Next
ऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...
BOI
Sunday, November 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हुस्नलाल-भगतराम (फोटो : Cinestaan.com)संगीतकारांची जोडी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रकार ज्यांच्यापासून सुरू झाला, ती जोडी म्हणजे हुस्नलाल व भगतराम होय. त्यापैकी भगतराम यांचा १७ नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या त्यांनी संगीत दिलेल्या ‘ऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...’ या गीताबद्दल...
.......
संगीतकारांची जोडी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रकार ज्यांच्यापासून सुरू झाला, ती जोडी म्हणजे हुस्नलाल व भगतराम होय. आजच्या पिढीला त्यांची नावे पटकन आठवतील, असे त्यांचे प्रारब्ध नव्हते. आजच्या पिढीला असे म्हणण्यापेक्षा मागच्या पिढीतील संगीतप्रेमी तरी यांना विसरले नव्हते, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. कारण मधुर संगीत देऊनही या दोघांच्या वाट्याला घोर उपेक्षाच आली. खऱ्या कलावंतांच्या लेखी घोर उपेक्षा हेच मरण असते. ते त्यांच्या देहाच्या मृत्यूच्या आधीच आले होते. 

आज त्यांची आठवण तीव्रतेने येण्याचे कारण म्हणजे कालची तारीख. १७ नोव्हेंबर १९७३ या दिवशी भगतराम यांचे निधन झाले होते. तत्पूर्वी १९६८ साली २८ डिसेंबर रोजी हुस्नलाल यांचे निधन झाले होते. एकाच कुटुंबातील भाऊ भाऊ संगीतज्ञ असावेत हा एक योगायोग. हुस्नलाल-भगतराम ही संगीतकारांची जोडी होती आणि प्रत्यक्षात ते भाऊ-भाऊ होते. या दोघांचे एक वडीलबंधू होते. पंडित अमरनाथ या नावाने ते ओळखले जायचे.

पंजाबमधील कामा नावाच्या गावचे हे बंधू. लाहोर येथील दलसुख पंचोली यांच्या चित्रपटांना पं. अमरनाथ संगीत देत असत, तेव्हा हुस्नलाल त्यांना मदत करत असत. त्या वेळी पुणे येथे असलेल्या प्रभात कंपनीने पं. अमरनाथ यांना नवीन चित्रपटाच्या संगीतासाठी बोलावले. अमरनाथ यांची तब्येत तेव्हा ठीक नसल्यामुळे त्यांनी हुस्नलाल यांना पाठवले आणि त्यांच्या मदतीस भगतराम यांनाही जायला सांगितले. तो काळ १९४४-४५चा होता. 

पुढे अल्प कालावधीतच अमरनाथ यांचे निधन झाल्यामुळे हुस्नलाल व भगतराम यांच्याकडे संगीत देण्याची कामे येऊ लागली. आपल्या वडील बंधूंकडून संगीताचे धडे घेतलेल्या या दोन्ही भावांनी संगीतकार श्यामसुंदर यांच्याकडूनसुद्धा संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांचा मटक्याचा ठेका या दोन्ही भावांच्या डोक्यात बसला होता. त्याच्या आधारे त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. 

‘प्यार की जीत’ (१९४८) या चित्रपटातील गीते तर प्रचंड लोकप्रिय ठरली होती. ‘एक दिल के टुकडे हजार हुए...’ हे त्या चित्रपटातील मोहम्मद रफींनी हुंदके देत देत गायलेले गीत तर आजही आवर्जून ऐकले जाते. त्यांनी संगीत सोपे केले. सामान्य माणसांच्या ओठावर खेळतील अशा त्यांनी चाली बांधल्या.

संगीतकार हुस्नलाल-भगतराम यांच्या मधुर चाली कशा लोकप्रिय होत्या व आहेत याचा किस्सा नव्हे, तर एक प्रत्यक्ष हकीकत आहे. १९४९मध्ये ‘बडी बहन’ हा त्यांच्या संगीताने नटलेला चित्रपट पडद्यावर झळकला होता. त्यातील आठही गीते मधुर सुरावटीमधील होती व लोकप्रियही झाली होती. त्यापैकी ‘चुप चुप खडे हो...’ हे लता मंगेशकर आणि प्रेमलता यांनी गायलेले गीत त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालेच होते. परंतु १९७५-७६च्या सुमारास राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांनी त्यांच्या कीर्तनात या गीताची चाल किती छान आहे हे सांगून, त्या चालीवर एक भक्तीगीत तयार करून सादर केले होते. त्यानंतर आता २०१८मध्ये माझ्या नातीच्या शाळेत एक कृष्ण-गीत त्यांच्या शिक्षकांनी बसवले होते. ते मी ऐकले, चाल ओळखीची वाटली. ताला-सुरात थोडा बदल केलेली ती ‘चुप चुप खडे हो...’ची चाल असल्याचे माझ्या लक्षात आले. जवळपास ७० वर्षांनीही त्या चालीतील गोडवा कायम असल्याचे लक्षात येऊन ती चाल बांधणाऱ्या या संगीतकारद्वयीला मी हात जोडले. 

