Next
बाबांनी गाण्यालाच देव मानले : अतुल अरुण दाते
‘हात तुझा हातातून’ पुस्तकाचे प्रकाशन; ‘नवा शुक्रतारा’चे सादरीकरण
BOI
Monday, May 06, 2019 | 02:04 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘प्रत्येक मनुष्य आयुष्यात एक ध्येय घेऊन येतो. गाणे हे माझ्या बाबांचे ध्येय होते. गाण्यालाच त्यांनी देव मानले. बाबांचा वाढदिवस दर वर्षी खूप उत्साहात साजरा व्हायचा. त्या दिवशी कार्यक्रम असेल, तर ते पहिले प्राधान्य कार्यक्रमाला द्यायचे आणि मग हा कार्यक्रमच त्यांच्यासाठी वाढदिवस साजरा करण्याचा आनंद ठरत असे,’ अशा शब्दांत अतुल दाते यांनी आपले वडील आणि ख्यातनाम गायक अरुण दाते यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.  

‘हात तुझा हातातून’ पुस्तकाचे प्रकाशन करताना (उजवीकडून) अतुल दाते, मेधा कुलकर्णी, रोहन पाटे, मंदार जोगळेकर आणि सुप्रिया लिमये

अनेक भावगीते ज्यांच्या स्वरांतून अजरामर झाली, ते नामवंत गायक अरुण दाते यांची ८६वी जयंती चार मे २०१९ रोजी होती, तर सहा मे रोजी त्यांचा पहिला स्मृतिदिन. याचे औचित्य साधून पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात चार मे रोजी पहिला अरुण दाते संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी अतुल दाते बोलत होते. अरुण दाते कला अकादमी आणि रोहन पाटे प्रस्तुत असलेल्या या कार्यक्रमात ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच, अरुण दाते यांच्या आठवणींवर आधारित असलेल्या ‘हात तुझा हातातून’ या अतुल दाते यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे हे पुस्तक आणि त्याचे ई-बुक प्रकाशित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मोरया प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शुक्रतारा’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी बुकगंगा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, संचालिका सुप्रिया लिमये, कार्यक्रमाचे प्रायोजक असलेल्या अमित एंटरप्रायजेसचे रोहन पाटे, मोरया प्रकाशनाच्या श्रीमती कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 

अतुल दाते‘या कार्यक्रमातही बाबा उपस्थित आहेत...’
‘बाबांनी ‘शुक्रतारा’चे दोन हजार ७५० कार्यक्रम केले. त्यांच्यानंतर आम्ही हा कार्यक्रम पुढे सुरू ठेवावा अशी त्यांची इच्छा होती. नंतर वर्षभरात आम्ही ‘नवा शुक्रतारा’चे ३० कार्यक्रम केले आणि हा ३१वा कार्यक्रम आहे. बाबांची गाणी जिथे आहेत, तिथे ते असतातच. मग या आजच्या कार्यक्रमातही ते आपल्यातच इथे कुठेतरी बसून हा कार्यक्रम पाहत असावेत. लतादीदी, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल अशा दिग्गज गायिकांबरोबर बाबा गायले आहेत. या सर्व गायिकांची गाणी ऐकून ते आधी त्यांच्या आवाजाचा अभ्यास करत असत,’ अशा आठवणी अतुल दाते यांनी मांडल्या. 

मंदार जोगळेकर‘अरुण दाते यांच्या अव्यक्त आठवणी जगभरात पोहोचवण्याचे भाग्य लाभले’ 
‘अरुण दाते यांच्या सदाबहार गीतांनी रंगलेली ही संध्याकाळ आणि या सुमधुर गाण्यांच्या मैफलीचे साक्षीदार होण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने झालेली ही गर्दी पाहून प्रसन्न वाटत आहे. ‘हात तुझा हातातून’ या पुस्तकातून अतुलजींनी अरुण दाते यांच्या आयुष्यातील अनेक अप्रकाशित आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी पुस्तक आणि ई-बुकच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचे भाग्य आम्हाला लाभले. यासाठी मी अतुल दातेंचा आभारी आहे,’ अशा शब्दांत ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

‘दर वर्षी असा कार्यक्रम व्हावा...’
‘मनापासून दाद देणाऱ्या प्रेक्षकांची कलेला गरज असते आणि आज येथे जी अमाप गर्दी दिसत आहे, ती खऱ्या अर्थाने अरुण दाते यांना आदरांजलीच आहे. असे कार्यक्रम नेहमी व्हावेत, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असते. अरुण दाते यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दर वर्षी असा एक कार्यक्रम व्हावा अशी इच्छा मी व्यक्त करते. मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करीन,’ अशी ग्वाही आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली. 

‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमामधील काही गाणी झाल्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला. त्यानंतर पुन्हा गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला. दर्दी रसिकांची तुफान गर्दी या कार्यक्रमाला होती. पुणेकर रसिकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देऊन अरुण दाते यांच्यावरील प्रेम सिद्ध केले. 

‘नवा शुक्रतारा’
प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायक राजीव बर्वे, गायिका प्रियांका बर्वे यांच्या ‘नवा शुक्रतारा’मधील सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांना जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा आनंद दिला. ‘श्रीराम जय राम जय जय राम..’ या मंदारने गायलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर ‘दिवस तुझे हे फुलायचे..’, ‘डोळे कशासाठी..’, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर..’, अशा सदाबहार गीतांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. निवेदक अतुल दाते आणि सहनिवेदिका अनुश्री फडणीस यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाला चार चांद लावले. सुरेख उपमांनी सजवलेल्या या निवेदनातून अतुल दाते आणि अनुश्री फडणीस यांनी अरुण दाते यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकला. कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार यशवंत देव यांच्यासोबत अरुण दाते यांनी केलेले काम आणि त्या संदर्भातील सुखद आठवणी त्यांनी निवेदनातून मांडल्या. काही दिग्गजांनी अरुण दाते यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या आठवणी आणि खुद्द अरुण दाते यांचा संवाद या वेळी ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून सादर करण्यात आला. 

(‘हात तुझा हातातून’ आणि ‘शुक्रतारा’ ही पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Maneesha Lele About 78 Days ago
वा! बुकगंगाकडून आणखी एक दर्जेदार पुस्तक.... अभिनंदन!!!
0
0
shilpa About 78 Days ago
अभिनंदन
0
0

Select Language
Share Link
 
Search