Next
‘माझा लढा लष्कराच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात’
माधुरी सरवणकर
Saturday, May 12 | 01:30 PM
15 0 0
Share this story

इरोम शर्मिला आणि डेस्मंड कुटिन्होपुणे : ‘माझा लढा लष्कराच्या नव्हे, तर व्यवस्थेच्या विरोधात उभारला होता. उपोषण करून काहीच फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यावर मी उपोषण मागे घेतले. त्या वेळी मी घेतलेला निर्णय योग्य होता. आता काश्मीरमधील महिलांचे प्रश्न सोडविण्याची माझी इच्छा असून, त्यांच्या सबलीकरणासाठी मी कार्यरत राहणार आहे,’ असे प्रतिपादन ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरोम चानू शर्मिला यांनी शुक्रवारी (११ मे २०१८) पुण्यात व्यक्त केले. 

चार नोव्हेंबर २००० ते नऊ ऑगस्ट २०१६ एवढी १६ वर्षे त्यांनी लष्कराच्या विशेषाधिकार (अॅफ्स्पा) कायद्याच्या विरोधात इरोम शर्मिला यांनी उपोषण केले होते. उपोषणाचा हा जगातील सर्वाधिक कालावधी आहे. पुण्यातील ‘सरहद’ संस्थेतर्फे शुक्रवारी त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील महावीर जैन महाविद्यालयात ही मुलाखत रंगली. युवराज शहा यांनी इरोम यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. या वेळी सरहद संघटनेच्या वतीने शर्मिला यांना काश्मीरमधील सामाजिक कार्यासाठी ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून नेमत असल्याची घोषणा करण्यात आली. या वेळी शर्मिला यांचे पती डेस्मंड कुटिन्हो, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आदी मान्यवर उपस्थित होते. 

इरोम शर्मिला म्हणाल्या, ‘विशेष कायद्याच्या नावाखाली सशस्त्र दलाच्या जवानांकडून निर्दोष व्यक्तींचा छळ केला जात होता, बलात्कार केले जात होते, तरुणाचे बळी घेतले जात होते. लोकशाही आणि मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात होती. महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन मी या विरोधात सोळा वर्षे उपोषण केले. या काळात समाजाची साथ नव्हती आणि सरकारकडून माझा आवाज दडपला जात होता. माझा लढा अन्यायाविरुद्ध होता. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून लोकांना मदत करण्याची माझी इच्छा आहे.’ 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानवी हक्कांबद्दल माहिती आहे का,’ असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘जनतेने मोदींना निवडून दिले असल्याने जनतेला याची कल्पना जास्त असेल. मी उपोषण सोडून राजकारणात आले; मात्र लोकांना माझा संघर्षाचा चेहरा माहिती होता. त्यामुळे त्यांनी मला राजकारणात स्वीकारले नाही.’ भारत आणि पाकिस्तान या देशात दुवा बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील शर्मिला यांनी नमूद केले.

या वेळी विद्या बाळ म्हणाल्या, ‘मूर्ख व्यक्तीच्या समोर डोके फोडावे अशी सध्या समाजाची अवस्था झाली आहे. उपोषण केल्यामुळे व्यवस्थेमध्ये बदल होणे पूर्वी शक्य होते; मात्र आता ते शक्य नसल्साने इरोम यांनी घेतलेला उपोषण सोडण्याचा निर्णय योग्य होता.’ सरोदे म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये संवादावर विश्वास व विचारांमध्ये आदान-प्रदान असणे गरजेचे आहे; मात्र सध्या लोकशाही पायदळी तुडवली जात आहे.’

शर्मिला यांचा लढा कशासाठी होता?
बस थांब्यावर वाट पाहत असलेल्या काही निष्पाप मणिपुरी व्यक्तींना जवानांनी  गोळीबारात ठार मारले होते. यात ६२ वर्षाच्या एका व्यक्तीचा आणि शौर्यपदक मिळवणाऱ्या बालकाचाही समावेश होता. ‘अॅफ्स्पा’मुळे कोणालाही कारण न देता गोळ्या घालण्याचे किंवा अटक करण्याचे विशेषाधिकार लष्कराला मिळतात. म्हणूनच या निष्पाप लोकांना न्याय मिळावा आणि ‘अॅफ्स्पा’ रद्द केला जावा, या मागणीसाठी इरोम शर्मिला यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या बेमुदत उपोषणाला एका आंदोलनाचे स्वरूप आले होते. त्यांनी उपोषण सुरू केले, की सरकारतर्फे त्यांना रुग्णालयात नेऊन नळीने अन्न भरवले जाई. त्यामुळे रुग्णालयालाही तुरुंगाचे स्वरूप आले होते. सुटका, पुन्हा उपोषण, पुन्हा अटक आणि पुन्हा जबरदस्तीने अन्न भरविणे असा हा सिलसिला तब्बल १६ वर्षे सुरू होता. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link