औंध : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चित्ररथ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर आणि महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती कलापुरे, अॅड. तानाजी चोंधे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले, ‘बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. अंधारात खितपत पडलेल्या समाजाला शिक्षण घेण्यासाठी जागृत केले. जात, पंथ, धर्म इतर भेदांना मूठमाती देऊन वसतिगृहे काढली. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच ‘कमवा व शिका’ या अभिनव योजनेमार्फत विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा वाढविली. गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा आणली; तसेच विद्यार्थ्यांची स्वाभिमानी पिढी निर्माण करून त्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण केली. त्यामुळे कर्मवीरांचे कार्य हे अलौकिक स्वरूपाचे आहे.’

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. काव्यवाचन, कथाकथन, वकृत्व, निबंध लेखन, रांगोळी अशा काही स्पर्धांचा यात समावेश आहे. कर्मवीरांचा विचार घरा-घरापर्यंत पोहोचवण्यासाठी औंध परिसरात चित्ररथ रॅलीचे आयोजन केले आहे. चित्ररथाच्या माध्यमातून कर्मवीरांच्या कार्याचा प्रसार करण्यात आला. या रॅलीमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विविध घोषणांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या कार्याला उजाळा दिला.’

कर्मवीर चित्ररथ रॅलीप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. सविता पाटील, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. सुप्रिया पवार, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. शशी कराळे, प्रा. भीमराव पाटील, प्रा. सायली गोसावी, प्रा. किरण कुंभार, प्रा. भक्ती पाटील, प्रा. हर्षकुमार घळके, डॉ. हर्षद जाधव, प्रा. प्रदीप भिसे, डॉ. अतुल चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.