Next
एक ते तीन फेब्रुवारीदरम्यान गानसरस्वती महोत्सव
‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ पं. शरद साठे यांना
BOI
Tuesday, January 22, 2019 | 02:10 PM
15 0 0
Share this article:

गानसरस्वती महोत्सवाची माहिती देताना नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर व राहुल पणशीकर.

पुणे : ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दर वर्षी आयोजित करण्यात येणारा ‘गानसरस्वती महोत्सव’ या वर्षी येत्या एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान पुण्यात रंगणार आहे,’ अशी माहिती नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 


‘राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सायंकाळी पाच वाजल्यापासून महोत्सवाला सुरुवात होणार आहे, तर रविवारी सकाळी नऊ वाजता महोत्सव सकाळी सुरू होणार आहे. या महोत्सवात प्रख्यात ज्येष्ठ कलाकारांबरोबरच उदयोन्मुख युवा कलाकारांचाही कलाविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे,’ असेही रघुनंदन पणशीकर यांनी या वेळी सांगितले. 

‘ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला दर वर्षीप्रमाणेच यंदाही ‘हार्मन’ या कंपनीचे प्रमुख सहकार्य लाभले आहे. याबरोबरच याही वर्षी ‘फ्लीटगार्ड’चे पाठबळ महोत्सवाला असून, ‘टाटा कॅपिटल’, सौजन्य कलर आदींचेही सहकार्य या महोत्सवाला मिळाले आहे,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

पणशीकर पुढे म्हणाले, ‘नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे २०१३ पासून ‘गानसरस्वती’ महोत्सवाचे आयोजन पुण्यात केले जाते आहे. या वर्षी महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी, एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ख्यातनाम गायिका भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या पणती एस. ऐश्वर्या आणि एस. सौंदर्या यांच्या गायनाने होणार आहे. यानंतर सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक एन. राजम यांच्या कन्या डॉ. संगीता शंकर आणि नात नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप आग्रा जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या सुश्राव्य गायनाने होईल. दुसऱ्या दिवशी मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी आणि ऋतुजा लाड या गायनसेवा सादर करतील. त्यानंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचीस्मिता चॅटर्जी यांचे बासरीवादन होईल. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल. अभिजित पोहनकर या वेळी अजय पोहनकर यांना की-बोर्डवर साथसंगत करतील.’

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात रविवारी, तीन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या वेळी अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन होईल. त्यानंतर किराणा घराण्याचे गायक आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन होईल. तिसऱ्या सत्राचा समारोप पं. रघुनंदन पणशीकर, पं. आनंद भाटे आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘वैकुंठनायका’या विशेष सादरीकरणाने होईल.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशीच्या चौथ्या सत्रात रविवारी सायंकाळी पाच वाजता क्षितीजा बर्वे भरतनाट्यम प्रस्तुती करतील. त्यानंतर किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होईल आणि बुधादित्य मुखर्जी यांच्या सूरबहार आणि सतार वादनाने महोत्सवाचा समारोप होईल.    गेल्या पाच वर्षांपासून ‘नाट्यसंपदा प्रतिष्ठान’ने गानसरस्वती महोत्सवाच्या निमित्ताने दोन पुरस्कार सुरू केले आहेत. यंदा सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ पं. शरद साठे यांना प्रदान करण्यात येणार आहे, तर ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार’ गोव्याचे सुप्रसिद्ध संगतकार पं. राया कोरगावकर (हार्मोनियम) आणि पं. दयानिधेश कोसंबे (तबला) यांना एकत्रितपणे देण्यात येईल. 

याबरोबर या वर्षापासून सुरू करण्यात आलेला ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार’ सरोद वादक अभिषेक बोरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार बेलवलकर हाउसिंग यांनी पुरस्कृत केला असल्याचे नाट्यसंपदाचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर यांनी जाहीर केले. 

पं. शरद साठे
संपूर्ण महोत्सवाची खुर्चीसाठीची सिझन देणगी प्रवेशिका ही जीएसटीसहित ६००रुपये, तर मर्यादित भारतीय बैठक ही सिझन देणगी प्रवेशिका जीएसटीसहित २०० रुपये इतकी आहे. याशिवाय प्रतीदिवस खुर्चीची देणगी प्रवेशिका २०० रुपये असेल. 

महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका www.bookmyshow.com आणि www.kyazoonga.com येथे ऑनलाईन उपलब्ध असणार असून, मंगळवारी, २२ जानेवारी २०१९ रोजीपासून सकाळी दहा वाजल्यापासून पुढील ठिकाणीदेखील रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

१) नावडीकर म्युझिकल्स- यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ
२) शिरीष ट्रेडर्स- कमला नेहरू पार्कजवळ
३) बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर
४) टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता
५) सिटी प्राईड मल्टीप्लेक्स, कोथरूड
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search