Next
फेरफटका सांगली जिल्ह्याचा - भाग २
BOI
Wednesday, March 27, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण सांगलीचा पूर्व भाग पाहिला. आजच्या भागात पश्चिम बाजू व उत्तरेकडील काही ठिकाणांची माहिती घेऊ या. 
..........
सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घुसून रत्नागिरीला टेकला आहे. या जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी, तर पश्चिमेकडील भाग सदाहरित, निसर्गरम्य आहे. या भागाला मोठी ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी आहे. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक याच भागातील. स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्रीसरकारमुळे हा परिसर स्वातंत्र्यापूर्वी धगधगत होता. 

क्षेत्र औदुंबर

क्षेत्र औदुंबर :
हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक नरसिंह सरस्वती यांचा येथे आणि नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीच्या काठी मुक्काम होता. औदुंबर येथे त्यांनी एका चातुर्मासात मुक्काम केला होता. श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यामुळे दत्तभक्तांची येथे वर्दळ असते. ब्रह्मानंदस्वामी हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. ते येथेच समाधिस्थ झाले. त्यांच्याबरोबर आलेल्या मेरूशास्त्री यांनी ब्रह्मानंदांच्या साह्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ‘ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. ब्रह्मानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी औदुंबरचा प्रशस्त घाट भक्तांच्या देणगीतून बांधला. कवी हणमंत नरहर जोशी, अर्थात काव्यतीर्थ कवी सुधांशू यांचे निवासस्थान व जन्म ठिकाण येथेच आहे. त्यांनी अनेक मराठी भक्तिगीते, भावगीते लिहिली. कवी कुंजविहारी यांनी ह. न. जोश्यांना सुधांशू हे नाव दिले. औदुंबरक्षेत्री चैत्रात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. येथील कृष्णा नदीचा घाट व निसर्गरम्य परिसर खूपच छान आहे. येथे नौकानयनाची सोय आहे. नदीच्या पत्रामध्ये मगरींचा मुक्त वावर आहे. आष्टामार्गे येथे जाता येते. 

बहे मारुतीबहे–बोरगाव : समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी येथे एक मारुती मंदिर आहे. कृष्णा नदीतील एका बेटावर हे मंदिर असून, दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या छोट्या निसर्गरम्य रामलिंग बेटावर हे ठिकाण आहे. या बेटावरील राम मंदिराच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना केलेली आहे. स्थानिक कथेनुसार, श्रीलंकेहून परत येत असताना राम-लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला, असे म्हटले जाते. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांनी याच ठिकाणी रचले. ‘बाहुक्षेत्र’ असा कृष्ण-माहात्म्यात या ठिकाणाचा उल्लेख आहे. अत्यंत रमणीय परिसरामुळे नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यासाठी सहा कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी पहिला हप्ता म्हणून शासनाने दोन कोटी रुपये दिले आहेत. मच्छिंद्रगड येथून जवळच आहे. हे गाव क्रांतिसिंह नाना पाटील यांचे आजोळ. त्यांचा जन्म येथेच झाला. हे ठिकाण इस्लामपूरपासून १० किलोमीटरवर आहे. 

ज्वाला नृसिंहनरसिंहपूर : कृष्णा नदीच्या काठावर नरसिंहाचे पुरातन मंदिर आहे. येथील भुयारात जाण्याच्या पहिल्या पायरीवर एक शिलालेख असून, त्यावर हे मंदिर तीन पिढ्यांनी बांधले असल्याचा उल्लेख आहे. दर्शनासाठी एका वेळी एक व्यक्ती जाऊ शकेल, असा मार्ग या भुयारात आहे. ‘ज्वाला नृसिंह’ या नावाने देवाची ओळख आहे. नृसिंहाने त्याच्या मांडीवर हिरण्यकश्यपूस आडवे घेतले असून, त्याने त्याची बोटे त्याच्या पोटात खुपसली आहेत. काळ्या पाषाणातील अतिशय सुरेख मूर्ती असून, तिच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. ज्याला भुयारातून जाता येत नाही, ते तुळशी वृंदावनाला नमस्कार करतात. तेथे देवाला ठेवलेले पैसे खाली मूर्तीसमोर पडतात. इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. 

