Next
मशरूम बिस्किटांना दिल्लीकरांची पसंती
भंडारा जिल्ह्यातील आदिवासी महिलांची पाककृती
BOI
Monday, November 26, 2018 | 03:13 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : भंडारा येथील आदिवासी स्वयं कला संस्थेच्या महिलांनी तयार केलेल्या ‘मशरूम बिस्किटां’नी दिल्लीकर खवय्यांना भुरळ पाडली असून, ‘आदि महोत्सवा’च्या सहाव्या दिवशीच ही बिस्किटे संपली आहेत. यासोबतच राज्यातील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू या महोत्सवास भेट देणाऱ्या देश-विदेशींचे आकर्षण ठरत आहे. 

केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळ यांच्यावतीने ‘दिल्ली हाट’ येथे १६ नोव्हेंबरपासून ‘आदि महोत्सव’ या देशभरातील आदिवासी कलाकारांच्या वस्तू, खाद्य पदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, ते ३० नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात देशभरातील २३ राज्यांतील ६०० कलाकार, २० राज्यांतील ८० शेफ आणि नृत्य कलाकारांचे १४ संघ सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील दोन खाद्यपदार्थांचे व सहा  हस्तकलेचे असे एकूण आठ स्टॉल्स याठिकाणी असून, एकूण २१ कलाकार सहभागी झाले आहेत. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जिओल ओराम यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

भंडारा जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील जांभडी येथील सुनिता ऊइके यांच्या आदिवासी स्वयं कला संस्थेच्या खाद्यपदार्थांचा स्टॉल येथे भेट देणाऱ्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील मशरुम बिस्किट दिल्लीकरांच्या खास पसंतीस उतरले. मशरुमच्या वैशिष्ट्य गुणांची खास पारख असणाऱ्या दिल्लीकरांना या बिस्किटांनी जिंकले आणि म्हणता म्हणता सहा दिवसात या स्टॉलवरील दोनशे मशरूम बिस्किटांची पाकिटे संपली. 

स्वत:चे उत्पादन केंद्र  असणाऱ्या आदिवासी स्वयं कला संस्थेने आदिवासींनी पिकविलेल्या मशरूमचा उपयोग करून, या अनोख्या मशरूम बिस्किटची निर्मिती केली. त्याला पहिल्याच प्रयत्नात राजधानीत उदंड  प्रतिसाद मिळाल्याने सुनिता ऊईके समाधानी आहेत. या स्टॉलवरील आस्की हे तांदळापासून निर्मित धिरडे, बेसन व सुजीचे लाडू आणि साबुदाणा वडा हे जिन्नस दिल्लीतील खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

पुणे येथील महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आदिवासी महिला बचत गटानेही खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला आहे. येथे राज्याच्या व्यंजनाची खास ओळख करून देणाऱ्या पुरणपोळीसह मासवडी, आलुवडी आणि डांगर भाकरी हे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ असून, त्यांनाही दिल्लीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

मेळघाटातील शुद्ध मध, वारली पेंटींग आणि बांबू आर्टही ठरले आकर्षण 


अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात राहणाऱ्या कोरकु आदिवासी जमातींनी संकलित केलेल्या शुद्ध मधाच्या स्टॉलकडेही देश विदेशातील ग्राहकांची गर्दी होत आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील सुसरदा येथे खादी ग्रामोद्योगाच्या ‘स्फुर्ती प्रकल्पा’च्या माध्यमातून या आणि शेजारील ३७ गावांमधील सुमारे ४५० आदिवासींनी मध संकलन केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. मुंबई स्थित भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून या प्रकल्पातील आदिवासींना मधमाशा न मारता शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात आले व प्रक्रिया केंद्रही सुरू करण्यात आले आहे. या स्टॉलवर २५० ग्रॅमपासून एक किलोच्या पॅकमध्ये मध उपलब्ध आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसेसरी येथील अंकुश करमोडा यांच्या वारली पेंटींगचा स्टॉलही विदेशी ग्राहकांचे खास आकर्षण ठरला आहे.या स्टॉलवर आदिवासींचे पांरपरिक तारपा नृत्य, मासेमारी, धार्मिक सण उत्सव, शेती, मुंग्यांचे वारूळ या आशयाची वारली पेंटींग आहेत. 

‘नाशिक जिल्ह्यातील सुरगना येथील विष्णू भवर आणि उजेश मोहनकर या आदिवासी कलाकारांचा बांबू आर्ट स्टॉल आहे. बांबूच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले टी कोस्टर, पेन होल्डर, पेन स्टँड, कप  ग्राहकांना आकर्षित करत आहेत. नागपूर येथील विदर्भ आदिवासी केंद्राच्या  कपडयांच्या  स्टॉलवर सिल्कच्या साड्या, दुपट्टे, शर्ट, जॅकेट खरेदीला गर्दी होत असून, भंडारा येथील अरमीरा महिला उद्योग आणि भंडारा जिल्ह्यातीलच मोहाडी येथील आदिवासी कलाकारांच्या कपड्यांच्या स्टॉललाही विशेष पसंती मिळत आहे,’ असे ‘महान्यूज’च्या बातमीत म्हटले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search