Next
आंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..!
BOI
Wednesday, April 18, 2018 | 09:45 AM
15 1 0
Share this story


आंबे न आवडणाऱ्या व्यक्ती शोधूनही सापडणार नाहीत; पण वजन वाढू नये म्हणून डाएट करणाऱ्यांना आंबे खाऊ नका, असा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. कॅलरीजमध्ये मोजायचे झाले, तर आंबा ‘हाय कॅलरी’ देणाऱ्या अन्नपदार्थांतच मोडतो; पण त्यात इतर जी पोषणमूल्ये आहेत, ती अद्वितीय आहेत. ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या आंब्यातील पोषक तत्त्वांबद्दल... 
.............
उन्हाळा म्हटले, की कलिंगड व टरबुजाबरोबर आठवतो तो आंबा.. परंतु तब्येतीचा विचार करता तो त्रास देऊ लागतो. कारण इतर उन्हाळी फळांचा वजनावर परिणाम होण्याची भिती नसते. आंबा मात्र फारच चमत्कार दाखवू शकतो. आंबा न आवडणाऱ्या व्यक्ती शोधूनही सापडणार नाहीत. आंबा प्रचंड प्रमाणात आवडणाऱ्यांची संख्याही अगदी खूप आहे; पण वजन वाढू नये किंवा वजन व इंचेस कमी करण्यात आंब्याचा मोठा अडसर असतो. डाएट करणाऱ्यांना आंबे न खाण्याचा सल्लाही बऱ्याचदा दिला जातो; पण खरेच असे असते का, तर अजिबात नाही. 

कारण कोणतेही असो, पण आजकाल व्यायामशाळेत जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. वजन कमी करणे किवा ‘इंच लॉस’ ही दोन कारणे प्रमुख असतात. कॅलरीजमध्ये मोजायचे झाले, तर आंबा ‘हाय कॅलरीज’ देणाऱ्या अन्नपदार्थांपैकीच एक आहे; पण त्यात इतर जी पोषणमूल्ये आहेत, ती अद्वितीय आहेत. 

आंबा हा जवळपास १५ ते २० प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यांनी परिपूर्ण असतो. जीवनसत्त्व अ, ब-६, क, के, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम हे घटक आंब्यात प्रामुख्याने असतात. म्हणजेच एका दृष्टीने आंबा म्हणजे पोषक तत्त्वांचा खजिनाच आहे. त्यामुळे केवळ वजनवाढीच्या भीतीने आंबे न खाण्याची चूक करू नका; मात्र आंबे खाताना तुमची सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवा. म्हणजे काय, तर रोज एक मध्यम आकाराचा आंबा खाल्ल्याने अजिबात वजन वाढत नाही. उलट असे केल्यास, आपले शरीर पूर्ण वर्षभर पुरेल इतकी जीवनसत्त्वे व खनिजांचा साठा करून ठेवेल. 

आंब्यात ज्या गुणवत्तेची किंवा ज्या प्रकारची पोषकतत्त्वे आहेत, ती ‘उत्कृष्ट’ याच वर्गात मोडतात. तसेच आंबा खायचा झाल्यास तो शक्यतो नाश्ता किंवा दुपारच्या जेवणावेळी खावा. अनेक लोकांना दिवसभरात कमीत कमी दोन ते सहा आंबे किंवा त्यांचा रस खाण्याची सवय व आवड असते, जी पुढे खूप त्रासदायक ठरू शकते. असे करणे म्हणजे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नातील एक मोठा अडथळा ठरू शकते. म्हणूनच योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने व्यायाम करून आंबे खाण्याचा आनंद लुटा.  

आंब्याच्या फोडी व रस (मिक्सरमध्ये बारीक न केलेला) या दोन पद्धती सगळ्यात उत्तम आहेत; मात्र आंब्याचा मिल्कशेक, आइस्क्रीम, आंब्याचा केक, पुडिंग असे पदार्थ खाल्ल्यास कॅलरीज तर वाढतातच; पण त्याचे पोषणमूल्यही कमी होते. मी खूप आंबे खाणार व खूप व्यायाम करून कॅलरीज कमी करणार, म्हणजे वजन वाढणार नाही, अशा भ्रमात राहू नका. कारण शेवटी किती खातो व किती कॅलरीजचा वापर करतो, हे एका तराजूसारखे असते. समतोल साधलात, तरच तुम्ही जिंकलात.

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link