Next
डिजिटल पासपोर्टही नाशिक रोड प्रेसमध्येच तयार होण्याचे संकेत
BOI
Wednesday, July 10, 2019 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : देशात पासपोर्टची छपाई नाशिक रोड प्रेसमध्येच होते. येत्या काळात ई-पासपोर्ट किंवा डिजिटल पासपोर्ट तयार होणार असून, ते तयार करण्याचे कामही नाशिक रोड प्रेसमध्येच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निश्चलनीकरणाच्या काळात येथील कामगारांनी चोखपणे बजावलेल्या कामगिरीच्या आधारावर हे नवे काम याच प्रेसला मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रगत देशांमध्ये इलेक्ट्रानिक चीप असलेले ई-पासपोर्ट तयार केले जातात. या ई-पासपोर्टसाठी लागणारी चीप नाशिक रोड प्रेसला लवकरच उपलब्ध होणार असून, केंद्र सरकार पासपोर्ट वितरणाचे नियमही शिथिल करणार आहे. यामध्ये पासपोर्ट नंबर अत्यावश्यक गोष्ट असणार असून, आधार कार्डप्रमाणेच पासपोर्टलाही वेगळ्या प्रकारे ‘नंबरिंग’ होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ते अधिक सुरक्षित होणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टबाबत नाशिक रोडच्या प्रेस प्रशासनासमेवत प्राथमिक चर्चा केली आहे. शिस्त, पारदर्शकता व गुणवत्ता या त्रिसूत्रीचा मेळ घालून कामगारांनी सुट्ट्या न घेता नवीन चलनी नोटांचा विपुल पुरवठा निश्चलनीकरणाच्या काळात देशाला केला होता. त्याच कामगिरीच्या आधारावर हे नवे काम नाशिक रोड प्रेसला मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पासपोर्टची छपाई फक्त नाशिक रोडच्या प्रेसमध्येच होते. सध्याच्या पासपोर्टऐवजी इलेक्ट्रानिक चीप असलेला पासपोर्ट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या टेंडरची प्रक्रिया लांबली होती. ती मार्गी लावण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाने पावले उचलली असून, कार्यवाही सुरू केली आहे.

केंद्रीय अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग व प्रेस महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्रा-घोष यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नाशिक रोडच्या आयएसपी प्रेसला भेट दिली होती. तेव्हापासून ई-पासपोर्ट निर्मितीचे काम या प्रेसला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. १९५८मध्ये या प्रेसमध्ये पहिला पासपोर्ट छापला गेला. आजपर्यंत सुमारे वीस कोटी पासपोर्टची छपाई येथे झाली आहे. भारतात अजूनही छोट्या डायरीच्या स्वरूपात पासपोर्ट छापला जातो. ते तपासण्यात वेळ जातो. नवा पासपोर्ट पुस्तक स्वरूपातच असेल; मात्र त्यामध्ये मोबाइलच्या चीपप्रमाणे इलेक्ट्रानिक चीप लावली जाईल. त्यात पासपोर्टधारकाची सर्व माहिती अपलोड केलेली असेल. हे पासपोर्ट संगणकाजवळ ठेवले, तरी त्याचे नाव, पासपोर्टधारक कोणकोणत्या देशात कधी गेला होता वगैरे सगळी माहिती क्षणार्धात मिळते.

ही नोटप्रेस आणि आयएसपी प्रेसचे त्वरित आधुनिकीकरण व्हावे, नोट पेपर मिल नाशिकला व्हावी, तसेच प्रेसला परकीय चलन आणि परकीय पासपोर्ट छपाईचे काम मिळावे, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search