शिराळा : हे गाव दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे समर्थ स्थापित ११ मारुतींपैकी एक मारुती, तर दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमी उत्सव. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले हे गाव नागपंचमी उत्सवामुळे प्रसिद्ध झाले आहे. समर्थ स्थापित ११ मारुतींपैकी एक येथे असून, एस. टी. स्टँडजवळच हे मंदिर आहे. सात फूट उंचीची अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे असे आहे. चुन्यापासून बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरसुद्धा उत्तराभिमुखच असून, हनुमानाच्या कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसवलेल्या आहेत. कटिवस्त्र आणि त्याला सुंदर गोंडासुद्धा आहे. मूर्तीच्या डोक्याच्या डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. मंदिराच्या प्राकाराला दक्षिणेकडे अजून एक दार आहे. शिराळ्याचे महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य म्हणून प्रसिद्ध होते. 

शिराळा नागपंचमीयेथील नागपंचमी उत्सव महायोगी गोरक्षनाथांनी सुरू केला, अशी श्रद्धा आहे. या उत्सवाला सुमारे हजार वर्षांची पंरपरा आहे. शिराळ्याचा उल्लेख इसवी सन ९००च्या पूर्वीपासून आढळतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथून पकडून तिवरे घाटातून नेताना त्यांना सोडवण्याचा प्रयत्न शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर झाला होता. किल्लेदार पिलाजी देशमुख आणि त्यांचे सहकारी दीक्षित यांनी हा प्रयत्न केला होता. शिराळा गावामध्ये गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते, की गोरक्षनाथ भिक्षा मागत गावामधून जात असताना ते गावातील महाजन यांच्या घरी गेले असता, तिथे त्यांनी नागाच्या प्रतिमेची पूजा चालू असलेली पाहिली होती. तेव्हा नाथांनी त्यांना प्रश्न केला, ‘जिवंत नाग पाहिलास, तर त्याची अशीच मनोभावे पूजा करणार का?’ त्यावर त्या महिलेनी ‘हो’ म्हणून सांगितले आणि पाहतात, तर खरोखर त्यांच्या घरी जिवंत नाग खेळत होते. त्या वेळी त्यांनी प्रत्येक वर्षी नाग पकडून पूजेला नागपंचमीदिवशी घेऊन येतील असे सांगितले. तेव्हापासून अखंडपणे जिवंत नागाची पूजा शिराळा गावामध्ये केली जाते. नागपंचमीदिवशी मातीच्या व कोतवालांनी पकडलेल्या जिवंत नागांची पूजा आजही येथील महाजनांच्या घरी होते. येथील महिला नागाला भाऊ मानून पूजा करतात. ग्रामदैवत अंबामातेस नारळ फोडून बेंदराच्या सणापासून नाग पकडण्यास सुरुवात होते. मातीच्या गाडग्यात त्यावर लोटके व रंगीत कपड्यांनी झाकून नागांना सुरक्षित ठेवले जाते. आता वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे नागोबा पकडण्यास बंदी आहे. सर्प या प्राण्याची ओळख होण्यासाठी हा उत्सव महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने ही संधी महत्त्वाची आहे. ग्रामस्थ उत्सवानंतर नागोबाला सोडून देतात. त्याची हत्या करीत नाहीत. 

चांदोली धरणचांदोली धरण : सांगली जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारे चांदोली धरण कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पाटबंधारे प्रकल्पातील हे एक मोठे धरण आहे. यावर एक छोटी जलविद्युत निर्मिती यंत्रणाही कार्यान्वित करण्यात अली आहे. तसेच धरणाच्या जलाशयाभोवती निसर्गरम्य चांदोली अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पही आहे. कै. वसंतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून हे धरण साकारले गेले आहे. 

