Next
‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे पुरस्कार जाहीर
शांता गोखले यांना ‘साहित्य जीवनगौरव’, तर ‘आनंदवन’ला ‘समाजकार्य जीवनगौरव’ पुरस्कार
BOI
Thursday, January 03, 2019 | 06:25 PM
15 0 0
Share this article:

शांता गोखलेअमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी लोकांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे दिले जाणारे यंदाचे ‘महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ‘साहित्य जावनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक शांता गोखले यांना, तर ‘समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार’ बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. दर वर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे यंदा २५वे वर्ष आहे. 

‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ निवड समितीचे अध्यक्ष मुकुंद टाकसाळे आणि ‘समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार’ निवड समितीच्या अध्यक्षा विजया चौहान यांनी ही माहिती दिली. २७ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे संयोजन दर वर्षीप्रमाणे ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ आणि पुण्यातील ‘साधना ट्रस्ट’ यांच्यातर्फे केले जाणार आहे. हे पुरस्कार विविध व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात. मागील २४ वर्षांत ३२० व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. 

यंदा कादंबरीसाठीचा ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला मिळाला असून, नाट्यलेखनासाठी देण्यात येणारा ‘रा. शं. दातार पुरस्कार’ राजीव नाईक यांना जाहीर झाला आहे. असंघटित कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संगमनेरमधील निशा शिवूरकर आणि अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांना ‘कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे, तर हरी नरके यांना ‘समाजप्रबोधनपर पुरस्कार’ देण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांबरोबरच देण्यात येणारा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ अजून जाहीर करण्यात आलेला नसून, लवकरच तो जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 

यंदा महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने हे वर्ष विशेष असणार आहे. या निमित्ताने फाउंडेशनच्या एका संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मागील २४ वर्षांच्या पुरस्कार सोहळ्यातील भाषणे, पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेल्या शांता गोखले यांचा जन्म १४ ऑगस्ट १९३९मध्ये डहाणू येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. इंग्रजी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्राध्यापिका, जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केले. वृत्तपत्रातही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी लेखन केले. १९६०पासून लेखिका आणि भाषांतरकार म्हणून त्यांनी सुरुवात केली. विविध वृत्तपत्रांत लेखन, कादंबऱ्या, लघुपट, काही चित्रपटांच्या कथा असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. चित्रपट समीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली आहे. 

सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापित केलेल्या ‘आनंदवन’ संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. आयुष्यातील कटू वास्तवाचा सामना करावा लागलेल्या बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि सामाजिक सुविधांपासून वंचित गरजू लोकांना आश्रय देण्यासाठी चंद्रपूरजवळील अरण्यात ‘आनंदवन’ या संस्थेची स्थापना केली होती. बाबा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवलेला हा आश्रम कुष्ठरोगी आणि गरजू लोकांसाठी हक्काचे घर बनला आहे. आज आनंदवनात सुखी आणि आनंदी लोकांची एक वस्ती वसली आहे. भीक मागणारा भिकारीही इथे येऊन कष्ट करून खाण्याची मानसिकता घेऊन जातो. कोणे एके काळी १४ रुपयांत छोट्याशा जागेवर सुरू करण्यात आलेला आनंदवन प्रकल्प आज १८० हेक्टर जागेवर विस्तारला आहे. तिथे राहणाऱ्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट आज ‘आनंदवन’मध्येच पिकवली जाते, निर्माण केली जाते.  

इतर पुरस्कारप्राप्त मान्यवरांमधील प्रवीण बांदेकर हे ‘नवाक्षर दर्शन’ या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक-संपादक असून मराठीतील जाणकार साहित्यिक आहेत. त्यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘चाळेगत’ या कादंबऱ्या, ‘येरू म्हणे’ हा कवितासंग्रह आणि ‘घुंगुरकाठी’ हा ललितलेखसंग्रह प्रकाशित आहे. त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्रासाठीचा पुरस्कार मिळालेले राजीव नाईक हे मराठी लेखक असून नाटककार आणि कथाकार म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कथा ‘अबकडई’, ‘पूर्वा’, ‘सत्यकथा’, ‘हंस’ यांसारख्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. 

समाजप्रबोधनपर पुरस्कार मिळालेले मतीन भोसले यांचे कार्य मोठे आहे. जिल्हा परिषदेची नोकरी आणि आर्थिक सुबत्ता असतानाही फासेपारधी समाजातील खेळत्या वयातील मुले रस्त्यांवर मरताना दिसली आणि त्यांचे हेलावलेल्या मनाने या मुलांसाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेतला. या मुलांना शिकवण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन ‘प्रश्नचिन्ह’ नावाची शाळा सुरू केली आणि या मुलांना माणूस बनवण्याचा ध्यास घेतला. आज या शाळेतून कौशल्य विकासाचे शिक्षण मुलांना दिले जाते. हाच पुरस्कार मिळालेल्या अॅड. निशा शिऊरकर या घटस्फोटित, परित्यक्त्या स्त्रीयांसाठी काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्या असून गेली अनेक वर्षं त्या या स्तरावर झपाटल्यागत काम करत आहेत. महिलांच्या लढ्यावर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

समाजप्रबोधनपर पुरस्कार मिळालेले हरी नरके हे अभ्यासू संशोधक आणि मराठी लेखक आहेत. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ते सध्या अभ्यास करत आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search