Next
स्वमग्नांसाठी ‘प्रसन्न’पणे कार्यमग्न असलेली संस्था
BOI
Friday, September 21, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

रंगकामात गुंतलेली मुले

स्वमग्नता अर्थात ऑटिझम या समस्येचे प्रमाण अलीकडे वाढू लागले आहे. ही समस्या असलेली मुले स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. त्यामुळे त्यांच्या विकासात अडचणी येतात. अशा मुलांसाठी पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटर २००० सालापासून कार्यरत आहे. या मुलांच्या विकासासाठी, त्यांना स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी ही संस्था करत असलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज त्या संस्थेविषयी...
...........
वयाने मोठा असलेला माणूस स्वत:च्या विश्वात गुंतलेला असेल, तर त्याची तंद्री लागली, असं म्हणून समाज त्याच्याकडे दुर्लक्ष करतो; पण अशीच स्वमग्नता लहान मुलांमध्ये असेल आणि ती दुर्लक्षित राहिली, तर ती एक मोठी समस्या ठरते. भारतात मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला समाज स्वीकारत नाही. तसा आजार लहानपणी लक्षात आला, तर तो तेव्हापासूनच लपवण्याचा प्रयत्न त्या मुलाचे पालक, नातेवाईक करतात. त्यामुळे त्या आजाराने पीडित असलेल्या मुलाला किंवा मुलीला यातना सोसाव्या लागतात. स्वमग्नता अर्थात ऑटिझम ही अशीच समस्या आहे. ही समस्या असलेल्या मुलांसाठी पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटर गेली १८ वर्षे अविरतपणे काम करत आहे. स्वमग्न मुले ओळखणे, त्यांच्या विकासासाठी विविध पद्धती विकसित करणे, त्यांना वापरता येतील अशी उपकरणे तयार करणे, पालकांचे प्रशिक्षण असे अनेक उपक्रम या केंद्रातर्फे राबविले जातात. 

पणती रंगवण्यात गुंग झालेला मुलगा.भारतात मानसिक आजारी किंवा जगापेक्षा जरा वेगळी वैशिष्ट्ये असणाऱ्या व्यक्तींना समाज स्वीकारत नाही. डावखुऱ्यांनाही जबरदस्तीने उजव्या हाताचा वापर शिकवला जातो. तसेच मानसिक, बौद्धिक आजारांबाबत आहे. अशा समस्यांविषयी समाजात जागृती नसल्यामुळे आपल्या घरात त्या समस्येने ग्रासलेली व्यक्ती असल्याचे सगळेच नाकारतात. अशा प्रकारची एक समस्या म्हणजे स्वमग्नता. यामध्ये लहान मुले आपल्याच तंद्रीत राहतात. ही समस्या जन्मापासूनच असणारी, मात्र मुलांच्या वाढीच्या काळात दिसून येणारी एक गुंतागुंतीची आणि त्यांच्या विकासाशी संबंधित आहे. स्वत:च्या विचारांत किंवा विश्वात सदैव रमणे म्हणजे स्वमग्नतेची स्थिती असे म्हणता येईल. ही मुले आजूबाजूला जे काही घडते आहे, त्याच्यापासून अलिप्त राहतात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक कोणाशीच संपर्क साधत नाहीत. आपल्याला कोणाशी देणे-घेणेच नाही, अशा पद्धतीने त्यांचे वागणे असते. आपले म्हणणे व्यक्त न करता येणे असे या समस्येचे स्वरूप आहे. त्यामुळे आपल्याला काय हवे आहे, हे सांगताना त्यांना अडचण येते.

ज्येष्ठ समाजसेविका (दिवंगत) पद्मजा गोडबोले प्रिझम फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता (Learning Disability) असलेल्या मुलांसाठी काम करत होत्या. त्यांनी कॅनडातून ‘एज्युकेशन ऑफ क्रॉस कॅटेगरी एक्सेप्शनल चिल्ड्रन’ (ईडीईएक्ससी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला होता. स्वमग्न मुलांची समस्या आणि त्यासाठी काम करणाऱ्या संस्थेची आवश्यकता समाजात काम करताना त्यांच्या लक्षात आली. त्यांनीच पाच जून २००० रोजी प्रसन्न ऑटिझम सेंटरची स्थापना केली. पद्मपुरुष फाउंडेशनच्या वतीने हे सेंटर चालवले जाते.

संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना गोडबोले यांनी संस्थेच्या कामाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘सध्या या संस्थेत ४३ मुले आहेत. प्रत्येक स्वमग्न मुलाची समस्या वेगळी असते. ती समजून घेऊन त्याच्या गरजेनुसार त्याच्या विकासासाठी विविध उपचार पद्धती वापराव्या लागतात. काही प्रयोग करावे लागतात. त्यातून नवे मार्ग सापडतात. त्याचबरोबर स्वमग्नता म्हणजे काय याबद्दल जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आई-वडिलांना याबद्दल काहीच माहिती नसते. पुण्यात आमचे केंद्र आहे हे कळल्यावर अनेक दूरच्या ठिकाणांहूनही अशी मुले घेऊन त्यांचे पालक आमच्याकडे येतात.’

प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये नुकतीच दहीहंडी साजरी करण्यात आली.

