Next
अस्थिर शेअर बाजारात नेमके काय करावे?
BOI
Saturday, October 20, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून नव्याने बाजारात आलेले गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येते. आणखी नुकसान व्हायला नको म्हणून हे लोक नुकतेच घेतलेले शेअर्स भीतीपोटी विकू लागल्याने बाजार आणखी पडू लागल्याचे दिसून येते. अशा वेळी नेमके काय करावे, याबद्दल जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात...
.......
गेले काही दिवस होत असलेले रुपयाचे अवमूल्यन, अमेरिका व चीन व्यापारातील काही वादग्रस्त मुद्दे, अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता, क्रूड ऑइलच्या वाढत्या किमती व लवकरच होऊ घातलेल्या चार राज्यांतील विधानसभेच्या व आणखी ७-८ महिन्यांनी येऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्व बाबींचा विचार करता शेअर बाजारातील अस्थिरता व पडझड आणखी काही काळ राहू शकते.

अस्थिर (व्होलाटाइल) शेअर बाजारात नेमके काय करावे याबाबत सर्वसामान्य गुंतवणूकदार नेहमीच संभ्रमात असतो. अशा वेळी काहीच न करणे हा एक उत्तम मार्ग होय; मात्र चांगल्या कंपन्यांचे शेअर्स या वेळी स्वस्तात मिळण्याची संधी असते. कारण या काळात अशा कंपन्यांच्या कामकाजावर कुठलाही विपरीत परिणाम झालेला नसतो. भाव पडणे ही केवळ एक प्रतिक्षिप्त (‘नी जर्क’) क्रिया असते. असे पडलेले भाव नजीकच्या काळात पुन्हा वाढत असतात. 

तेजी-मंदी ही समुद्रातील भरती ओहोटीसारखी असून, ओहोटीनंतर जशी भरती येतेच, तशीच मंदीनंतर तेजी येणार, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी गुंतवणूकदाराने असा विचार करणे आवश्यक असते, की ज्या उद्दिष्टाने आपण गुंतवणूक केली होती त्यात काही बदल झालाय का? कारण असा बदल मुळात झालेलाच नसतो आणि म्हणून बाजारातील आपली गुंतवणूक काढून घेण्याचे काहीच कारण नसते.

शेअर बाजारातील नवख्या गुंतवणूकदारास अशी भीती वाटणे साहजिक आहे; तथापि आपण शेअर बाजारात गेली काही वर्षे गुंतवणूक करत असाल, तर बाजारातील अचानक होणाऱ्या पडझडीची आपल्याला कल्पना असते. एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे, की शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक (पाच ते १० वर्षांसाठीची) अन्य गुंतवणुकीपेक्षा फायदेशीर ठरते; मात्र अल्पकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेलच असे नाही. (कारण दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे बाजारातील चढ-उतारांची जोखीम कमी होते.) ज्यांना अल्पकालीन गुंतवणूक करायची आहे, त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक टाळलेलीच बरी.

सगळ्यात मोठी चूक म्हणजे मार्केट पडल्यावर घाबरून जाऊन आपले शेअर्स/म्युच्युअल फंड विकून टाकणे. कारण हे शेअर बाजाराच्या मूळ तत्त्वाशी विसंगत आहे. शेअर बाजारात शेअर कमी किमतीला घेऊन जास्त किमतीला विकणे अपेक्षित असते. आपण मात्र मार्केट पडल्यावर घाबरून शेअर/म्युच्युअल फंड कमी भावात विकत घ्यायच्याऐवजी कमी भावात विकून टाकतो. तसेच बरेचसे गुंतवणूकदार मार्केट पडल्यावर आपली म्युच्युअल फंडातील एसआयपी घाबरून जाऊन बंद करतात. उलट अशा वेळी एसआयपी चालू ठेवल्यास युनिटची खरेदी आधीच्यापेक्षा कमी किमतीत होते व नियोजित कालावधीसाठी नियमित एसआयपी चालू ठेवल्याने एकूण गुंतवणूक सरासरी भावाने झाल्याने आपण ज्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक केली असते, ते साध्य होऊ शकते. मध्येच एसआयपी बंद केल्याने आपले उद्दिष्ट साध्य होत नाही. 

गुंतवणूकदारांची आणखी एक प्रकर्षाने दिसून येणारी चूक म्हणजे मार्केट मंदीतून जात असताना गुंतवणूकदार मिळणाऱ्या परताव्याची तुलना बँक, पोस्ट, पीपीएफ, सोने, रिअल इस्टेट यांसारख्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याशी करतात. असे करणे चुकीचे असते. कारण शेअर, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकालीन असल्यास अन्य पर्यायांच्या तुलनेत फायदेशीरच असते.

त्या दृष्टीने आपले आर्थिक नियोजन करून, मगच आपल्या उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करून, त्यात मार्केटच्या चढ-उतारांनुसार बदल न करता नियमित गुंतवणूक करणेच योग्य ठरते. थोडक्यात, गुंतवणूकदारांनी सद्य परिस्थितीत गोंधळून न जाता आपली गुंतवणूक तशीच पुढे चालू ठेवावीच; पण शक्य असेल तर गुंतवणुकीत वाढ करण्याचे धोरणही अवलंबावे.


- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी  प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pramod Mainkar About 181 Days ago
Very good.
0
0

Select Language
Share Link
 
Search