Next
हा खेळ सावल्यांचा...
BOI
Tuesday, February 06 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सुधीर मोघे (छायाचित्र सौजन्य : आठवणीतली गाणी)अवकाशातल्या सावल्यांचा नयनमनोहर अन् अद्भुत खेळ असलेला चंद्रग्रहणाचा वैशिष्ट्यपूर्ण सोहळा नुकताच पार पडला. ‘सावल्यांचा खेळ’ म्हटलं, की प्रतिभावान कवी सुधीर मोघेंची ‘हा खेळ सावल्यांचा’ ही रचना हमखास स्मरते. आठ फेब्रुवारी हा सुधीर मोघेंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या त्याच रचनेचा...
...........
३१ जानेवारीची संध्याकाळ अविस्मरणीय! तेजोमयी सुवर्णकिरणांचा पिसारा मिटून घेत पश्चिमेच्या बाहुपाशात विलीन होत, हळूहळू सूर्य दिसेनासा झाला. सांजवेळेची कातरता रोजच्यासारखी जाणवत नव्हती. कारण सर्वांच्याच मनात एक उदंड उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सूर्याला निरोप देणारे हात कॅमेऱ्याची किंवा दुर्बिणीची लेन्स सज्ज करण्यात गुंतले होते. संध्याकाळ असूनही डोळे पश्चिमेकडे नाही, तर पूर्व क्षितिजाकडे लागले होते. कुणी उंच इमारतींच्या टेरेसवर, तर कुणी शहराबाहेरच्या मोकळ्या मैदानावर, माळरानावर, तर कुणी घाटमाथ्यावर त्या खगोलीय अद्भुत घटनेला डोळेभरून पाहण्यासाठी जमले होते. जसजसा तो क्षण जवळ येत गेला, तसतसा गर्दीचा आवाज कमी होत गेला. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. श्वास रोखून प्रत्येक जण पूर्वेकडे पाहत होता. तो कुठून येणार ती दिशा माहीत होती; पण क्षितिजावरची नेमकी जागा माहीत नव्हती. आज ‘निंबोणी’चं झाड आड यायला नको, डोंगरकड्याचा सुळका, डोंगराची अख्खी रांग किंवा एखादा आडदांड, धसमुसळा ढगही आड यायला नको, म्हणून प्रत्येक जण मनोमनी प्रार्थना करत होता. प्रत्येकाला तो डोळेभरून पाहायचा होता. असा दिसेल, तसा दिसेल, कसा दिसेल? याचं वर्णन आणि त्याच्याबद्दलची चर्चा सर्व प्रसारमाध्यमांवरून ऐकली होती; पण कान आणि डोळे यांच्यात अंतर असतंच ना! प्रत्येकाला स्वत:च्या डोळ्यांनी त्याला पाहायचं होतं. दशदिशा अंधारल्या होत्या, वातावरण गूढ झालं होतं, अखेर तो दिसला... अस्पष्ट, धूसर. सगळे ओरडले, ‘उगवला रे उगवला, बघ बघ मला तो दिसतोय...’ पौर्णिमा असूनही माझ्या ओठांवर बकुळ पंडित यांनी गायलेलं ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे गाणं आलं नाही, तर सुधीर मोघे यांनी लिहिलेलं गाणं आठवलं.

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा... 

खग्रास ग्रहण लागलेल्या चंद्राच्या त्या गोळ्याकडे पाहताना महेंद्र कपूर यांचा धीरगंभीर आवाज ऐकू येऊ लागला आणि तितक्याच गूढरम्यता लाभलेल्या पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतरचनेनं आणि सुधीर मोघे यांच्या शब्दांनी माझ्या मनाचा ताबा घेतला. क्षितिज सोडून आकाशात वर वर येत असलेलं चंद्रबिंब आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेता घेता विश्वास मला त्या अद्भुत खगोलीय घटनेबद्दल सांगत होता; पण माझ्या कानात त्याच्या शब्दांऐवजी सुधीर मोघे यांची स्वरांनी मोहरलेली छे, छे! भारलेली कविताच ऐकू येत होती. सुधीर मोघे यांनी दाखवलेली ‘गाणारी वाट’ चंद्रापर्यंत घेऊन चालली होती. आपण इतक्या वेळ ज्याची वाट पहात होतो तो अकल्पितातून आलाय, कवितेसारखाच. सुधीर मोघे यांनीच म्हटलंय...

