Next
प्रयागराजचा कुंभमेळा
भारतीयांचे जागतिक पातळीवरील महासंमेलन
BOI
Sunday, January 27, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:प्रयाग येथील कुंभमेळा मकर संक्रांतीला सुरू झाला असून, तो ५० दिवस चालणार आहे. त्या निमित्ताने, कुंभमेळा, अर्धकुंभ, शाही स्नान, आखाडा, सिंहस्थ या सगळ्या गोष्टींचे नेमके अर्थ काय, ही परंपरा कधीपासून सुरू आहे, वगैरे सगळ्या बाबींबद्दल मार्गदर्शन करणारा, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांचा हा लेख... ‘किमया’ सदराच्या आजच्या भागात...
...........
जानेवारी १९७९मध्ये आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या अधिवेशनासाठी सहकुटुंब प्रयागला (अलाहाबाद) गेलो होतो. तिथे कडाक्याची थंडी होती. यंदा मकर संक्रांतीला (१५ जानेवारी २०१९ रोजी) प्रयागमध्ये जसा अर्धकुंभमेळा सुरू झाला, तसाच त्या वेळी होता. भारतभरातून लाखो भाविक गंगेत स्नान करण्यासाठी आले होते. नदीकडे जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग स्वतंत्र होता. झुंडीच्या झुंडी तिथून जात-येत होत्या. आम्हीसुद्धा बर्फासारख्या पाण्यात डुबकी मारून आलो. तो सोहळा मोठा विलक्षण होता. सुरक्षाव्यवस्था उत्तम होती. आज त्या गोष्टीला ४० वर्षे झाली. कुंभमेळ्याची दिमाखदार सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशीच एक कोटीहून अधिक भाविक तिथे पोहोचले होते. राहणे, जेवणखाण, स्वच्छता आणि सुरक्षा यांचे आयोजन आदर्श स्वरूपाचे झालेले आहे. उत्तर प्रदेश सरकारतर्फे जणू एक शहरच तिथे वसवले गेले आहे. पहिल्या दिवसापासून सहा महत्त्वाची शाही स्नाने होणार आहेत. एकूण आठ ते १० कोटी लोक ही पर्वणी साधणार आहेत. परदेशातून एक लाख श्रद्धावान पर्यटक येणार आहेत. भारतीय संस्कृती आणि संगीताचे अनेक कार्यक्रम या काळात तिथे सादर होणार आहेत.

शाही स्नानासाठी साधूसंत हत्ती आणि घोड्यांवरून, सोन्या-चांदीने मढलेल्या पालख्यांमधून हजर होतात. किनाऱ्यावर मोठ्या आवाजात धर्मघोषणा होतात. पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास मुहूर्त सुरू होतो. त्या वेळी डुबकी मारल्यास अमरत्व प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. पहिला दिवस निरनिराळ्या आखाड्यांच्या साधूंच्या स्नानातच जातो. त्या वेळी इतर भाविकांना तिथे प्रवेश नसतो. संन्याशी लोकांच्या अनेक शाखा आहेत. त्या अशा - आनंद, भारती, सरस्वती, तीर्थ, गिरी, पर्वत, अरण्य, वन, सागर, पुरी, वृक्ष, आश्रम, नागा. स्नानाचा पहिला मान नागा संन्याशांना असतो. त्यातले बहुतेक जण नग्नावस्थेत नदीकडे जातात. त्या वेळी तिथे कडेकोट बंदोबस्त असतो. या वर्षी ‘किन्नर’ या नव्या आखाड्याचा त्यात प्रवेश झाला आहे. त्याला अन्य आखाड्यांची मान्यता मिळालेली आहे. त्या आखाड्याच्या महामंडलेश्वर (प्रमुख) आहेत लक्ष्मीनारायण त्रिपाठी. प्रत्येक आखाड्याचे स्वतंत्र वैशिष्ट्य आणि महत्त्व असते. त्यांचे कायदे/नियम, दिनचर्या आणि इष्टदेवता निरनिराळ्या असतात. एकूण १४ आखाड्यांमध्ये सात शैव, तीन वैष्णव, तीन उदासीन (शीख) आणि एक किन्नर असे भाग आहेत. त्यांच्या केंद्राची स्थाने हिमाचल प्रदेश, काशी, अयोध्या, अलाहाबाद, हनुमानगढी, मांडवी (गुजरात) गिरनार येथे आहेत.

