Next
‘टाटा ट्रस्ट्स’ आणि ‘सोशल अल्फा’तर्फे फेलोशिप
प्रेस रिलीज
Thursday, November 15, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this article:

बेंगळुरू : टाटा ट्रस्ट्स आणि सोशल अल्फा यांच्या वतीने ‘सोशल अल्फा एन्टरप्रेन्युअर्सफॉरइम्पॅक्ट’ या फेलोशिप कार्यक्रमाची येथे घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम म्हणजे १२ महिन्यांची सर्वंकष पाठ्यवृत्ती असून, त्याअंतर्गत आपल्या कामाचा ध्यास बाळगणाऱ्या उद्याच्या उद्योजकांना भारतातील विज्ञान, नवसंकल्पना आणि उद्योजकतेचा लाभ घेण्यासाठी सुसज्ज बनविले जाणार आहे.

या फेलोशिपच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सोशल अल्फाचे सहसंस्थापक आणि सीईओ मनोज कुमार म्हणाले, ‘आपल्या कामाचा ध्यास बाळगणाऱ्या, समाजभान असणाऱ्या, एखादे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन पुढे जाणाऱ्या चेंजमेकर्ससाठी एक मार्ग तयार करण्याची, अशा उद्योजकांच्या गटांचे सहसंस्थापन करण्याची, त्यांच्याजवळील उपाययोजनांची चाचणी घेऊन त्यावर आधारित संकल्पना उभारण्याची व अशा संकल्पना प्रत्यक्ष परिणामकारक उद्योगांमध्ये बदलून दाखविण्याची आमची इच्छा होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवसंकल्पना व ध्येयाकांक्षी प्रभावी उद्योजकांची शक्ती वापरून भारतातील काही अत्यंत गंभीर सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय आव्हानांचा सामना करता येईल यावर आमचा ठाम विश्वास आहे.’

‘या कार्यक्रमांतर्गत तयार होणारी उद्योजकांची पहिली फळी पाणी, स्वच्छता, आरोग्य, शेती, ऊर्जा आणि पर्यावरण या सुधारणांची सर्वाधिक निकड असलेल्या क्षेत्रांतील समस्यांवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करेल. शिष्यवृत्तीसाठीच्या निवड प्रक्रियेमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्यांना एका क्षेत्रातील एखादी समस्या निवडण्यास प्रोत्साहन दिले जाईल व त्या समस्येवर मोठ्या प्रमाणावर अंमलात आणण्याची व आर्थिक आघाडीवर टिकाव धरण्याची क्षमता बाळगणारी एखादी उपाययोजना विकसित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर ठेवले जाईल. या सर्व काळात ‘सोशल अल्फा एन्टरप्रेन्युअर्सफॉरइम्पॅक्ट’च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना सोशल अल्फाजवळ असलेल्या सार्वजनिक आणि खासगी  क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या जाळ्याद्वारे पाठबळ पुरविले जाईल,’ अशी माहिती कुमार यांनी दिली.

‘निवडलेली उद्योगयोजना एखाद्या खऱ्याखुऱ्या उद्योगाच्या संपूर्ण आयुर्मानाची प्रतिकृती भासावी अशापद्धतीने तिचे प्रायोगिक, सर्वंकष व माहितीसंबंधी घटक सामावून घेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी भेडसावणाऱ्या समस्यांचे निरीक्षण करणे, बदलासाठी मांडलेल्या योजनेची वैधता तपासणे व ती अधिकाधिक काटेकोर बनविणे, नमुना कार्यक्रम व्यवहार्य उपाययोजनेमध्ये कशाप्रकारे रूपांतरित करता येईल याचा विचार करणे इथपासून ते प्राथमिक उद्योग योजना विकसित करण्यापर्यंत सर्व टप्प्यांचा समावेश या कार्यक्रमात असेल. यात अंतिम फेरीतील स्पर्धकांना उद्योग चालविण्यातील सर्व खाचाखोचांचे अंतर्बाह्य धोरणात्मक ज्ञान मिळवून देणारे व्यवहारातले व प्रत्यक्ष अनुभव घेऊ दिले जातील.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘उपयुक्त आणि व्यवहार्य माहिती मिळवून देण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केलेले असल्याने ‘सोशल अल्फा एन्टरप्रेन्युअर्सफॉरइम्पॅक्ट’च्या फायनलिस्ट्सना माहिती आणि संशोधन, उद्योजकता, भांडवल गुंतवणूक आणि तळागाळात चाललेले विकासाचे काम यांची पार्श्वभूमी लाभलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल. हे तज्ज्ञ आपल्या वैश्विक ज्ञानाच्या, विचारांच्या, आपल्या संपर्कातील व्यक्ती, यंत्रणांच्या मदतीने एखादा यशस्वी प्रकल्प कसा साकारावा याची दिशा दाखवतील. या होतकरू उद्योजकांना यशस्वी नवसंकल्पनाकार व उद्योजकांकडून प्रत्यक्ष पाठबळही विपुल प्रमाणात मिळू शकेल.’

‘या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना मासिक ६० हजार रुपयांचा प्रशिक्षण भत्ता अर्थात स्टायपेंड देऊन त्यांना एक लहानसे सुरक्षा कवचही देणार आहे. ही रक्कम म्हणजे नोकरी सोडून दिल्याने पगारावर पाणी सोडल्याची किंवा करिअरमध्ये बदल केल्याची नुकसानभरपाई नव्हे, तर पाठ्यवृत्तीच्या १२ महिन्यांच्या काळात अत्यावश्यक खर्च भागविण्यासाठी देण्यात आलेली ती मदत आहे. नव्या उद्योगामध्ये उडी मारण्यातील धोका उचलण्याची तयारी असूनही पैशाच्या मर्यादेमुळे असा धोका पत्करू न शकणारी मंडळी या स्टायपेंडमुळे या कार्यक्रमाकडे आकर्षित होतील असा आम्हाला विश्वास वाटतो. हा कार्यक्रम देशामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाधारित उद्योजकतेच्या नव्या प्रवाहाला चालना देणारे माध्यम बनावा हे आमचे लक्ष्य आहे,’ असे कुमार यांनी नमूद केले.

फेलोशिपविषयी :
अर्ज खुले होण्याची तारीख :
१३ नोव्हेंबर २०१८
अर्जाची अंतिम तारीख : सहा जानेवारी २०१९
मुलाखती आणि मूल्यमापन : चार फेब्रुवारी ते १७ मार्च २०१९
कार्यक्रम सुरू होण्याची तारीख : सहा मे २०१९
कार्यक्रम संपण्याची तारीख : २७ एप्रिल २०२०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search