पुण्यातील डेक्कन जिमखान्याजवळ फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर प्रसन्न ऑटिझम सेंटरची वास्तू आहे. मुले रोज शाळेप्रमाणे ठरावीक तासांसाठी सेंटरमध्ये येतात. मुलांना व्यक्त होता येत नसल्यामुळे त्यांच्याशी बोलताना अत्यंत धीराने घ्यावे लागते. या सेंटरमध्ये काम करणारे शिक्षक, त्यांचे सहायक आणि मावशी ही सर्व मंडळी खूपच प्रेमाने मुलांशी व्यवहार करतात. लहान मुलांच्या कलाने घेऊन त्यांच्या लहरीप्रमाणे त्यांना शिकवण्याची जबाबदारी पूर्ण वेळ असलेले १२ शिक्षक पार पाडतात. त्यांचे सहायकही त्यांना मनापासून मदत करतात. सेंटरमध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि बिहेविअरल थेरपिस्टही काम करतात. यापैकी ऑक्युपेशनल आणि स्पीच थेरपीसाठी स्वतंत्र कक्ष आहे. मुलांना तबला, पेटी अशा वाद्यांची ओळख करून देण्यासाठी संगीत कक्षही आहे. मुलांना शिकवण्यासाठी ड्रम सर्कल थेरपी, ॲनिमल असिस्टेड थेरपी यांचाही उपयोग केला जातो. 

‘आवाज’ उपकरणाद्वारे शिकणारा मुलगा.

विशेष उपकरणांचा वापर
‘स्वमग्न मुलांना अक्षरे, चित्रे शिकवण्यासाठी काही विशेष उपकरणे तयार करण्यात आली आहेत. चेन्नईचे अजित नारायण यांनी ‘आवाज’ हे उपकरण तयार केले आहे. या यंत्रात खाद्यपदार्थ, कपडे, फळे, फुले, नाती याच्याशी संबंधित चित्रे असतात आणि त्या चित्रांवर मुलांनी हात ठेवला, की त्या वस्तूचे किंवा नात्याचे नाव यंत्रातून ऐकू येते आणि स्क्रीनवर दिसते. ही मुले बोलत नसल्याने त्यांना या यंत्राद्वारे आई-वडिलांशी संवाद साधता येतो. सेंटरने हे यंत्र मराठी भाषेत आणि आपल्या मुलांच्या सोयीप्रमाणे सुधारणा करून घेतले आहे. ही मुले आयपॅडही वापरतात. सेंटरच्या मैदानात खेळांची साधने आहेत आणि त्यावर खेळताना मुले रमून जातात. मल्लखांबाचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाते,’ असेही गोडबोले यांनी सांगितले.

बाहेरगावच्या मुलांचेही मूल्यमापन
‘स्वमग्नतेची समस्या सर्वत्र आहे. त्यामुळे पुणे शहर, परिसरात राहणाऱ्या पालकांना आमच्या सेंटरपर्यंत पोहोचता येते; पण बाहेरगावच्या पालकांना ही सुविधा उपलब्ध नाही. म्हणून सेंटरच्या वतीने बाहेरगावच्या मुलांचे कमतीकमी एक आठवडा परीक्षण आणि मूल्यमापन केले जाते. ऑटिझम समस्येचे भारतातील प्रमाण २००० साली एक हजार मुलांमध्ये एक असे होते. ते प्रमाण २०१५मध्ये ६८ मुलांमागे एक मूल ऑटिझमग्रस्त, असे झाले आहे,’ अशी माहिती गोडबोले यांनी दिली.

गणपती पूजासाहित्याचे बटवे तयार करण्यात गुंतलेले विद्यार्थी.

असे सुंदर बटवे मुले तयार करतात.स्वावलंबनासाठी व्यावसायिक शिक्षण
स्वमग्न मुलाच्या भविष्याची चिंता त्याच्या आई-वडिलांना नेहमीच लागून राहते. ती चिंता कमी करण्यासाठी या केंद्राने काम केले. या संस्थेने २०१२मध्ये तपपूर्ती केली. त्या निमित्ताने १४ ते १७ या वयोगटातील स्वमग्न मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत भेटकार्डे तयार करणे, कागदाची पाकिटे, कागदी पिशव्या, गिफ्ट बॉक्स, ज्वेलरी बॉक्स, बुकमार्क बनवणे, घरगुती पिठाची गिरणी चालवणे, मिक्सर-ग्राइंडर चालवणे, मातीच्या पणत्या सुशोभित करणे, जेली वॅक्सच्या पणत्या तयार करणे या कौशल्यांचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. गणपतीबाप्पाच्या पहिल्या दिवशीच्या पूजेसाठी आवश्यक पूजासाहित्याचे बटवेही हे विद्यार्थी तयार करतात. ते अल्प किमतीत विकले जातात. या कौशल्यांतून ही मुले स्वावलंबी होऊ शकतील, असा विश्वास गोडबोले यांना वाटतो. 

प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या मुलांनी तयार केलेल्या जेली वॅक्स पणत्या.
संस्थेचे कामकाज चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. म्हणूनच हे कार्य अविरतपणे सुरू राहण्यासाठी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन गोडबोले यांनी केले आहे. संस्थेला दिलेली देणगी ८०-जी कायद्यानुसार करसवलतीस पात्र आहे. प्रत्यक्ष मदतीचीही संस्थेला गरज असते. त्यामुळे स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनी, तसेच देणगीदारांनी संस्थेशी आवर्जून संपर्क साधावा. स्वमग्नांसाठी कार्यमग्न असलेल्या या संस्थेच्या कार्याला हातभार लावायलाच हवा.

संपर्क : 
साधना गोडबोले, व्यवस्थापकीय संचालिका, प्रसन्न ऑटिझम सेंटर
मोबाइल : ९३२६० १३७४४. 
संस्थेचा पत्ता : ८१५, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, गुप्ते हॉस्पिटलजवळ, पुणे -४११००४.
फोन : (०२०) २६५२२४६ 
वेबसाइट : www.prasannaautismcentre.com
ई-मेल : info@prasannaautismcentre.com

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(साधना गोडबोले यांच्या मनोगताचा, तसेच संस्थेच्या कार्याची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. प्रसन्न ऑटिझम सेंटरसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search