स्टेज, आधी रात, मीना बाजार, आँसू, जलतरंग, बालम, सनम, नाच अशा अनेक चित्रपटांतील त्यांची गीते म्हणजे मधुर संगीताचा खजिना आहे. मटक्याचा ठेका हे त्यांच्या गीतांचे वैशिष्ट्य होते; पण हा ठेका म्हणजेच हुस्नलाल-भगतराम नव्हेत. त्यांची इतरही मधुर गीते आहेत, ज्यामध्ये हा ठेका नाही. उदाहरणार्थ, ‘छोटी भाभी’मधील ‘दर्दे जुदाई है...’ हे गीत. ‘काफिला’ चित्रपटातील ‘वो मेरी तरफ यूँ...’ हे किशोरने गायलेले गीत. ‘मुहब्बत की हम चोट खाए हुए है...’ (फर्माईश), ‘अगर दिल किसी पर...(गौना), ‘पी पी की बोली न बोल...’ (आनबान) ही अशी गीते ऐकल्यावर हुस्नलाल-भगतराम यांच्या संगीतातील वैविध्य जाणवते. 

...पण असे असूनही १९६० नंतर ही जोडी मागे पडली. कारण १९६०च्या नंतर या बंधूंच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीला राहावे लागले. त्यामुळे त्यांचे मुंबईतील वास्तव्य कमी झाले. वास्तविक ही परिस्थिती तात्पुरत्या स्वरूपाची होती; पण त्याचा विचार न करता, ‘पंडितजींना (म्हणजे हुस्नलाल यांना) आता चित्रपटसृष्टीत रस राहिला नाही,’ असा खोटा समज काही नतद्रष्टांनी पसरविला. भगतराम मुंबईतच होते; पण त्यांच्याकडे कोणी फिरकेना आणि या दोघांची कारकीर्द संपुष्टात येऊ लागली. 

हुस्नलाल यांच्या निधनानंतर भगतराम काही काळ संगीतकार शंकर-जयकिशन यांच्याकडील वाद्यवृंदातील एक वादक म्हणून काम करीत होते. वास्तविक पाहता, शंकर-जयकिशनपैकी शंकर यांनी हुस्नलाल-भगतराम यांना गुरू मानले होते. त्या दोघांचा वारसा शंकर-जयकिशन चालवत होते. पण....

नियतीचे खेळ कोणाला कळतात? तुमच्याजवळ नुसते गुण असून चालत नाही. नशिबाची साथही महत्त्वाची असते. या बंधूंना अल्पकाळ लोकप्रियता मिळाली; पण नंतर... उपेक्षा, उपेक्षा आणि फक्त उपेक्षाच वाट्याला आली. त्यांच्या गुणांचे म्हणावे असे चीज झालेच नाही. 

आदिल-ए-जहाँगीर या १९५५च्या चित्रपटासाठी त्यांनी आठ गीते संगीतबद्ध केली होती. जी. पी. सिप्पी त्या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक होते. मीनाकुमारी नायिका, तर प्रदीपकुमार नायक होता. या चित्रपटाची आठही गाणी कमर जलालाबादी यांनी लिहिली होती. हो.. तेच कमर जलालाबादी... ‘बडी बहन’चे ‘एक दिलके टुकडे...’ लिहिणारे!

याही चित्रपटात त्यांनी असेच एक दर्दभरे गीत लिहिले होते. दो पहेलू स्वरूपातील हे गीत लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांनी स्वतंत्ररीत्या गायले होते. ‘ऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ...’ ही त्या गीताची सुरुवात. हे असे फक्त प्रियकराला व प्रेयसीलाच म्हटले जाते काय?

कौतुकाचे, गुणगौरवाचे, कलेचे चीज झाल्याचे जीवन ज्यांच्या वाट्याला येत नाही, ते पण अशा जीवनाला संबोधून म्हणतात, ‘ऐ मेरी जिंदगी तुझे ढूँढू कहाँ?’ अखेरच्या विपन्नावस्थेतील काळात हुस्नलाल-भगतराम यांच्या ओठांवर हाच प्रश्न नसेल ना?

