यामुळे जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणून भारत उदयाला येत आहे. परदेशातील सार्वजनिक आणि खासगी उद्योजकांशी सहकार्य वाढवून आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करत आहोत,’ असे सीतारामन यांनी नमूद केले. 

त्या म्हणाल्या, ‘‘मेक इन इंडिया’ मोहिमेमुळे संरक्षण क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणूक धोरणाला चालना मिळाली असून, एस नाईन हेलिकॉप्टर केबिन, एअरक्राफ्ट कॉकपीट, डॉर्निअरसाठी ग्लास कॉकपीट अशा अत्यंत प्रगत साधनसामग्रीची भारतात निर्मिती होत आहे.’

‘‘मेक इन इंडिया’मुळे आपण संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक आत्मनिर्भर होत आहोत. त्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेचा पाया भक्कम होत आहे,’ असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. 

‘केंद्र सरकारने देशातच संरक्षण क्षेत्रातील साहित्यसामग्री बनविण्यावर भर देण्याचे धोरण राबविले आहे. त्याआधारे देशातील हे उद्योग क्षेत्र विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या चार वर्षांत एक लाख २७ हजार ५०० कोटी रुपये किमतीची १५० कंत्राटे भारतीय उत्पादकांना देण्यात आली आहेत. याच काळात भारतातच डिझाइन आणि विकसित करून उत्पादित केलेल्या उत्पादनांची खरेदी करण्याचे दोन लाख ७९ हजार ९५० कोटींचे १६४ प्रस्ताव सरकारने भारतीय उद्योजकांना दिले. त्यामुळे भारत हे जागतिक दर्जाचे संरक्षण साहित्य, उपकरणे, सुटे भाग, तंत्रज्ञान, संशोधन, कुशल कामगार अशा सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले केंद्र बनत आहे,’ असेही सीतारामन यांनी नमूद केले. 

‘दारूगोळा निर्मितीसाठी खासगी क्षेत्रातील सात व्यावसायिकांना सज्ज केले असून, आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी सरकार देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे. संरक्षण क्षेत्रात बौद्धिक संपदा हक्काची प्रभावी अंमलबजावणी करण्याचाही प्रयत्न करत आहे. संरक्षण आणि हवाई सुरक्षा क्षेत्रातील क्षमता वाढविण्यासाठी आणि जास्तीत जास्त पेटंट्स मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी ‘मिशन रक्षा ज्ञान शक्ती’ ही योजना राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संरक्षण क्षेत्रातील दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल एक हजार नवीन बौद्धिक संपदा हक्क दावे दाखल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे,’ असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search