Next
‘पुण्यात अवतरणार खेडेगाव’
‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
BOI
Thursday, July 04, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this article:

वनराई संस्थेतर्फे आयोजित प्रदर्शनाची माहिती देताना अध्यक्ष रवींद्र धारिया, त्यांच्यासमवेत जयवंत देशमुख आणि सुधीर मेकल उपस्थित होते.

पुणे : ‘वनराई संस्था येत्या दहा जुलै रोजी ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेडेगावाची प्रतिकृती  साकारण्यात येणार आहे,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वनराईचे जयवंत देशमुख आणि सुधीर मेकल उपस्थित होते.

‘पुण्यातील मित्रमंडळ चौक, पर्वती येथील वनराई संस्थेच्या आवारात बुधवारी, १० जुलै रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले असेल. यात गावाच्या वेशीच्या आतमध्ये आल्यापासून ते पारावरच्या गप्पांचा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने बांबूची सायकल, अपारंपरिक उर्जा उपकरण, पर्यावरण पुस्तके, हॅंड ट्रॅक्टर, इलेक्ट्रीक सायकल, घरगुती वापराच्या पर्यावरणपूरक वस्तू असणार आहेत. वनराईचा गेल्या ३३ वर्षातील प्रवास या प्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहे. सकाळच्या सत्रात विविध शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी भेट देणार आहेत, तर दुपारी चार वाजल्यानंतरच्या सत्रात पुणे, तसेच राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या प्रदर्शनास भेट देणार आहेत,’ असेही धारिया यांनी सांगितले.

‘वनराईच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये ग्रामीण विकासाचे काम अग्रस्थानी आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणलोट व्यवस्थापन, वृक्षलागवड, शाश्वत शेती, सामुहिक शेती, घनकचरा व्यवस्थापन, पशुधन विकास, शिक्षण व आरोग्यविषयक सोयी-सुविधा, महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. भारतभूमी हरित आवरणाने सदैव नटलेली असावी, इथली पडीक जमीन आणि रिकामे हात सदैव उत्पादनक्षम असावेत, आधुनिक विज्ञान-तंत्राज्ञानयुक्त साधनांचा लाभ इथल्या समाजस्तरातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा, हे पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा अण्णा यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे संस्थात्मक रुप म्हणजे वनराई संस्था आहे,’ असे धारिया म्हणाले. 

‘देशातील पडीक जमिनी उत्पादनक्षम व्हाव्यात आणि देशाच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता वनराईच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आजवर दोन कोटींहून अधिक बिया व रोपांचे वाटप केले असून, जल-मृदा संवर्धनासाठी वनराई बंधाऱ्यांची चळवळ उभारली आहे. पाणलोट व्यवस्थापनाबरोबरच चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी व श्रमदान हा ‘पंचसुत्री’ कार्यक्रम राबवला. ग्रामीण भागात १३ प्रशिक्षण केंद्रे उभारुन शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान पोहचविले. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. लोकसहभागातून स्वच्छ, हरित, संपन्न व जलसमृद्ध गावांची निर्मिती केली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा अशा विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या गावांमध्ये शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे ‘शहरातून खेड्याकडे’ घडवून आणण्यात वनराईने यश मिळवले. या सर्व उपक्रामांचा आढावा ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त पहावयास मिळणार आहे,’ असे धारिया यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search