चांदोली अभयारण्य : सांगलीच्या पश्चिम टोकावर चांदोली धरणाच्या मागे असलेल्या पाणीसाठ्याच्या किनाऱ्यावर सर्व बाजूंनी हे अभयारण्य विस्तारले आहे. या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली. २००४मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा व व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. सुमारे ३० हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावर चांदोली अभयारण्य विस्तारले आहे चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही वनश्रीचे दर्शन घेण्यात वेगळाच आनंद आहे. दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो. ‘माउस डिअर’ (गेळा) आणि शेकरू हे प्राणी जंगलात हमखास आढळतात. पट्टेरी वाघ, बिबटे, गवे, सांबर, अस्वले, भेकर, रानडुकरे, साळिंदर इत्यादी प्राणीही येथे पाहायला मिळतात. तसेच हॉर्नबिल, गरुड, होपे, ब्राह्मी काइट असे पक्षीही दिसून येतात. जलाशयात राहू, मरळ, वांब, मळे, कटला या जातींचे मासे आणि मगर असे जलचर प्राणी आढळतात. त्याबरोबरच साप, नाग, घोणस, मण्यार, दिवड, फुरसे, धामण, अजगर असे सरपटणारे प्राणी आढळतात. वारणा नदीचा उगम, रामघळ, वारणा पॉइंट, माकड टोक, कोकण दर्शन पॉइंट, झोळंबीचा सडा, रुंदिवचा धबधबा, अस्वल सडा, वाल्मिकी सडा इत्यादी ठिकाणे निसर्गप्रेमी पर्यटकांना आकर्षित असतात. या जंगलात अनेक प्रकारचे दुर्मीळ जंगली प्राणी पाहण्यास मिळतात. येथील वृक्षसंपदा पर्यावरणप्रेमी व वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी आहे. रामघळीमध्ये समर्थ रामदास येऊन गेले, असे म्हणतात. इतिहासाचे साक्षीदार असलेले प्रचितगड, भैरवगड, कलावंतिणीची विहीर इत्यादी ठिकाणे येथे आहेत. 

चांदोली अभयारण्य

कंधारडोह :
हे सांगली जिल्ह्यातील अवघड, पण निसर्गरम्य ठिकाण आहे. पदभ्रमंती (ट्रेकिंग) करणाऱ्या धाडसी पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जाता येते. परतीसाठी आल्या वाटेने उतरून परत चांदेल, गोठणे धनगरवाड्यामार्गे कुंडी गाव गाठावे किंवा जाणकार वाटाड्या सोबत असल्यास रुंदिवहून पुढे कंधारडोहच्या घळीत उतरून कंधार धबधबा पाहता येईल. 

प्रचितगड

प्रचितगड :
शिवरायांनी २९ एप्रिल १६६१ला शृंगारपूर जिंकले. त्याच वेळी कोकणावर नजर ठेवता येईल, असा प्रचितगडही घेतला. १७१०-१२ मधील छत्रपती शाहू महाराज व रामचंद्रपंत अमात्य यांच्या करारात प्रचितगडाचा उल्लेख येतो. नंतर जानेवारी १८१८मध्ये कर्नल प्रॉथरने प्रचितगडाचा ताबा घेतला. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या पश्चिमेला असणारा हा महत्त्वाचा टेहळणी किल्ला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर गावातून या गडावर सह्याद्री पर्वतामधून पायवाटेने जाता येते. साखरपा येथून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते. शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडीक वास्तू असून येथील कातळाच्या कुंडात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. 

