Next
रामचंद्र नारायण दांडेकर, सयाजीराव गायकवाड, जेम्स मॉरो
BOI
Saturday, March 17, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘वैदिक मानव’ ह्या विषयावर जर्मन भाषेत ‘डेर वेदिश मेन्श ‘हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवणारे रामचंद्र नारायण दांडेकर,  बडोदे संस्थानाचे अत्यंत प्रजाहितदक्ष महाराज सयाजीराव गायकवाड आणि ‘देव मेलाय आणि त्याचा मृतदेह दूरवर वाहून न्यायचाय, देव कोमात आहे आणि त्याचा दोन मैल लांब देह आता टूरिस्ट अट्रॅक्शन झालाय, मेलेल्या देवाचं मस्तक चंद्राबरोबरच पृथ्वीभोवती फिरतंय आणि अशा परिस्थतीत पृथ्वीवर उडालेला हलकल्लोळ 'द गॉडहेड ट्रीलॉजी’ या त्रिधारेतून मांडणाऱ्या जेम्स मॉरोचा १७ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
............... 
रामचंद्र नारायण दांडेकर 

१७ मार्च १९०९ रोजी साताऱ्यात जन्मलेले रामचंद्र नारायण दांडेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संस्कृत पंडित आणि वैदिक संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचं भारतीय भाषांव्यतिरिक्त जर्मन भाषेवर प्रभुत्त्व होतं आणि १९३८ साली त्यांनी ‘वैदिक मानव’ ह्या विषयावर जर्मन भाषेत ‘डेर वेदिश मेन्श ‘हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली होती. जर्मन संस्कृती, राजकारण अशा विषयांवर त्यांनी स्फुटलेखन केलं होतं. 

त्यांनी विविध ग्रंथ आणि देशीविदेशी संशोधनपत्रिकांमधून वेद, महाभारत आणि भारतीय धर्म ह्या विषयांवर माहितीपूर्ण लेख लिहिले आहेत. वैदिक देवतांचे अभिनवदर्शन हा त्यांचं महत्त्वाचं ग्रंथ. वैदिक देवतांच्या मूलभूत स्वरूपावर त्यांनी नवीन प्रकाश पाडला आहे. वेदिक बिव्लिऑग्रफी (१९४६, १९६१, १९७३) हे वेदविषयक लेखनाच्या सूचीचे त्यांनी तयार केलेले तीन खंड, वेदाभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरलेले आहेत. 

ते अखिल भारतीय प्राच्यविद्यापरिषदेचे प्रधान सचिव होते तसच  ‘इंटरनॅशनल युनियन फॉर ओरिएंटल अँड एशियन स्टडीज’ ह्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या महामंडळाचे अध्यक्ष होते. भारतातल्या आणि भारताबाहेरच्या संस्कृत भाषा आणि प्राच्यविद्याक्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचे आणि विद्यापीठांचे ते सदस्य आणि सल्लागार होते. यूनेस्कोच्या तत्त्वज्ञान आणि मानव्य विद्याभ्यास शाखेचं त्यांनी उपाध्यक्षपद भूषवलं होतं.  

१९६२ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. 

अ हिस्टरी ऑफ द गुप्ताज, सम ॲस्पेक्ट्स ऑफ द हिस्टरी ऑफ हिंदूइझम, सुभाषितावलि, रसरत्नप्रदीपिका, श्रौतकोश, महाभारताची काही पर्वे – असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

११ डिसेंबर २००१ रोजी त्यांचं निधन झालं.
..............

सयाजीराव खंडेराव गायकवाड 

१७ मार्च १८६३ रोजी मालेगावमध्ये जन्मलेले सयाजीराव खंडेराव गायकवाड हे बडोदे संस्थानाचे अत्यंत प्रजाहितदक्ष महाराज म्हणून प्रसिद्ध होते. एकीकडे संस्थानाची आर्थिक आणि राजकीय घडी चोख बसवत असतानाच त्यांनी अनेक सामाजिक कार्यांचा धडाका लावला होता. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणं, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाहासारख्या सुधारणा आणि घटस्फोटासंबंधीचा कायदा अशी अत्यंत समाजाभिमुख आणि महत्त्वाची कामं त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. 

