इचलकरंजी : येथील डीकेटीईतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची नोंद नवी दिल्लीतील ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांच्याकडून घेण्यात आली आहे. भारतातून केवळ ३० महाविद्यालये निवडण्यात आली असून, यामध्ये डीकेटीईचा समावेश आहे.
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्रीयल भेटी, प्री-प्लेसमेंट चाचणी, मेंटरिंग स्कीम, प्राध्यापकांच्या इंडस्ट्रीजना भेटी, तृतीय व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, परदेशी विद्यापीठांशी असलेले सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय सेमिस्टर एक्सजेंच प्रोग्रॅम या सर्वांची ‘एआयसीटीई’कडून नोंद घेतली गेली आहे. डीकेटीईमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा ‘एआयसीटीई’कडून गौरव करण्यात आला आहे.
‘एआयसीटीई’ ही राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी व शैक्षणिक विकासास प्रोत्साहन देणारी सर्वोच्च समिती आहे. ‘एआयसीटी’ने भारतातील सर्व महाविद्यालयांना त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये राबवत असलेल्या उत्तम उपक्रमांची यादी देण्याचे आवाहन केले होते. महाविद्यालयांनी पाठवलेल्या सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर भारतातील केवळ ३० महाविद्यालयांना त्यांनी ‘बेस्ट प्रॅक्टिसेस इन एआयसीटीई अप्रूव्हड् इन्स्टिट्यूशन्स’ अंतर्गत नामांकित केले आहे व त्या ३० महाविद्यालयांची यादी व तिथे कार्यरत असणाऱ्या उत्तम उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. इतर महाविद्यालयांनी ही विद्यार्थी हितासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, हा मागचा मुख्य उद्देश आहे.
भारतातील तांत्रिक शिक्षणाचे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये मोलाचे स्थान आहे ती आपल्या देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी याद्वारे मदत होणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या ३० महाविद्यालयांमध्ये डीकेटीईसमवेत महाराष्ट्रातील आयसीटी (मुंबई), सीओईपी (पुणे), वालचंद कॉलेज (सांगली) अशा निवडक महाविद्यालयांचा समावेश आहे.
डीकेटीईमध्ये सरकारच्या संशोधनविषयी ५२ कोटींचे विविध प्रकल्प यशस्वीपणे राबविले जात आहेत. या प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळत आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक उपकरणे विद्यार्थ्यांना हाताळायला मिळत आहेत. त्यामुळे गेली ३२ वर्षे विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट देणारी डीकेटीई ही आघाडीची शैक्षणिक संस्था आहे.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव प्रा. डॉ. सपना आवाडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व सर्व प्राध्यापक यांचा मोलाचा वाटा आहे.