शाही स्नानाची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. या वेळी साधूंचा राजासारखा आदरसत्कार केला जातो; तसा त्यांचा रुबाब असतो, म्हणून त्याला शाही स्नान म्हटले जाते. सुरुवातीच्या काळात आखाड्यांमध्ये, स्नानासाठी प्रथम कोणी जायचे यावरून संघर्ष झाले; पवित्र नदीचे पाणी लाल झाले. नंतर ब्रिटिश काळात त्यांचा क्रम निश्चित करण्यात आला.

कुंभमेळ्याचे आयोजन हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी होते. सहाव्या शतकात, सम्राट हर्षवर्धनाच्या काळात प्रसिद्ध बौद्ध प्रवासी ह्युएन्संग याने कुंभाचे वर्णन लिहून ठेवलेले आहे. दर तीन वर्षांनी हे महामेळावे भरतात. एका स्थानी १२ वर्षांनी ती पर्वणी येते. समजा, या वर्षी प्रयागमध्ये कुंभमेळा आहे. तीन वर्षांपूर्वी तो उज्जैनला झाला. २०२२मध्ये हरिद्वारला कुंभ भरेल. त्यानंतर तीन वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वरची वेळ येईल. यंदाचा प्रयागराजमधील मेळा अर्धकुंभच आहे. याचा अर्थ २०१३मध्ये तिथे पूर्णकुंभ साजरा झाला.

कुंभ शब्दाचा अर्थ आहे कलश. देव-दानवांनी समुद्रमंथन केले, तेव्हा अमृताने भरलेला कलश बाहेर आला, अशी पौराणिक कथा आहे. ते अमृत मिळावे यासाठी देव आणि दानवांत धक्काबुक्की सुरू झाली. त्या गडबडीत अमृताचे काही थेंब ज्या तीन नद्यांमध्ये पडले, तिथे कुंभमेळ्याचे आयोजन होते. त्या तीन नद्या म्हणजे गंगा, क्षिप्रा आणि गोदावरी. हरिद्वार आणि प्रयाग येथे गंगा (त्रिवेणीतील एक) आहे. उज्जैनला क्षिप्रा आणि नाशिकला गोदावरी. हरिद्वार आणि प्रयागमध्ये दोन कुंभ पर्वांमध्ये (सहा वर्षांनी) अर्धकुंभ होतो.

काशी येथील कुंभमेळ्यातील जटाधारी साधू .‘सिंहस्था’मध्ये कुंभमेळा संपन्न होतो, तो कुठे? गुरू ग्रह जेव्हा सिंह राशीत आणि रवी मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा उज्जैनला आणि नाशिकमध्येही गुरूच्या ‘सिंह’ प्रवेशाच्या वेळी मेळा भरतो. गुरूला सर्व १२ राशींमधून भ्रमण करायला (दर वर्षी एक रास) १२ वर्षे लागतात. म्हणून नाशिक आणि उज्जैनला १२ वर्षांनी पूर्णकुंभ साजरा होतो. गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत येतो, तेव्हा प्रयागला कुंभ असतो. पुराणातील कथेनुसार देव-दानवांचे अमृत मिळवण्यासाठी बारा दिवस युद्ध झाले. देवांचे बारा दिवस ती माणसांची बारा वर्षे. कुंभमेळेही १२ असतात. त्यातले चार पृथ्वीवर आणि आठ देवलोकांत होतात. क्षिप्रा नदीला ‘उत्तरी गंगा’ आणि गोदावरीला ‘गोमती गंगा’ अशी नावे आहेत. म्हणून त्या गंगेसमानच पवित्र आहेत. हरिद्वारच्या कुंभात स्नान केल्याने ‘मोक्ष’ मिळतो - म्हणजे त्यांना पुनर्जन्म नाही, अशी श्रद्धा आहे. आद्य शंकराचार्यांनी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेची प्रतिष्ठापना केली. लाखो भाविकांना त्या काळात अनेक अधिकारी संत-महंतांचे एकाच ठिकाणी दर्शन घेता येते. सम्राट हर्षवर्धनाने कुंभमेळ्याला राजाश्रय दिला.