त्यांचं साहित्यसंबंधी महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराथी आणि इतर भाषांमंधून सुमारे ३०० पुस्तकं प्रसिद्ध केली. श्री सयाजी शासन शब्दकल्पतरू हा ग्रंथ तयार करून घेतला. श्री सयाजी साहित्यमाला आणि श्री सयाजी बालज्ञानमाला याद्वारे अनेक चांगल्या पुस्तकंचे अनुवाद करवून घेऊन ते प्रसिद्ध केले.

सहा फेब्रुवारी १९३९ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं. 
.............

जेम्स मॉरो

१७ मार्च १९४७ रोजी फिलाडेल्फियामध्ये जन्मलेला जेम्स मॉरो हा चिंतनात्मक लिखाण करणारा कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखला जातो. त्याने एकीकडे तत्वज्ञानपर लिहितानाच उपहासात्मक लेखनही केलं. तसंच वैज्ञानिक आणि अद्भुत कथाही लिहिल्या. 

तीन लघुकादंबऱ्या, दहा कादंबऱ्या आणि पुष्कळ कथा त्याने लिहिल्या. ब्रह्मांडाविषयी विचार, ईश्वर आणि दैववाद, आधुनिक जगातला संघर्ष, युद्धपिपासू वृत्ती, स्त्रीशक्ती, पालक आणि मुलांचं भावविश्व असे अनेक विषय त्याने हाताळले.

त्याची ‘द गॉडहेड ट्रीलॉजी (टोइंग जेहोवा, ब्लेमलेस इन अबॅड्डन, द इटर्नल फुटमन)’ ही प्रचंड गाजलेली त्रि-धारा! ‘टोइंग जेहोवा’मध्ये देव मेलाय आणि त्याचा अवाढव्य मृतदेह आर्क्टिकपर्यंत वाहून नेण्याची कामगिरी अॅन्थनी हॉर्नवर आल्ये त्याची कथा. तर ‘ब्लेमलेस इन अबॅड्डन’मध्ये देव हा कोमामध्ये आहे आणि त्याचा दोन मैल लांब देह आता टूरिस्ट अट्रॅक्शन झालाय, तशात माणसांना छळल्याबद्दल त्याच्यावर हेगच्या न्यायालयात खटला चालू आहे त्याची कथा होती. तर तिसऱ्या ‘द इटर्नल फुटमन’मध्ये मेलेल्या देवाचं मस्तक पृथ्वीभोवती चंद्राबरोबरच फिरतंय आणि पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात मृत्युच्या भयशंकेने हलकल्लोळ माजलाय. त्यातच अनेक ठिकाणी जातीपातीवरून संघर्ष सुरु झालेत. अशावेळी नोरा ही शाळामास्तरीण आणि जेरार्ड हा शिल्पकार कशी झुंज देतात त्यांची कथा. या सर्वच पुस्तकांना समीक्षकांनी वाखाणलं होतं आणि पुरस्कार मिळाले होते. 

‘द असायलम ऑफ डॉक्टर कॅलीगेरी’ ही त्याची कादंबरीसुद्धा लोकप्रिय ठरली. फ्रान्सिस विंडहॅम हा पेंटर योगायोगाने डॉक्टर कॅलीगेरीच्या इस्पितळात आर्ट थेरपिस्ट म्हणून दाखल होतो आणि त्याला त्या वेडसर विकृत डॉक्टरचे भयानक प्लान्स कळतात. तिथे त्याला इलोना वेसल्स भेटते, तिच्या सौंदर्याने तो मोहित होतो. दोघं मिळून डॉ. कॅलीगेरीच्या प्लान्सचा कसा सामना करतात त्याची ही विलक्षण कथा. 

द वाईन ऑफ व्हायोलन्स, धिस इज द वे द वर्ल्ड एन्ड्स, द फिलॉसॉफर्स अॅप्रेंटीस, द लास्ट विचफाईंडर, द कॉन्टिनेन्ट ऑफ लाईज, बिगफुट अॅन्ड द बोधीसत्त्व, सिटी ऑफ ट्रुथ, ओन्ली बिगॉटन डॉटर, बायबल स्टोरीज फॉर अॅडल्स्े, प्रोमेथ्यूअस वेप्ट – अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

जेम्स मॉरोला नेब्युला पुरस्कार, वर्ल्ड फॅन्टसी अवार्डसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link