मच्छिंद्रगड : वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रगड हा एक छोटेखानी किल्ला आहे. इ. स. १६७६च्या सुमारास छत्रपती शिवरायांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर नाथपंथीय मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर असल्यामुळे या किल्ल्याला मच्छिंद्रगड हे नाव पडले असावे. मच्छिंद्रनाथ मंदिर प्रशस्त असून, विविध शिल्पांनी सजविलेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. इ. स. १६९३मध्ये हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला, तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला. त्या वेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे इ. स. १८१८मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड ताब्यात घेतला. या नावाचा आणखी एक किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे. मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी इस्लामपूर येथून जाता येते. 

बागणी भुईकोट किल्ला

बागणी भुईकोट किल्ला :
दोन-तीनशे वर्षांपूर्वी बाजारपेठ होती. १७व्या शतकात येथे हा किल्ला बांधला असावा. सध्या येथे तटाचे भग्नावशेष दिसून येतात. हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे पीरचा दर्गा असून, मोठा उरूस भरतो. 

सोने गाळणे उद्योगसोने गाळणे उद्योगविटा : हे खानापूर तालुक्याचे मुख्यालय. हे गाव कायम दुष्काळी भागात आहे. या गावात पूर्वी कोष्टी लोकांचा हातमागाचा मोठा व्यवसाय होता. आता या गावातील लोक गळई सोने गाळणे (गोल्ड रिफायनरी) या व्यवसायात गुंतले आहेत. विटा व आसपासच्या गावातील लोक या कारागिरीत प्रवीण असून, संपूर्ण भारतभर पसरले आहेत. दुसरे म्हणजे हे गाव कुस्तीगीरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात नगरपालिकेने एक सुंदर सुलक्षणी गजराज पाळला आहे. गावातील सर्व कार्यक्रमांत त्याचा सहभाग ठरलेला असतोच. 

बहिर्जी नाईक समाधी, बाणूरगडबाणूरगड : हा भूपाळगड म्हणूनही ओळखला जातो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला हा एक किल्ला आहे. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी येथे आहे. मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलण्यात पारंगत असलेले बहिर्जी नाईक यांना महाराजांनी पाहिले. त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून महाराजांनी त्यांना त्यांच्या गुप्तहेर खात्यात सहभागी केले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात वेशांतर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार व्यक्ती होत्या. महाराजांच्या मोहिमा बहिर्जींच्या माहितीनुसार आखल्या जात. त्यामुळे स्वराज्यातील त्यांची भूमिका व स्थान खूप महत्त्वाचे होते. या शिवरायांच्या शिलेदारांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी येथे जावे. 

रेठरे हरणाक्ष : हे गाव प्रसिद्ध लावणीकार, तमाशा फड गाजविणारे पठ्ठे बापूराव यांचे जन्मगाव. लहानपणापासूनच त्यांना तमाशाची आवड होती. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या महिलेशी त्यांचा विवाह झालेला होता. परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. त्यांची एक मजेदार कथा या लेखाचा विषय सोडून देत आहे. पठ्ठे बापूराव तहसील कचेरीत कारकून होते. त्यांच्याकडे एक बाई दस्त लिहिण्यासाठी आली. तिचा दस्त राहिला बाजूला आणि तिच्याकडे बघून त्यांना कविता सुचली!! – ‘तीळ शोभे गोरा लाल, तुझी नथनी झुबकेदार!!’ आणि त्यांनी त्या ओळी दस्तावर लिहिल्या आणि कागद साहेबापुढे तसाच गेला. पुढे काय झाले असेल, याची कल्पना तुम्हास आली असेलच. गायक, संगीतकार, कवी, शाहीर अशा सर्वच भूमिका ते पार पडत होते. पवळा नावाच्या नायकिणीबरोबरच ते अखेरपर्यंत राहिले. 

