Next
धडधड वाढते ठोक्यात... टिकटिक वाजते डोक्यात...
BOI
Tuesday, October 23, 2018 | 02:31 PM
15 0 0
Share this article:

पुणे डॉक्टर्स असोसिएशनतर्फे यंदा ‘तेजोमय’ हा दिवाळी विशेषांक हृदयरोग-हृदयारोग्य हा विषय घेऊन प्रसिद्ध करण्यात आला आहे. हृदयरोग होऊ नये यासाठी जीवनशैली कशी ठेवायची आणि हृदयरोग झालाच तर भांबावून न जाता नेमकं काय करायचं, याचं मार्गदर्शन करणारे तज्ज्ञांचे लेख, मुलाखती या अंकात आहेत. तसेच अन्य साहित्यिक मेजवानीही आहेच. या अंकाच्या संपादिका डॉ. कविता ढमाले यांचं अंकाविषयीचं हे मनोगत...
............
धडधड वाढते ठोक्यात...
टिकटिक वाजते डोक्यात....

नाही, नाही. क्रम नाही चुकलेला... हृदयरोगाबद्दल बोलताना हाच क्रम लागू होतो. आधी ठोके वाढतात आणि मग सुरू होते डोक्यात टिकटिक. ही टिकटिक डोक्यात जाण्याऐवजी घड्याळातच ठेवली म्हणजे वेळेपाशीच ठेवली आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, योग्य बदल केले, तर हा क्रम बदलणार नाही, हे आपल्याच हातात राहतं. मनातलं प्रेम आणि मानवी भावभावना यांच्यामुळे होणारी हृदयाची हवीहवीशी धडधड आणि हृदयातल्या सूरमयी हुरहुरीमुळे डोक्यात वाजणारी सुरेल टिकटिक तशीच ठेवू या.

हृदयारोग्य विशेषांकाचं काम सुरू करताना संपादक म्हणून माझी भूमिका हीच होती आणि म्हणूनच हृदयारोग्य विशेषांक म्हणते आहे, हृदयरोग विशेषांक नाही. या विषयाचा वैद्यकीय अंगानं विचार करताना आजारांबद्दल मांडणी करणं ओघानंच आलं; मात्र हा अंक आपल्यासमोर ठेवताना उद्देश हाच आहे, की आपल्या मनात हृदयाचं आरोग्य सांभाळण्याची आणि हृदयविकाराचा प्रतिबंध करण्याची जाणीव जागी व्हावी, रुजावी. थोडीशी काळजी घेतली, तर आपल्या हृदयाची धडधड आपल्या मुठीत राहणं शक्य आहे, हेही तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्हांला ते मनापासून रुचावं यासाठी या हृदयारोग्य विशेषांकाचा हा प्रपंच!

हृदयाचं आरोग्य सांभाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे मुळातून समजून घेण्यासाठी आपण आधी अनारोग्याकडे एक नजर टाकू. हृदयाच्या अनारोग्याविषयी बोलताना आजारांचा एक मोठा पट नजरेसमोर येतो. वैद्यकीय क्षेत्राशी फारसा संबंध नसलेल्या सामान्य वाचकांना नजरेसमोर ठेवून आखणी करून अधिकाधिक विषयांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्व विषयांवर नजर टाकली, तर त्यात अतिरक्तदाब आणि हृदयविकार यांचा मोठाच वाटा आहे. या दोन्ही आजारांचा जीवनशैलीशी निकटचा संबंध आहे.

हृदयविकाराबद्दल बोलताना जीवनशैली हा शब्द टाळून पुढं जाणं शक्यच नाही. जवळजवळ प्रत्येक लेखात जीवनशैलीचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे उल्लेख आलेला आहे. जीवनशैलीशी निगडित आजारांचं प्रमाण आजकाल वाढतंय हे वाक्य सातत्यानं इतक्या वेळा आपल्या कानांवर पडत असतं, की त्याचं गांभीर्य दुर्लक्षिलं जाऊ शकतं; मात्र हृदयविकार, मधुमेह आणि स्थूलता हे अधिक प्रमाणात होणारे, बऱ्याचदा हातात हात घालून एकमेकांच्या सोबतीनं येणारे आणि म्हणूनच यादीत सर्वांत वरचं स्थान पटकावणारे आजार आहेत.

मागच्या वर्षी आपण ‘स्थूलता विशेषांकांच्या माध्यमातून यातल्या एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला होता. मुळात सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादा वैद्यकीय विशेषांक करताना मूळ विषयाची मांडणी तर करायचीच, शिवाय त्याबरोबरीनं त्याच्याशी संबंधित इतर विषयही हाताळले जातील याकडे लक्ष द्यायचं असं ठरवलं होतं. विषयाशी संबंधित गैरसमज दूर होणं, समज वाढण्यास मदत होणं आणि एकुणात विषयाचा आवाका आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्याची जोपासना करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू होणं हाच उत्तम मार्ग आहे, असा विचार मनात येणं असा तिहेरी हेतू त्यामागं होता, आहे.