मी कवितेची वाट पाहतो
माझ्या नकळत
अकल्पितातून येते कविता
तिच्याही नकळत.

चंद्र, प्रेयसी आणि कविता खूप भाग्यवान. त्यांचं येणं म्हणजे दीर्घ प्रतीक्षेचा डोंगर ओलांडून येणं. त्यांच्यासाठी जेवढी प्रतीक्षा केली जाते, त्यांच्या भेटीसाठी जेवढी उत्सुकता दाटून येते तसं भाग्य कुणाच्याच वाट्याला येत नसणार. या ३१ जानेवारीचा चंद्र तर विविध वैशिष्ट्यांनी नटलेला. एक तर सुमारे दीडशे वर्षांनी त्याचं असं दिसणं म्हणजे रंग आणि आकार याबरोबरच दुर्मीळ योग साधून येणं... सगळं कसं अभूतपूर्व आणि गूढ, तरीही रम्य! ब्ल्यू मून, ब्लड मून आणि सुपरमून या घटनांच्या माहितीचा पूर विविध वाहिन्यांवरून वहात होता. माझ्यासारखी माणसं त्यात गटांगळ्या खात होती. शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रेमी मंडळी अधून मधून ज्ञानाचा हात देत होती. पृथ्वी आणि चंद्र जवळ येतात म्हणे, मग पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्याला चंद्रग्रहण म्हणतात. शाळेत शिकलेलं थोडंफार आठवत होतं. ग्रह-ताऱ्यांमधला फरक पास होण्यापुरता पाठ केला होता. कवी सुधीर मोघे यांनाही ही कविता लिहिताना असाच प्रश्न पडला होता. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीसाठी त्यांना शीर्षकगीत लिहायचं होतं. दिग्दर्शक आप्पा जोगळेकर अर्थात वसंत जोगळेकर यांच्या कल्पनेप्रमाणे श्रेयनामावलीमागे सावल्यांचे खेळ दिसणार होते. सूर्योदय आणि सावल्यांचे खेळ कविमनात रेंगाळत असताना शब्द ओळी-ओळीतून पुढे आले..

होते पहाट... न्हाते सोन्यामध्ये आभाळ
छाया-प्रकाश ह्यांचा येतो जमून मेळ
डोळ्यात रास रंगे रंगीत बाहुल्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा... 

छाया-प्रकाशाच्या खेळातली गूढता मात्र रात्रीच्या वेळी वाढते. कारण दिवसाच्या सावल्या हव्याहव्याशा असतात; पण रात्री... बाप रे! बालपणापासून रात्रीच्या सावल्यांचं भय मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसलंय. बांगलादेशाच्या युद्धकाळातलं ७१ सालचं पुणं. बालवयात ‘ब्लॅक आउट’चा घेतलेला धसका. बाहेर मिट्ट काळोख. आमच्या वाड्यातल्या खोल्यांमध्ये भिंतीवर पडणाऱ्या आमच्याच सावल्या. त्यात कुणीतरी भीती घातलेली. सावलीकडे पाहायचं नाही. पाहिलं की उंचीच वाढत नाही. भावंडांमधला एखादा खोडकर भाऊ भिंतीवर कुत्रा, हरीण, ससा किंवा लांडगा अशा प्राण्यांच्या सावल्या हाताच्या बोटांच्या साह्यानं दाखवायचा. पाहताना गंमत वाटायची; पण हटकून स्वत:च्या सावलीकडे लक्ष जायचंच. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट पाहताना श्रेयनामावलीच्या वेळी दाखवलेले सावल्यांचे खेळ पाहून सगळं आठवलं होतं. आणि आता पुन्हा या चंद्रग्रहणाच्या वेळी त्या स्मृती जाग्या झाल्या. सोबतीला पं. हृदयनाथ मंगेशकर यांचं गूढ संगीत, महेंद्र कपूर यांचा आवाज आणि सुधीर मोघे यांच्या समर्थ लेखणीतून आणि अफाट कल्पकतेतून उतरलेले शब्द...

हा चंद्र ना स्वयंभू, रवीतेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्याचा
हा खेळ सावल्यांचा... 