विटा गजलक्ष्मी

वाटेगाव :
प्रसिद्ध शाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते व लेखक अण्णा भाऊ साठे यांचे हे गाव. कासेगावजवळच पश्चिमेला हे गाव आहे. येथे त्यांचे स्मारक आहे. क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, हुतात्मा किसन अहिर असे अनेक लोक पत्रीसरकारमध्ये क्रांतिकार्य करीत होते. सावकारांपासून भूमिपुत्रांची होणारी पिळवणूकही या आंदोलनाने थांबवली होती. 

कडेगावचे ताबूतकडेगाव : हे गाव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ताबूतांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या १५० वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. विशेष म्हणजे या ताबूतांच्या मिरवणुकीत हिंदूंना मानाचे स्थान आहे. भाऊसाहेब देशपांडे यांनी कडेगाव मोहरमचा पाया घातला व पीरजादे यांनी त्यावर कळस चढविला, असे म्हटले जाते. देशपांडे, सातभाई, हकीम, शेटे, पाटील, आतार, युसूफ बागवान, महंमद बागवान, माईंकर, तांबोळी, कळवात, सुतार, मसूदमाता, शेख असे ताबूत मिरवणुकीत भाग घेतात. ताबूतांची उंची २०० फुटांपर्यंत असते. ताबूतांमध्ये पाच फुटांचे वीस ते पंचवीस मजले असतात. बांबूच्या कळकावर आधारित ताबूतांसाठी सूत, चिखल, ४८ कळकाचे तुकडे, १६ खांब, आठ कैच्या एवढी सामग्री लागते. याची जोडणी करीत असताना कोठेही गाठ बांधली जात नाही. ताबूत रंगीबेरंगी नक्षीकामाने सजविले जातात. अगोदर कळसाकडून पायाकडे अशी त्यांची बांधणी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. 

पारे : सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव विटा या तालुक्याच्या गावापासून नऊ किलोमीटरवर आहे. सोने गाळणे या कारागिरीची सुरुवात विटा गावाच्या उत्तरेस असलेल्या वेजेगावमधील लोकांनी १०० ते १५० वर्षांपूर्वी केली. मुळातच दुष्काळी भाग असलेल्या या गावातील लोकांनी उपजीविकेसाठी मुंबई गाठली व सोने गाळण्याची कला शिकून घेतली. हळूहळू या भागातील लाखाहून अधिक लोक या व्यवसायाशी जोडले गेले. ते सर्व भारतात नव्हे, तर जगात पोहोचले आहेत. त्यांची टुमदार घरे त्यांच्या गावात आता उभी राहिली आहेत; पण ८० टक्के घरे बंद असतात. कारण हे लोक सर्व कुटुंबीयांसह कामाच्या ठिकाणी रहातात; पण त्यांच्या गावाची ओढ मात्र त्यांना असते. विटा गावाच्या आसपासची अनेक गावे, तसेच सातारा जिल्ह्यातील चितळी व आसपासच्या काही भागांतील लोक या व्यवसायात उतरले आहेत. या गावातील व आसपासच्या चार-पाच गावांतील लोक सोने गाळण्याच्या कामात गुंतललेली आहेत. पारे हे गाव खडकाळ डोंगरांमध्ये वसले आहे. त्यामुळे गावातील लोक गमतीने ‘काळ्या पर्वतातील सोन्याची खाण’ असे म्हणतात. अत्याधुनिक यंत्राद्वारे सोने-चांदी रिफाइन करण्याचे कारखाने सुरू झाले; मात्र या पारंपरिक तंत्रापुढे त्याचा टिकाव लागला नाही. 

किर्लोस्करवाडी : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली किर्लोस्करवाडीची स्थापना केली. तेव्हा त्यांनी कुंडल रोड नावाच्या रेल्वे स्टेशनजवळ किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड नावाचा कारखाना सुरू केली. औंध संस्थानचे शासक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी कारखाना व शहर स्थापन करण्यासाठी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना जमीन दान केली. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी युरोप व अमेरिकेमध्ये औद्योगिक नगरीबद्दल वाचले होते. तेथे उद्योगमालकांनी कर्मचाऱ्यांसाठी वसाहती बांधल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी कारखाना व कामगार यांच्यासाठी वसाहत निर्माण केली. तीच आज किर्लोस्करवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. ओतीव नांगराची निर्मिती करीत असतानाच १९२०मध्ये कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली. वर्षभरातच कंपनीचे पहिले डिझेल इंजिन बाजारात आले. १९४१मध्ये भारतात पहिले विद्युत इंजिन कंपनीने तयार केले. 