या पार्श्वभूमीवर या वर्षी या साखळीतला पुढचा विषय घ्यायचा निर्णय घेणं गरजेचं होतं. जीवनशैलीशी निगडित आजार आता वाढताहेत असं म्हणताना असा प्रश्न पडू शकतो, की हे आजार पूर्वी नव्हतेच का? तर असणार. आज होतं तितक्या चांगल्या प्रकारे आणि लगेच त्यांचं निदान पूर्वी व्हायचं नाही. हल्ली मात्र आजार बळावण्याआधीच आपल्याला तपासण्यांद्वारे त्यांचा सुगावा लागू शकतो; मात्र या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, तरीही हेही खरंच आहे, की एकुणात या आजारांचं प्रमाण वाढतं आहेच.

जीवनशैली, जीवनशैली म्हणजे तरी काय? आपली म्हणून जगण्याची एक रीत आपण निवडलेली तरी असते किंवा प्रवाहात पोहताना आपसूक ती अंगवळणी तरी पडलेली असते किंवा कदाचित या दोन्हींचं मिश्रणही असू शकतं आपल्या जीवनशैलीत.

खाणंपिणं, व्यायाम, विश्रांती, कामाचं स्वरूप आणि वेळा, शारीरिक श्रम, बौद्धिक श्रम, मानसिक स्थिती/ताणतणाव, कुटुंब आणि नातेसंबंध, छंद इत्यादी सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार यात होऊ शकतो. महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की आपली जगण्याची जी काही रीत आहे, ती आपण डोळसपणे निवडली आहे का? नवनवे पर्याय निवडताना, जगण्याच्या पद्धती बदलताना आपण स्वतःला काही प्रश्न विचारतोय का? (मुळात आपली प्रश्न विचारण्याची आणि मग हळूहळू प्रश्न पडण्याचीही क्षमता खूप लहानपणीच आपल्या समाजव्यवस्थेनं हिरावून घेतलीय की काय असा प्रश्न पडतो... प्रश्नही ठरावीक पठडीतलेच मान्य असतात.... असो, तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.)

आपल्या खऱ्या गरजा, आपल्या आरोग्याचं आणि विश्रांतीचं महत्त्व, आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व, कुटुंब आणि नातेवाईक, मित्रपरिवार यांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व, आपल्या कामाचं स्वरूप, त्या अनुषंगानं करायचा वैयक्तिक पातळीवरचा आहार-विहार-विश्रांती यांचा विचार आपण करतोय का? आधुनिक जीवनशैली स्वीकारणं म्हणजे नक्की काय, हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? असे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत. एकदा विचारून, थांबून उपयोग नाही. त्यांवर सातत्यानं विचार व्हायला हवा. त्यांतून जे काही समोर येईल ते चित्र अधिक डोळस आणि स्पष्ट असेल. ते सर्वांसाठी एकसारखंही नसेल कदाचित. कारण आज स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या काही दशकांमध्ये आपण ज्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय इत्यादी स्थित्यंतरांमधून जातोय, त्यांचा वेग खूप आहे आणि ही स्थित्यंतरं या सर्व पातळ्यांवर वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित देशांमध्ये जे काही दशकांपूर्वी होऊन गेलंय, त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विकसनशील देश आता आहेत. असाच फरक राष्ट्रीय पातळीवर मोठी शहरं, छोटी शहरं, ग्रामीण भाग आणि दुर्गम, अतिदुर्गम भाग यांच्यामध्ये दिसेल. हा वेग भांबावून टाकणारा आहे कदाचित... पण तरीही काहीही सोडून देताना आणि नवं स्वीकारताना सध्या याची चलती आहे, नवं तंत्रज्ञान आहे, असंच करायचं असतं, याच्यापलीकडे जाऊन त्या गोष्टी आपल्या जीवनाशी, जीवनशैलीशी आणि गरजांशी पडताळून पाहणं महत्त्वाचं वाटतं. सगळंच आहे तसं घेतलं किंवा सोडलं पाहिजे असं नाही. त्याची आपापली गोळाबेरीज असूच शकते ना? 

नव्या अभ्यासांनुसार, भारत हा मधुमेह आणि हृदयविकार यांची राजधानी होण्याच्या मार्गावर आहे. तसंच भारतीयांमध्ये हृदयविकार दहा वर्षं लवकर होताना दिसतो. पाश्चात्त्य जीवनशैलीचं अंधानुकरण, आरोग्यपूर्ण आहार आणि व्यायाम यांचं प्रमाण कमी असणं, काम आणि विश्रांती यांचं व्यस्त प्रमाण, कौटुंबिक, सामाजिक जीवन, आर्थिक विषमता इत्यादी बरीच आव्हानं समाज म्हणून आपल्यासमोर आहेत. आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये तरुणाईचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांचा देश होण्याची भीती समोर उभी ठाकू नये, म्हणून प्रयत्न करायला हवेत. या तरुणाईपर्यंत हा संस्कार पोहोचायला हवा, रुजायला हवा. त्यातून आपण प्राथमिक प्रतिबंध म्हणजेच मुळातच आजार होणंच टाळू शकू. आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक उपाय यांविषयी जनजागृती करणं गरजेचं आहेच.

आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा विचार घराघरांत रुजायला हवा आणि त्याची सुरुवात लहानपणापासूनच व्हायला हवी. या संदर्भात डॉ. जगदीश हिरेमठ यांनी मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना छान मुद्दा मांडलाय. ते म्हणतात, ‘आरोग्य जोपासना हा एक संस्कार असला पाहिजे. त्याची सुरुवात लहान वयातच व्हायला हवी. मुलांना आरोग्याविषयी सोप्या पद्धतीनं माहिती द्यायला हवी. लहान मुलं ही घरातल्या आरोग्याची मॉनिटर असायला हवीत. ती जेव्हा विचारतील, आईबाबा व्यायाम करताय ना? तुमचं वजन ठीक आहे का? रक्तदाब मोजलाय का? तेव्हा आपल्यावर त्याचा एक प्रकारे दबाव येईल आणि त्यांच्यावर आपोआप तो संस्कार होईल.’ 

मोठ्या प्रमाणावर आणि दूरगामी बदल घडवून आणण्यासाठी व्यापक विचार होणं, चांगल्या व्यवस्था उभारणं आणि त्या योग्यरीत्या कार्यान्वित होणं आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर तर एकच गोष्ट होणं अत्यावश्यक आहे... ती म्हणजे मनाची तयारी आणि मनोनिग्रह! सगळी काळजी घेऊन, सारे प्रतिबंध पाळूनही कुणाला आजार झालाच तर काय, याचीही उत्तरं अंकात मिळतीलच. आजारांविषयीचे लेखच अधिक आहेत असं वाटेलही कदाचित; पण ती तर विषयाची गरज आहे. आधी काय किंवा नंतर काय, चांगल्या गोष्टी शिकायला, स्वीकारायला आणि चांगल्यासाठी बदल करायला जसं काळ, वेळ, वय यांचं बंधन नसतं, तसं आजाराचंही नसतंच.

या अंकातून तुम्हांला विचार करायला, लक्षात ठेवायाला, अंगीकारायला काही जुने, काही नवे आणि काही थोडे वेगळे मुद्दे मिळतील. आपल्या जीवनशैलीकडे नव्यानं, डोळसपणे बघावंसं वाटेल अशी आशा आहे. जीवनशैलीशी निगडित आजारांकडे, खरं तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे सकारात्मकतेनं बघण्यासाठी आपल्याकडे एक मोठंच कारण आहे. जीवनशैली आपली आहे आणि ती ठरवण्याचा, तिच्यात हवे ते बदल करण्याचा निर्णय सर्वस्वी आपल्या हातात आहे. पर्यायानं हे आजार टाळणं किंवा झालेच तर उपचारांनंतर निरोगी जीवन जगत राहणं हेही आपल्या हातांत आहे.

वैद्यकीय लेखांच्या वाचनातून माहिती मिळेल, मेंदूला छान व्यायाम मिळेल. शिवाय त्याबरोबरच हृदयाला आणि मनालाही थोडा व्यायाम हवाच ना? म्हणूनच भावभावनांचा खेळ आणि मेळ असलेल्या ललित लेखांचा आणि कथांचा विभागही अंकात आहे. त्यात प्रथितयश लेखकांचे लेख आणि कथा आहेत. ‘पीडीए’च्या काही सदस्यांचं लेखनही अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे.

चला तर मग, या वाटेवर पाऊल टाकू या. यातून काही नव्यानं समोर येईल; शिकायला, अनुभवायला मिळेल; आनंद आणि समाधान मिळेल. आपणा सर्वांना दीपावलीच्या आरोग्यपूर्ण आणि तेजोमय शुभेच्छा! 

- डॉ. कविता ढमाले
मोबाइल : ९९७०१ ६८९७४
ई-मेल : drkavitadhamale@gmail.com

(लेखिका होमिओपॅथी तज्ज्ञ असून, पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या (पीडीए) सहसचिव आहेत. तसेच ‘पीडीए’तर्फे प्रकाशित झालेल्या ‘तेजोमय २०१८’ या दिवाळी विशेषांकाच्या संपादिका आहेत.)

(‘पुणे डॉक्टर्स असोसिएशन’तर्फे प्रकाशित करण्यात आलेला ‘तेजोमय २०१८’ हा हृदयारोग्य विशेषांक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. तो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

या अंकात काय काय आहे?
- ज्येष्ठ हृदयतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांची मुलाखत
- डॉ. एम. एस. (शिरीष) हिरेमठ, डॉ. सुनील साठे, डॉ. रणजित जगताप, डॉ. मनोज दुराईराज, डॉ. सचिन लकडे, डॉ. प्रफुल्ल विजयकर, डॉ. सचिन यादव, डॉ. य. ग. जोशी अशा नामवंत आरोग्यतज्ज्ञांचे लेख
- प्रवीण दवणे, राजन खान, महावीर जोंधळे, डॉ. अशोक कामत, डॉ. प्रदीप आवटे, डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. सुरेश शिंदे, अमृता देसरडा यांचे लेख आणि लघुकथा 
- वैजनाथ दुलंगे यांची व्यंगचित्रे

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search