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आणि सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा. सूर्याचं तेज चंद्र घेतो म्हणून तो स्वयंभू नसतो आणि सावल्यांचा अभिशाप त्याला भोगावा लागतो. प्रीतीच्या राज्यातही चंद्राचं अस्तित्व खास; पण प्रीतीलाही दु:खरूपी सावल्यांचा अभिशाप असतोच ना! कितीतरी कवींनी चंद्र, चांदण्यांची मदत घेऊन आपला संदेश कवितेतून प्रेयसीला पाठवला आहे. अगदी आर्षवाङ्मयातही कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आधुनिक कवितेत चंद्राच्या अस्तित्वाला वेगवेगळा अर्थ आला तरीही त्याचं कवितेतलं स्थान मात्र ध्रुवताऱ्यासारखं अढळ म्हणता येईल. सुधीर मोघे यांना तर चित्रपटकथेच्या मागणीनुसार कवितेची आराधना करावी लागली. शालेय जीवनानंतर खगोलीय घटनेचं नाईलाजानं का होईना, चिंतन करावं लागलं; पण रसिकांसाठी मात्र ती घटना हा एका सुरेख गझलरचनेच्या रूपातून आनंददायी अनुभव ठरला. मधुसूदन कालेलकर यांची कथा, पटकथा असलेल्या चित्रपटात आशा काळे आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बालपणापासून भयगंडानं पछाडलेली नायिका, तिच्या दुबळ्या मनाचा फायदा घेऊन रचला गेलेला सापळा आणि तिला या मनोरुग्ण अवस्थेतून सावरणारा डॉक्टर प्रियकर. त्यानं घेतलेला रहस्याचा शोध आणि स्वच्छ प्रकाशात समोर आलेलं सत्य, अशा कथानकावर बेतलेला रहस्यपट म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा.’ ३१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहणावेळी सगळे लोक चंद्राची हळूहळू बदलणारी रूपं बघण्यात गुंग होते, तर माझ्या मनात तो चित्रपट आणि त्या चित्रपटाचं शीर्षकगीत घोळत होतं. हळूहळू चंद्राचा एकेक भाग त्याच्या खऱ्या रूपात बाहेर येत होता. तो आता लालसर नव्हता, तर स्वच्छ चंदेरी, नेहमीच्या शुभ्र रंगात दिसू लागला. भास-आभास, सावली-प्रकाश समजून घेता घेता माझी धांदल उडाली होती

जे सत्य भासती ते असती नितांत भास
फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा
संपेल ना कधीही... 

आशा काळे यांचा नेहमीच्या पठडीतला अभिनय नव्हता. अभिनयाचा कस लावणारी भूमिका त्यांनी केली. आरपार जाणाऱ्या भेदक नजरेचे अभिनयसम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासमोर आशाताई कुठेही कमी पडल्या नाहीत. एक वेगळी भूमिका त्या जगल्या आणि एक वेगळा चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहिला. अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या गूढ संगीतातली रम्यता आणि सुधीर मोघे यांची कविता महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून जेव्हा रसिकांनी ऐकली, तेव्हा चित्रपटाच्या यशाचं तीही एक गमक बनली. 

चंद्रग्रहण हळूहळू सुटत होतं. चंद्र पुन्हा आपल्या चंदेरी सौंदर्यानं दिमाखात उजळला होता. ‘दे दान सुटे गिऱ्हाण’ अशा आरोळ्या आताशा ऐकायला येत नसल्या, तरी मनातल्या मनात निसर्गानं दिलेलं आनंदाचं दान आम्ही आमच्या झोळीत घेऊन घरी परतत होतो. स्वरांनी मोहरलेली कविता, हो मोहरलेलीच, आता मंतरलेली, भारलेली नव्हती. ग्रहण सुटलं होतं. लाडका चांदोबा मोकळा झाला होता. माझा मुलगा ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ आहे. त्याची या घटनेबद्दल विश्वासशी बरीच चर्चा झालेली; पण मी मात्र या खगोलीय घटनेकडे कवितेचीच दुर्बीण घेऊन पाहत होते. डोळ्यात आसवं होती. गळ्यात सुधीर मोघे यांचे शब्द होते. विश्वासचा हात हातात होता. जणू तो म्हणत होता...

ह्या साजिऱ्या क्षणाला का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link