Next
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सहावे
प्रेस रिलीज
Tuesday, October 02, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख अधिक उंचावला असून, ‘दी टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) रँकिंग फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सहावा क्रमांक पटकावला आहे, तर पारंपरिक विद्यापीठांमध्ये त्याने देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे वरच्या पाच संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, तीन आयआयटी आणि मैसूरच्या जेएसएस अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या वैद्यकीय विद्यापीठांचा समावेश आहे.

याबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जगातील पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात स्थान मिळवले आहे. गेली तीन वर्षे विद्यापीठाचा समावेश पहिल्या ६०१ ते ८०० विद्यापीठांच्या गटात होता. या तुलनेत विद्यापीठाने यंदा तब्बल २०० गुणांची झेप घेतली आहे.

‘टीएचई’ रँकिंगद्वारे जगातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या कामगिरीवर आधारित गुणांकन दिले जाते. त्यात अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या चार निकषांवर विशेष भर दिला जातो. याशिवाय इतर १३ महत्त्वाच्या निकषांच्या आधारे गुणांकन दिले जाते. ते अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यानुसार पहिल्या एक हजार विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०१६ सालापासून सहभागी होत आहे. गेली तीन वर्षे (२०१६, २०१७, २०१८) विद्यापीठाची कामगिरी सुधारत होती. आतापर्यंत जगातील पहिल्या ६०१ ते ८०० विद्यापीठांच्या गटात विद्यापीठाचा समावेश होता. या संस्थेने २०१९ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात मोठी सुधारणा होऊन आता पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात समावेश झाला आहे.
 
उल्लेखनीय बाब म्हणजे ‘नॅशनल इन्स्टिट्यूशलन रँकिंग फ्रेमवर्क’ने नुकत्याच जाहीर केलेल्या (एनआयआरएफ) क्रमवारीत विद्यापीठाचा नववा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे ‘टीएचई’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचा २०१६मध्ये तिसरा, तर २०१७मध्ये दुसरा क्रमांक आला होता. २०१८ मध्ये विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला होता. आता पारंपरिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. संशोधन, सायटेशन, उद्योगांकडून उत्पन्न या सर्वच महत्त्वाच्या निकषांवर विद्यापीठाने या वर्षी आघाडी घेतली आहे. त्याचे प्रतिबिंब ‘टीएचई’ रँकिंगमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळाले आहे.

‘जागतिक क्रमवारीत एक महत्त्वाचा टप्पा ओलांडणे हे आव्हान असते. त्यापैकी एक आव्हान आम्ही पार केले आहे. आतापर्यंत ६०१ ते ८०० या गटातून आम्ही ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात पोहोचलो आहोत. आता पुढचा टप्पा पहिल्या ५०० विद्यापीठांच्या गटात पोहोचण्याचा असेल. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या गुणांकनावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे आणखी जबाबदारीही वाढली आहे,’ अशी प्रतिक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link