आदिल-ए-जहाँगीर या चित्रपटातील हे गीत तसे दु:खी आशयाचे आहे; पण तरीही ते सुनहरे आहे. महत्त्वाचे म्हणजे हे गीत लिहिताना गीतकार कमर जलालाबादींनी साध्या साध्या शब्दांत दोन ओळींचीच कडवी लिहिली आहेत; पण ते शब्द आशयसंपन्न आहेत. त्यांना हुस्नलाल-भगतराम यांनी अशी सुंदर चाल लावली आहे, की नकळत आपणही ते गाणे गुणगुणत त्या गीताच्या प्रेमात पडतो. लता मंगेशकर यांनी स्वतंत्ररीत्या गायलेल्या गीताची कडवी वेगळी आहेत; पण ध्रुवपद एकच आहे. आपण येथे तलतने त्याच्या मखमली, पण दर्दभऱ्या स्वरात गायलेले हे गीत पाहू या.

न तो मिल के गये नहीं छोडा निशान...

हे माझ्या प्राणप्रिय व माझे जीवनच बनून राहिलेल्या प्रिये, तुला मी कोठे शोधू? तू मला भेटूनही गेली नाहीस आणि जाताना एखादी ओळखीची खूणही (निशाण) ठेवून गेली नाहीस. 

गीताची अशी सुरुवात करून प्रेयसीपासून दुरावलेला तो आपली व्यथा मांडताना म्हणतो -

न वो लैला रही न वो महमिल रहा 
पास मंज़िल के आके लुटा कारवाँ

मनापासून प्रेम करणारी ती लैला राहिली नाही आणि तो ‘महमिल’ही (मजनूचे दुसरे नाव) राहिला नाही. (तशीच आपली अवस्था होणार आहे का? कारण बघ ना..) तुझ्या प्राप्तीच्या, प्रीतीच्या ध्येयाजवळ येऊन माझ्या जीवनाचा जथ्था उद्ध्वस्त झाला. अर्थातच माझे जीवन लुटले गेले व आपण दोघे दुरावलो. आता तुला कोठे शोधू मी?

ये सितारे नहीं गम के आँसू है ये
रो रहा है मेरे हाल पार आसमाँ...

तुझ्या विरहात मी जेव्हा आकाशात बघतो, तेव्हा मला तेथे तारका, चांदण्या दिसतात; पण तुझ्या विरहामुळे मला ते दु:खाश्रू वाटतात. हे दु:खाश्रू कोणाचे? तर माझ्या या विरहअवस्थेवर आकाश अश्रू ढाळत आहे व तेच चांदण्या बनले आहेत. काय करू मी? तुला कोठे शोधू?

तुमसे मिलते ही मस्ती में खोए थे हम
आँख खोली तो उजडा हुआ था ये जहाँ...

हे प्रिये, तुझी माझी भेट झाली, तेव्हा प्रीतीच्या एका मस्त धुंदीत मी हरवून गेलो होते. डोळे मिटून त्या धुंदीचे सौख्य अनुभवत होतो; मात्र जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा माझे विश्वच उद्ध्वस्त झालेले मी पाहिले! कोठे गेले माझे ते सौख्य? कोठे शोधू मी तुला?

दोन ओळींतील शेवटचे तीन शब्द पुन्हा गाऊन घेऊन या गीतातील विषाद प्रभावी करण्याचे संगीतकारांचे कौशल्य! तलतच्या आवाजाची कातरता ओळखून वाद्यांचा माफक वापर! हुस्नलाल-भगतराम यांची ही अशी अनेक ‘सुनहरी’ गीते त्यांची स्मृती जगती ठेवणारी!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dravid Uday L About 271 Days ago
Laajawaab Greet Aahe... Hi
0
0
Dravid Udayee About 271 Days ago
Ekdam uttam lekh Maze all-time favorite Music director
0
0
smita manohar janvadkar About 277 Days ago
padmakar..lekh ani gani khupch chan ahet..tasech ganyatil nav ,pahile nav ani dusre nav etka sakhol abhyas krun ya lekhache mahatv far chan vatale...aaplya ya vishyatil abhyasachi pardarshakta disun yete ..etke sakhol dyan abhyas koutukaspad ahe ....
4
1
Subhash Purohit About 279 Days ago
पद्माकर जी, खूप छान लेख आणि खूप छान गाणं सुद्धा. "ऐ मेरी ज़िन्दगी तझे ढुंढू कहां नतो मिल के गए न ही छोड़ा निशां..👌
1
1
Master Ibrahim Sayyad Karad About 279 Days ago
Very nice. Lajawab 👌👌👌🌹🌹🎤
0
0

Select Language
Share Link
 
Search