या वेळी प्रयागतीर्थ स्थानी १५ जानेवारी ते चार मार्च २०१९ असा सुमारे ५० दिवस गंगास्नानाचा सोहळा चालेल. पहिले शाही स्नान मकर संक्रांतीला, १५ जानेवारी रोजी झाले. दुसरे पौष पौर्णिमेला २१ जानेवारीला होऊन गेले. तिसरे मौनी अमावस्येला चार फेब्रुवारीला, चौथे वसंत पंचमीला १० फेब्रुवारी रोजी, पाचवे १९ फेब्रुवारीला माघी पौर्णिमेच्या दिवशी आणि सहावे अखेरचे शाही स्नान चार मार्चला महाशिवरात्रीच्या पावन दिवशी होईल. त्याच दिवशी प्रयागचा कुंभमेळा समाप्त होईल. कोणतेही औपचारिक निमंत्रण नसताना देशभरातून कोट्यवधी आणि बाहेरच्या देशांमधून लाखो भाविक कुंभमेळ्याला उपस्थित राहतात. सन १९२४मध्ये ब्रिटिश सरकारने कुंभमेळ्यावर बंदी आणली होती; पण ती टिकू शकली नाही. पुढे ब्रिटिशांनीच आखाड्यांमधील भांडणे मिटवून, त्यांच्या प्राचीन परंपरा लक्षात घेऊन स्नानासाठी क्रम लावून दिला. तो आजतागायत पाळला जात आहे. प्रचंड संख्येने लोक एका जागी जमत असले, तरी स्नान उरकताच ते आपापल्या गावी परत जातात. तशी वाहनांची व्यवस्था असते. त्यामुळे गोंधळ उडत नाही. क्वचित प्रसंगी चेंगराचेंगरी आणि पूल कोसळण्याचे प्रकार झाले आहेत. ते टाळण्यासाठी सरकार आणि हजारो स्वयंसेवक आटोकाट प्रयत्न करत असतात.

उत्तर प्रदेश सरकारने प्रयागच्या, जगातील सर्वांत मोठ्या संमेलनासाठी ‘न भूतो न भविष्यति’ अशी तयारी केली आहे. कशी ते पाहू या.

- रेल्वेच्या १० स्थानकांची सुधारणा
- उपमार्गांचा विस्तार
- १० ओव्हरब्रिजचे बांधकाम
- २६४ रस्त्यांचे रुंदीकरण/सौंदर्यीकरण
- नवीन विमानतळाचे बांधकाम
- ४१ हजार एलईडी दिवे बसवले.
- उत्तम तंबूंचे एक शहरच उभारले.
- सुरक्षिततेसाठी ११३५ ‘सीसीटीव्हीं’द्वारे नियंत्रण
- सुमारे सव्वा लाख शौचालयांची व्यवस्था
- जवळच्या पर्यटनस्थळांचा विकास

त्याशिवाय, उत्तम वैद्यकीय सुविधा, खाण्या-पिण्याची उत्तम व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझर शो, जलपर्यटन, गंगेची आरती अशा व्यवस्थाही केलेल्या आहेत. रेल्वेशी केलेल्या सहकार्य करारानुसार देशभरातून नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त ८०० जादा गाड्यांची सोय केलेली आहे. बामरौली विमानतळावरून विमानांच्या फेऱ्याही वाढणार आहेत. कुंभाच्या जागी पार्किंगची ९५ ठिकाणे आहेत. सुमारे साडेपाचशे शटल बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वच्छता राखण्यासाठी २० हजार कचराकुंड्या बसवलेल्या आहेत.प्रयागला रेल्वेने गेल्यास अलाहाबादची - जंक्शन, छेओकी आणि शहर अशी तीन स्थानके आहेत. १२ किलोमीटरवर असलेला बामरौली विमानतळ दिल्ली, लखनौ, पाटणा, इंदूर आणि नागपूर शहरांशी जोडलेला आहे. सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांशी प्रयाग जोडलेले आहे. निवासासाठी हॉटेल, आरामशीर तंबूंव्यतिरिक्त शहरातील घरांमधील वापरात नसलेल्या खोल्या भाड्याने देण्याची सोय केलेली आहे. ‘युनेस्को’ने २०१७मध्ये कुंभमेळा हा जगातला ‘अविभाज्य सांस्कृतिक वारसा’ म्हणून जाहीर केला आहे.

या कुंभमेळ्यात सुमारे एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. सहा लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. ३२०० हेक्टर जमीन तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. २२ तरंगते पूल आहेत. 

‘मी’पणाचा विसर पडेल, अशा या महान पर्वणीचा लाभ शक्य असेल त्या सर्वांनी अवश्य घ्यावा.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Tulsiram Thamji Gandal About 148 Days ago
मी कुंभमेळ्यास जाणार आहे.मी आणे येथील रहिवाशी आसुन आमचे ग्रामदैवत श्रीरंगदासस्वामीमहाराज यांच्या चरनपादुका घेऊन जानार आहे.
0
0

Select Language
Share Link
 
Search