Next
कल्याणमधील व्यक्तीच्या अवयवदानामुळे सहा जणांना नवे जीवन
प्यारेलाल जैस्वाल यांच्या कुटुंबीयांनी घेतला धीरोदात्त निर्णय
BOI
Thursday, January 10, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

प्यारेलाल जैस्वालठाणे : कल्याणमधील ब्रेन डेड झालेल्या प्यारेलाल जैस्वाल (५२) यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्नियाचे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहा जणांना नवे जीवन मिळाले आहे. फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टर्सनी जैस्वाल यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व सांगितले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्युपश्चात अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. 

जैस्वाल यांच्या कुटुंबाला अवयवदानाच्या संकल्पनेची माहिती होती आणि ते अवयवदान करण्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी वैद्यकीय चमूकडे गेले. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या संबंधातील सर्व माहिती त्या कुटुंबाला समजावून सांगितली. 

जैस्वाल यांचे चिरंजीव मयूर म्हणाले, ‘शिक्षण, रोजगार, धर्म आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांमध्ये माझ्या वडिलांनी सामाजिक कार्य करून नेहमीच लोकांना मदत केली होती. मृत्यूनंतरही त्यांनी स्वतःचा सेवाभाव जपला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. समाजाला मदत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पुढे नेण्याच्या हेतूनेच आम्ही अवयवदानाला संमती दिली. ही त्यांनी समाजाला दिलेली सर्वोच्च भेट ठरेल.’

कल्याण विभागातील अवयवदान आणि अवयवप्राप्तीच्या या पहिल्या कामगिरीविषयी कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या सुविधा संचालक डॉ. सुप्रिया अमेय यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘आमच्या रुग्णाची पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले यांनी ज्या उदात्त कार्यासाठी हा कठीण निर्णय घेतला त्यामुळे आम्ही भारावलो आहोत. अवयव निकामी झालेल्या सहा रुग्णांना त्यांच्या या निर्णयामुळे जीवनदान मिळाले आहे. हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्निया यांच्या रोपणाच्या येथील पहिल्याच शस्त्रक्रिया ठरल्या. अवयवदानाविषयी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश येत असल्याचेच हे द्योतक आहे. ब्रेन डेड झालेल्या वडिलांचे अवयवदान करण्यासाठी मुलाने पुढे येणे, यावरून आपला समाज पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.’ 

कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलचे एकमेव अवयवप्राप्ती केंद्र गेले वर्षभर अवयवदानाविषयी समाजात जागृती वाढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.

दात्याचे स्नेही असलेले रोटरीयन सचिन पितांबरे म्हणाले, ‘काकांनी माझ्यासह अनेकांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली होती, प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या मदतीमुळे अनेकांना भक्कम सामाजिक आधार आणि चांगला रोजगार मिळाला होता. त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे, तर समाजातच मोठी पोकळी निर्माण झाली आहे; पण मृत्युपश्चातही त्यांच्यामुळे सहा जणांना जीवदान मिळाले, हे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत.’

जैस्वाल यांचे हृदय ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करून मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे अत्यंत तातडीची गरज असणाऱ्या रुग्णाच्या शरीरात त्यांच्या हृदयाचे रोपण करण्यात आले. कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमधून दात्याचे हृदय घेऊन पहाटे चार वाजून १० मिनिटांनी निघालेला वैद्यकीय चमू केवळ २७ मिनिटांत २९.९ किलोमीटर अंतर पार करून चार वाजून ३७ मिनिटांनी मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलला पोहोचला. ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस उपायुक्त (ठाणे शहर वाहतूक शाखा) अमीन काशिनाथ काळे, हेडकॉन्स्टेबल अजित पारधी (कम्युनिकेशन प्रमुख) आणि पोलीस सबइन्स्पेक्टर (मुंब्रा वाहतूक शाखा) सुनील मोहिते यांनी वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन केले.

(पुण्याच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या समन्वयक आरती गोखले यांची गोष्ट आणि कार्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search