कुंडल : हे गाव चालुक्यांची या भागाची प्रशासकीय राजधानी होती. या गावाचे प्राचीन नाव कौंडिण्यपूर असे होते. कुंडलचे अस्तित्व १६०० वर्षांहून अधिक जुने असावे. असे मानले जाते, की भगवान पार्श्वनाथ, तसेच अनेक जैन मुनी या भागात येऊन गेले आहेत. कुंडल हे गाव पत्रीसरकारमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात गाजले होते. क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. (बापू) लाड, क्रांतिवीर कॅप्टन आकाराम (दादा) पवार, क्रांतिवीर आर. एस. (मामा) पवार, कॅप्टन रामभाऊ लाड, यशवंत (बाबा) पवार, शंकर जंगम आणि इतर अनेक लोकांची ही कर्मभूमी आहे. 

भिलवडी : हे गाव चितळे दूध डेअरीमुळे प्रसिद्ध झाले आहे. हा दुग्ध प्रकल्प महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा समजला जातो. चितळेंच्या दुग्धवाहक गाड्यांवर ‘श्री कोटेश्वर प्रसन्न’ असे लिहिलेले असते. त्यांची लिंबच्या कोटेश्वराची भक्ती त्यावरून दिसून येते. भारतात म्हशीच्या क्लोनद्वारे कृत्रिम रेतनाचा प्रयोग राबवला गेला. आनुवंशिक कृत्रिम रेतनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आलेल्या या रेडीचे नाव दुर्गा ठेवण्यात आले. आज चितळे उद्योग दुधाबरोबर मिठाई उद्योगातही नावाजला गेला आहे. लिंबच्या अभ्यंकरांबरोबर चर्चा करताना, सध्या सांगलीतील पण मूळचे लिंब येथील धनी वेलणकरांची आठवण निघाली. खरे तर त्यांची माहिती मागील भागातच द्यावयाची राहून गेली. वेलणकरांनी सांगलीत १०० वर्षांपूर्वीच यंत्रमागाची स्थापना करून वस्त्रोद्योगाची सुरुवात केली होती. ते दानशूर होते. अलीकडच्या (सन १९००) काळात सुवर्णतुला झालेले ते एकमेव व्यक्ती होते. 

कसे जाल सांगलीच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला?
विटा, खानापूर, आटपाडी, तासगावकडे सांगलीकडून, तसेच कराडकडूनही रस्तेमार्गाने जाता येते. तसेच इस्लामपूर, शिराळा भागात कोल्हापूर, सातारा सांगलीकडून जाता येते. पश्चिम भागासाठी जवळचे रेल्वे स्टेशन कोल्हापूर हे आहे. सांगली, भिलवडी येथेही रेल्वे स्टेशन आहेत. जवळचा विमानतळ कोल्हापूरला आहे. कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, चांदोली येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. 

(लेखाच्या या भागातील माहितीसाठी पैलवान मिलिंद मानगुडे यांचे सहकार्य झाले. त्यांनी विटा परिसराची माहिती दिली.) 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 82 Days ago
I hope , all the articles will be put together , and published in the form of book. That will be a boon to tourism .
0
0
P. N. Kurhade About 83 Days ago
Very good article. Vishnu Bala, Bapu, Biru Wategaonkar, Bal Gandharv, Dr. Babaseb Ambedkar's nearest person Advt. B.C. Kambale. from Palus. Update please.
0
0

Select Language
Share Link
 
Search